कॉम्रेड  एस. वाय. कोल्हटकर.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची नागपूर तुरुंगात रवानगी करण्यात आली तेव्हाची ही गोष्ट. विनोबा आणि स्वातंत्र्यसंग्रामातील इतर काँग्रेसची मंडळी त्यावेळी तुरुंगात दररोज सामूहिक प्रार्थना आणि प्रवचने आयोजित करीत. तुरुंगातील सर्वच कैदी या प्रार्थना प्रवचनांस उपस्थित असत. अपवाद केवळ एका तरुण राजकीय कैद्याचा. 
 
कम्युनिस्ट चळवळीतील हा तरुण या प्रार्थना-प्रवचनांकडे कधी चुकूनही फिरकत नसे. ही बाब तुरुंगातील सर्व कैद्यांच्या, इतकेच नव्हे तर खुद्द विनोबांच्याही लक्षात आली होती. 
 
आणि एके दिवशी खुद्द विनोबाच या कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या कोठडीत आले. त्यांच्या त्या तुरुंगवासाच्या सजेचा तो शेवटचा दिवस होता. विनोबांनी त्या कोठडीत एक नजर फिरविली. त्या तरुणाच्या टेबलावर मार्क्सवादी विचारसरणीची अनेक पुस्तके ओळीने रचून ठेवलेली होती. त्यापैकी एक पुस्तक विनोबांनी कुतुहलाने उचलले व त्यातील पाने ते चाळू लागले; पण त्या पुस्तकातील अक्षरे छोटया टाईपातील असल्याने ती वाचणे विनोबांना जमेना.
 
" मार्क्सवादासंबंधीची ही पुस्तके वाचायला मला आवडेल, पण अंधुक दृष्टीमुळे ते शक्य होणार नाही. तुरुंगाच्या या सजेचा आजचा माझा शेवटचा दिवस. पण सुटका झाल्यानंतर लवकरच मी पुन्हा तुरुंगात येईन. त्यावेळी ही पुस्तके तुम्ही माझ्यासाठी मोठ्याने वाचताल काय ? " विनोबांनी त्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यास विचारले.
 
त्या तरुणाने विनोबांची ही विनंती ताबडतोब मान्य केली. आणि विनोबांनीही आपला शब्द खरा केला,
 
सुटका झाल्यानंतर खरोखरच थोड्याच दिवसानंतर ते पुन्हा कैदी म्हणून नागपूर तुरुंगात परतले. त्यानंतर हा तरुण दररोज मार्क्सवादी विचारसरणीची पुस्तके विनोबांसाठी मोठ्याने वाचत असे. हा दिनक्रम जवळजवळ दोन महिने चालला.
 
या घटनेला आज जवळजवळ पन्नास वर्षे होत आली आहेत. या प्रसंगातील तो तरुण कार्यकर्ता म्हणजेच प्रसिद्ध मार्क्सवादी आणि कामगारनेते कॉम्रेड  श्रीपाद यशवंत उर्फ एस. वाय. कोल्हटकर.
 
विनोबांशी झालेल्या त्या चर्चेला उजाळा देताना कॉम्रेड कोल्हटकर म्हणतात, " त्यावेळी विनोबांचे मत मी सरळसरळ खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण पन्नास वर्षापूर्वी घडलेल्या या प्रसंगाकडे आता मागे वळून पाहताना, विनोबा अहिंसेच्या तत्वाबाबत जो आग्रह करत होते त्यात काही तथ्य होते असे मात्र मला आता निश्चितच वाटते.'
 
 साठ वर्षापूर्वी त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात रसायनशास्त्राचे डेमनिस्ट्रेटर असणाऱ्या एस. वाय. कोल्हटकरांनी आपली नोकरी सोडून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्यानंतर तुरुंगवास आणि तुरुंगाबाहेर असताना भूमिगत राहून आपले कार्य चालूच ठेवणे ही कोल्हटकरांची जीवनपद्धतीच बनली.
 
