अवचट, (डॉ.) अनिल – profiles 

 डॉ. अनिल अवचट

 `गोव्यातून पुण्याला आलो आहे चार दिवसांसाठी.. उद्या सकाळी वैशालीत ये गप्पा मारायला..’’

त्यावेळी १९८९ला जलद संवादासाठी केवळ लँडलाईन फोनचा पर्याय होता. `इंडियन एक्सप्रेस'ला बातमीदार म्हणून रुजू झाल्यावर रानडे इन्स्टिट्युटसमोरच आणि वैशालीसमोर ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या मागे `मंथली कॉट' बेसिसवर मी राहत असलेल्या माझ्या लॉजवर मला हा निरोप मिळाला होता. 
 
पणजीला `द नवहिंद टाइम्स’ चा बातमीदार असताना देबाशिष मुन्शी या `टाइम्स ऑफ इंडिया’च्या गोवा प्रतिनिधीशी दोस्ती झाली होती. `टाइम्स ऑफ इंडिया’ च्या त्याच्या बड्या पगारानुसार पणजीत अल्तिन्हो येथे सरकारी कोट्यातून त्याला आलिशान फ्लॅट मिळाला होती.. तिथेच सर्किट हाऊसमध्ये राहणाऱ्या एका पुणेकराची त्याने मला ओळख करून दिली होती. 
 
या सद्गृहस्थाने मला हा निरोप पाठवला होता गंमत म्हणजे त्याचे नाव आता आठवत नाही. मात्र आठवते ती त्यांनी ओळख करून दिलेली ती व्यक्ती. 
 
वैशालीत जवळजवळ अर्धापाऊण तास आम्ही तिघे बसलो असणार. काही खाऊन झाल्यानंतर माझे चहाचे दोन कप पिऊन झाले होते आणि सिगारेटचे पाकीट अर्धे संपायला आले होते. आमच्या दोघांच्या विविध विषयांवर गप्पा चालू असताना ती तिसरी व्यक्ती मात्र आपल्या हातात असलेल्या लाकडाला आकार देण्यात दंग होती.
आमच्या संभाषणात त्या इसमाला मुळी इंटरेस्ट नव्हता. बिल देऊन झाल्यावर आम्ही तिघेही उठलो. ते लाकडी कोरीव काम आणि ती नाजुकशी हत्यारे शबनम बॅगेत टाकताना मात्र त्या व्यक्तीने आपले तोंड उघडलं आणि ती जे वाक्य बोललं ते आजही आठवतं. 
 
''एव्हढ्या सिगारेटी फुंकल्या, त्यांच्या किमतीच्या बदल्यात एक माणसाचा पूर्ण नाश्ता झाला असता !'
``कामिल, फार मनावर लावून घेऊ नकोस, व्यसनमुक्ती कामात हा गुंतलेला आहे, म्हणून त्याची ही प्रतिक्रिया,’’ माझा मित्र हसतहसत म्हणाला. 
 
मी अर्थातच त्या वाक