ब्रिटीश राजवट संपून स्वकियांची राजवट देशात आल्यानंतर स्वराज्यातही कोल्हटकरांच्या कम्युनिस्ट पक्षावर लादण्यात स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या या जीवनक्रमात फारसा बदल घडला नाही. आज तब्बल साठ वर्षांनंतर पुण्यात निवृत्तीसाठी परतलेल्या कोल्हटकरांच्या जीवनाने एका अर्थाने एक वर्तुळ पूर्ण केले आहे.
 
नागपूरात कामगार चळवळीचे काम करतांना कोल्हटकरांचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशीही जवळून संबंध आला. गांधीजींची भेट घेण्यासाठी नेताजी एकदा वर्धा आश्रमात आले होते. या दरम्यान, कोल्हटकर आणि त्यांच्या कम्युनिस्ट सहकाऱ्यांनी नागपूरात साम्राज्य शाहीविरोधी परिषद आयोजित करण्याचे ठरविले होते. या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी बोस यांना विनंती करण्यासाठी त्यांना कोल्हटकर व त्यांचे सहकारी वर्धा आश्रमात भेटले.
 
परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती नेताजींनी ताबडतोब स्वीकारली. रात्री झालेल्या या बैठकीत नेताजींनी कोल्हटकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी एक-दीड तास अनेक विषयांवर चर्चा केली. कोल्हटकरांच्या समवेत त्यावेळी क्रांतिकारक हमीर हैदरखान हे सुद्धा होते. हमीर आणि सुभाषचंद्र बोस पूर्वी काही काळ कलकत्त्याच्या तुरुंगात एकत्र होते. हमीर यांना पाहताच सुभाषबाबूंनी त्यांना कडकडून मिठी मारली.
 
चर्चा चालू असतानाच आश्रमातून सुभाषबाबूंसाठी जेवणाचा डबा आला. डबा शेठ जमनालाल बजाज यांनी पाठविला होता.
 
"ऐन बैठकीच्या वेळेस केवळ स्वतःसाठीच जेवणाचा डबा आल्याचे पाहून नेताजी गडबडले. " माझ्याबरोबर तुम्हीही जेवण करा असा आग्रह ते आम्हाला करत होते. " जुन्या आठवणींना उजाळा देत कॉम्रेड कोल्हटकर म्हणतात.
 
साम्राज्यशाही विरोधी परिषदेसाठी नंतर सुभाषबाबू नागपूरात आले तेव्हा परिषदेच्या आयोजकांनी त्यांचे मोठ्या थाटात स्वागत केले. कोल्हटकर आयोजक समितीचे सरचिटणीस होते. परिषदेच्या स्थळापर्यंत सुभाषबाबूंची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. यासाठी कोल्हटकर आणि प्रकृतींनी नागपूरातील भोसल्यांकडून मुद्दाम हत्ती मागवला होता.
 
हत्तीवर एकटे बसण्यास नेताजी संकोचत होते. त्यामुळे बी. टी. रणदिवे आणि इतर कम्युनिस्ट नेत्यांना 'तुम्हीही हत्तीवर बसावयास या म्हणून ते पुन्हापुन्हा सांगत होते. "पण सर्वांनी त्यांना नकार दिला आणि अखेर नेताजींना एकट्यानेच हत्तीवर स्वार होऊन मिरवणूकीत सामील व्हावे लागले, " हसतहसत कोल्हटकर सांगतात.
 
एस. वाय. कोल्हटकरांनी आज वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण केली असली,तरी कुठल्याही जाहीर सभेत बोलतांना त्यांच्या वृक्कृत्वात अजूनही जोश कायम असतो. कृश शरीरयष्टी असणाऱ्या या नेत्याने आपल्या दीर्घ आयुष्यात राजकीय, आर्थिक व सामाजिक अन्यायाविरुद्ध अगदी कडवा सामना दिलेला आहे. धारदार वक्तृत्वशैली लाभलेल्या या नेत्याचे खाजगीतील बोलणे मात्र अगदी सौम्य असते. बोलताना अधूनमधून ५५५ परदेशी सिगारेटचे झुरके घेण्याची सवय.
महाराष्ट्र राज्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीसपद आणि 'सिटू' या कामगार संघटनेचे उपाध्यक्षपद अनेक वर्षे सांभाळणाऱ्या या कम्युनिस्ट नेत्याचा स्वातंत्र्यचळवळीत आणि त्यानंतर अनेक राष्ट्रीय नेत्यांशी अगदी जवळून संबंध आला आहे.
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही सर्व मंडळी आपापल्या भिन्न वाटेने गेली, त्यापैकी काहींना सत्तालाभ झाला, काहींनी स्वतःस सत्तेपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले. 'यथा काष्ठ च काष्ठ च' या नात्याने त्यापैकी काहींचा नव्या वेगवेगळ्या भूमिकेत परस्परांशी संबंध आला, कधी संघर्षाचे नवे प्रसंगही निर्माण झाले.
 
कोल्हटकरांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात झाली ती त्यांनी १९३३ साली कामगार दिनानिमित्त सोलापुरात केलेल्या ब्रिटीशविरोधी भाषणातून. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्याविरुद्ध अटकेचे वॉरंट काढण्यात आले. अटक चुकविण्यासाठी कोल्हटकरांनी सोलापूर सोडले आणि ते मुंबईला गेले. पण पोलिसांचा ससेमिरा मुंबईतही सुटला नाही.
 
त्यांना अटक करण्यासाठी सी. आय. डी. ची माणसे मुंबईतही त्यांचा शोध करू लागली तेव्हा कम्युनिस्ट पक्षातील कोल्हटकरांच्या सहकाऱ्यांनी त्यांना 'भूमिगत व्हा' असा सल्ला दिला. तुरुंगात निष्क्रिय राहून दिवस मोजण्यापेक्षा भूमिगत राहून आपले कार्य चालूच ठेवण्याचा हा सल्ला कोल्हटकरांना पटला. भूमिगत होऊन त्यांनी नंतर मुंबईही सोडली आणि नागपूरला प्रयाण केले.
 
कोल्हटकर नागपूरात आले तेव्हा तेथे गिरणी कामगारांची चळवळ जोमाने चालू होती. कोल्हटकरांनी मग स्वतःस या चळवळीत गुंतवून घेतले.
 
समाजवादी काँग्रेसचे नेते जयप्रकाश नारायण आणि कोल्हटकरांची पहिली मुलाखत नागपूरात १९३४ साली झाली. . समाजवादी काँग्रेसच्या नागपूर आणि बेरार परिसरांत शाखा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेईल अशा व्यक्तीच्या शोधात त्यावेळी जयप्रकाश नारायण होते. अमरावतीचे कादंबरीकार पी. वाय. देशपांडे हे समाजवादी काँग्रेसचे कार्यकर्ते; पण देशपांडेंना आपला वकिलीचा व्यवसाय चालूच ठेवावयाचा होता. वकिलीमुळे पक्षाच्या कार्यास पुरेसा वेळ मिळणार नाही म्हणून या कार्यासाठी त्यांनी जयप्रकाशांना कोल्हटकरांचे म्हणजे एस. वाय. कुलकर्णीचे नाव सुचविले आणि जयप्रकाश स्वतः नागपूरात कोल्हटकरांच्या घरी पोहोचले.
 
'समाजवादी काँग्रेसचे काम तुम्ही कराल काय ?" जयप्रकाशांनी कोल्हटकरांना विचारले. या काळात कोल्हटकरांच्या पक्षावर ब्रिटीश सरकारने बंदी घातली होती, त्यामुळे आपल्या पक्षाचे कार्य उघड-उघड करणे कोल्हटकरांना शक्यच नव्हते. त्यामुळे समाजवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली कार्य चालू ठेवण्याची त्यांची तयारी होती. तरीसुद्धा त्यांनी जयप्रकाशांना सांगितले, " एक लक्षात ठेवा, मी आणि माझे सहकारी सध्या बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहोत."
 
पण ह्या बाबीमुळे कोल्हटकर प्रभुतींनी  समाजवादी काँग्रेसचे कार्य करण्यात अडचण निर्माण होईल असे जयप्रकाशांनी मानले नाही.” तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असतांना, समाजवादी काँग्रेसचे काम केले तर काही बिघडत नाही. मी स्वतः कार्ल मार्क्स आणि लेनिनचे विचार वाचले आहेत. समाजवादी काँग्रेसचे काम तुम्ही ताबडतोब सुरू करा.
 
जयप्रकाशांच्या सांगण्यानुसार कोल्हटकरांनी समाजवादी काँग्रेसचे कार्य सुरू केले. सेंट्रल प्रॉव्हिन्समधील समाजवादी विचारसरणीच्या मंडळींना एकत्र आणण्यासाठी या भागात अनेक दौरेही काढले. सुरुवातीस त्यांनी सेंट्रल प्रॉव्हिन्समध्ये समाजवादी काँग्रेसची प्रांतिय राजकीय परिपय आयोजित केली. स्वामी संपूर्णानंद या परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी अमरावतीला समाजवादी काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवरील परिषद भरवली. ज्येष्ठ समाजवादी नेते अच्युतराव पटवर्धन या परिषदेचे अध्यक्ष होते.
 
अमरावती परिषदेच्या निमित्ताने जयप्रकाश नारायण व इतर ज्येष्ठ समाजवादी मंडळी एकत्र आली तेव्हा हा प्रश्न उपस्थित झालाच. "कोल्हटकर कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचा समाजवादी काँग्रेसच्या कार्यात पुढाकार कसा?" असा प्रश्न परिषदेच्या वेळी झालेल्या एका बैठकीत मिनू मसानी यांनी जयप्रकाशांना विचारला.
 
“हो, आम्ही कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते ही गोष्ट खरीच, पण ही बाब आम्ही कधीच लपवून ठेवली नव्हती. जयप्रकाश इथे आहेतच, हवे त्यांना याबाबतीत विचारा." कोल्हटकरांनी ताबडतोब जयप्रकाशांकडे बोट दाखविले.
 
यानंतर कोल्हटकर आणि जयप्रकाश यांची मुलाखत तब्बल चाळीस वर्षानंतर आणि वेगळ्याच पार्श्वभूमीवर घडली. १९७४ सालची ही घटना. देश त्यावेळी विविध राजकीय समस्यांना तोंड देत होता. काँग्रेसेतेर राजकीय पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यावेळी जयप्रकाश प्रयत्न करत होते. यानिमित्त: ते मुंबईच्या दौऱ्यावर आले आणि एका बैठकीत ते आणि कोल्हटकर समोरासमोर आले.
 
चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा कोल्हटकर यांचा जयप्रकाश नारायण यांच्यांशी संबंध आला होता. भिन्न राजकीय विचारसरणी असतांनाही पूर्वी त्यांनी एकत्र कार्य केले होते. अशाच स्वरुपाचा योग पुन्हा एकदा निर्माण झाला होता. पण लवकरच देशात आणीबाणी लागू झाली, जयप्रकाशांसह अनेक राजकीय नेते गजाआड गेले.
 
नव्या जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तोपर्यन्त लोकनायक जयप्रकाशांची प्रकृति ढासळली होती. किडनीच्या आजारामुळे त्यांना मुंबईच्या जसलोक इस्पितळात दाखल करण्यात आले तेव्हा मार्क्सवादी पक्षाचे नेते, ई. एम. एस. नंबुद्रीपाद यांच्याबरोबर कोल्हटकर जयप्रकाशांना भेटण्यास गेले होते. कॉम्रेड कोल्हटकर यांची जयप्रकाशांशी झालेली ही अखेरची भेट.
 
पंडीत नेहरूंच्या अखेरच्या काळात 'हिंदी-चिनी भाईभाई' च्या घोषणा हवेत विरल्या आणि या दोन देशातील सीमाप्रश्नाने उग्र रूप धारण केले. तोपर्यन्त एकसंध असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये चीनप्रश्नावर उघडउघड दोन तट पडले.
 
चीनने भारतावर आक्रमण केले अशी सरळसरळ भूमिका कॉग्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या गटाने घेतली तर नंबुद्रीपाद, बी.टी. रणदिवे वगैरे नेत्यांनी ' हा सीमाप्रश्न आहे व तो केवळ वाटाघाटीच्या माध्यमाने सोडवण्यात यावा' अशी भूमिका घेतली.
 
कॉम्रेड कोल्हटकर यांचा समावेश यापैकी दुसऱ्या गटात होता. युद्धकाळात या गटातील अनेक नेत्यांना अटक करण्यात आली व त्यात कोल्हटकरांचाही सामवेश होता.
 
भारत-चीन युद्ध संपले आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातील सर्व बंडखोर सुटका झाली, त्यानंतर काही काळातच या बंडखोर गटाने मार्क्सवादी नेत्यांची कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. या नव्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारीणीचे कोल्हटकर सदस्य होते.
 
कार्यकारीणीची पहिली बैठक १९६४ च्या नोव्हेंबरात केरळमध्ये त्रिचूर येथे होणार होती, पण केरळ राज्यात प्रवेश करताक्षणी आपल्या पक्षाच्या सर्व नेत्यांना अटक होणार अशी कुणकुण त्यांच्या कानावर आली. त्रिचूरला जाण्याऐवजी भूमिगत होऊन कोल्हटकर सरळसरळ पुण्याला परतले आणि पुन्हा प्रकट झाले ते आठ महिन्यानंतरच.
 
स्वातंत्र्योत्तर काळात कोल्हटकरांनी आपले लक्ष मुख्य म्हणजे कामगार चळवळीवर केंद्रित केले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स ( CITU सिटू) या मार्क्सवादी पक्षाच्या कामगार संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम पाहिले. राजकीय चळवळीपेक्षा कामगार चळवळीस त्यांनी दिलेले योगदान कितीतरी पटीने अधिक आहे हे निश्चितच 'ट्रेड युनियनिझम हॅज ऑलवेज बीन माय फर्स्ट लव्ह' असे ते म्हणतात ते उगाच नाही.
 
गेल्या काही दशकांत देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढले, तसे इंग्रजी आणि प्रांतिक भाषांतील वृत्तपत्रांच्या संख्येत आणि खपातही प्रचंड वाढ झाली. स्वातंत्र्यापूर्वी अनेक वृत्तपत्रे ध्येयवादाच्या भूमिकेतून प्रसिद्ध केली जात, त्यात व्यवसायिकतेचा दृष्टीकोन नगण्य मानला जाई. स्वातंत्र्यानंतर मात्र या दृष्टीकोनात बदल झाला,
वृत्तपत्रांच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीचा फायदा वृत्तपत्रकर्मचाऱ्यांना मिळालाच असे नाही. मुंबई, दिल्ली, मद्रास आणि कलकत्ता यासारख्या मोठ्या शहरांतून प्रसिद्ध होणाऱ्या साखळी वृत्तपत्रसमूहातील कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी वेतन मिळू लागले; मात्र राज्यपातळीवरील आणि जिल्हापातळीवरील वृत्तपत्रकर्मचाऱ्यांना मात्र पुरेसे वेतन नव्हते आणि नोकरीची सुरक्षितताही नव्हती.
 
ही स्थिती बदलण्यासाठी देशातील वृत्तपत्र आणि वृत्तसंस्थाच्या कर्मचाऱ्यांसाठी संसदेने खास कायदा केला. वृत्तपत्रे खाजगी मालकीची असतानाही वृत्तपत्रकर्मचाऱ्यांचे वेतन ठरविण्यासाठी वेतन आयोग नेमण्याची तरतूद करण्यात आली. या मागण्यांसाठी प्रयत्न करणाऱ्या वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या नेत्यांमध्ये कोल्हटकर अग्रस्थानी होते.
 
ऑल इंडिया न्यूजपेपर एम्प्लॉयीज फेडरेशन या देशपातळीवरील वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या स्थापनेपासून म्हणजे गेली दोन दशके कोल्हटकर अध्यक्ष आहेत. मध्यंतरी ऑल इंडिया न्यूजपेपर एम्प्लॉयीज फेडरेशन, इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस्, आणि पी. टी. आय. आणि यु. एन. आय. या वृत्तसंस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा एक संयुक्त महासंघ स्थापन झाला. त्यावेळी या महासंघाच्या अध्यक्षपदी कोल्हटकरांचीच निवड झाली.
वृत्तपत्र कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कायदा निर्माण झाला, वेतन आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाच्या शिफारशीही सरकारने लागू केल्या, तरी वृत्तपत्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले नाही. देशातील बहुतांश छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांत या कायद्याची अथवा वेतन आयोगाच्या शिफारशींची अद्यापही अंमलबजावणी झालीच नाही.
१९६४ ते १९८६ या काळात वृत्तपत्र कर्मचाऱ्यांचे वेतन ठरविण्यासाठी नेमण्यांत आलेल्या शिंदे, पालेकर आणि बचावत वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रतिनीधी म्हणून कोल्हटकरांनी कार्य केलेले आहे.
 
कॉम्रेड कोल्हटकरांची आणि माझी सर्वप्रथम भेट झाली ती सहा वर्षांपूर्वी. आपल्या पत्नी श्रीमती मीनाक्षी आणि आखाती देशात वास्तव्य असलेल्या आपल्या मुलाच्या कुंटुंबासह कोल्हटकर गोव्याला विश्रांतीसाठी आले होते. त्यावेळी मी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस्चा सरचिटणीस होतो.
 
कोल्हटकरांच्या या गोवा-भेटीचा योग साधून त्यावेळी पणजी शहरात मी पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. देशातील वृत्तपत्र उद्योग आणि कामगार चळवळीतील अनेक प्रश्नांवर कोल्हटकरांनी या बैठकीत आपले मत मांडले..
 
आपल्या साम्यवादी विचारसरणीतील कुठलाही गहन मुद्दा साध्यासोप्या भाषेत मांडण्याची त्यांची हातोटी आणि त्यातून स्पष्ट होणारी त्यांच्या स्वभावातील पारदर्शकता यांचा माझ्या मनावर साहजिकच प्रभाव पडला.
गोव्यातील आणि नंतर देशपातळीवरील श्रमिक पत्रकार संघटनेच्या कार्यात त्यानंतर मी अधिकच गुरफटत गेलो, तसतसे कोल्हटकरांच्या स्वभावाचे अनेक पैलूंचे मला अधिकाधिक दर्शन होत गेले व त्यांच्याविषयीच्या आदराच्या भावनेत भर पडत गेली.
 
देशातील वृत्तपत्र उद्योगात नव्या वेतनवाढीसंबंधी विचार करण्यासाठा नेमण्यात आलेल्या बचावत आयोगाची सर्वप्रथम सुनावणी मुंबईत झाली तो प्रसंग अजून माझ्या स्मरणात आहे.
 
निवृत्त न्यायमूर्ती यू. एन. बचावत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या आयोगासमोर वृत्तपत्र उद्योगातील व्यवस्थापन आणि कामगार संघटनचे प्रतिनिधी आपापली बाजू मांडत होते. या अकरा-सदस्यीय आयोगामध्ये वृत्तपत्र व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींमध्ये इंडियन एक्स्प्रेसच्या सरोज गोयंका आणि इतर वृत्तपत्र मालकांचा समावेश होता, तर कामगार प्रतिनिधी मध्ये कॉम्रेड  कोल्हटकरमुद्धा होते.
 
वेतन आयोगासमोर आर्थिक आणि इतर बाजू मांडण्याचे कार्य बहुतांश वेळा कामगार संघटनातर्फे व्यवसायिक वकिल मंडळीच करतात. पण वकिल नेमण्याऐवजी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस्च्या सरचिटणीस या नात्याने मी स्वतःच गोव्यातील वृत्तपत्र उद्योगाची सुधारलेली आर्थिक बाजू मांडून नवी वेतनवाढ लागू करण्याची गरज मी या आयोगासमोर मांडत होतो.
 
देशातील वृत्तपत्र उद्योगातील बुजुर्ग मंडळीसमोर या जाहीर सुनावणीत बाजू मांडून त्यांच्या उलट तपासणीस तोंड देण्याचा प्रसंग यावेळी माझ्यावर आला. कामगार प्रतिनिधी वेतनवाढीसंबंधी बोलू लागले की, त्यावेळी या आयोगातील व्यवस्थापनांचे प्रतिनिधी अनेक प्रश्न उपस्थित करून त्या प्रतिनीधीस कोंडीत पकडत असत. अशावेळी अडचणीत सापडलेल्या कामगार नेत्यांच्या मदतीस आयोगातील कोल्हटकर आणि इतर कामगार प्रतिनीधी येत असत व सूचक प्रश्न विचारून बाजू उलटवत असत.
 
पंचविशीत असलेल्या माझा कामगार चळवळीतील अनुभव त्यावेळी अगदी जेमतेम होता. पण वेतन आयोगामध्ये कॉम्रेड कोल्हटकरांच्या उपस्थितीमुळे माझे मनोधैर्य वाढले आणि जवळजवळ साडेतीन तास मी या वेतन आयोगासमोर आपली बाजू मांडू शकलो.
 
वृत्तपत्र कामगारांच्या वतीने म्हणजे पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचाऱ्यांसाठी अशी वेतन आयोगासमोर बाजू मांडण्याची मला संधी मिळाली तशी आता कुणाला मिळेल किंवा या वृत्तपत्र उद्योग क्षेत्रात कुणी कामगार नेता म्हणून उतरेल असं आता वाटत नाही.
 
कॉम्रेड कोल्हटकरांच्या मार्गदर्शनाचा लाभ अशाप्रकारे देशातील अनेक कर्मचारी संघटनांना अणि कामगार नेत्यांना झालेला आहे. देशातील कामगार लढयातील विशेषतः वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यातील कोल्हटकर त्या अर्थाने पितामह आहेत यात शंकाच नाही.
 
सोव्हिएत रशियात व साम्यवादी राजवट असलेल्या इतर राष्ट्रांत राज्यकत्यांनी अंतर्गत लोकशाही स्थापन करण्यात दिरंगाई केली त्याचाच उद्रेक म्हणून संधी प्राप्त होताच जनतेने या राष्ट्रांतील राजवट उलथवून टाकली. असे कोल्हटकर म्हणतात. पण एक तत्वज्ञान म्हणून साम्यवाद अजूनही लोकप्रिय आहे हे पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीच्या सरकारची आणि क्युबा या देशात फिडेल कॅस्ट्रो याची लोकप्रियता यावरून सिद्धच होते, असे मांडतात.
 
##
 
`उत्तुंग' व्यक्तिचित्रसंग्रह- लेखक कामिल पारखे (प्रकाशक संजय सोनवणी - १९९३) या पुस्तकातील एक प्रकरण

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction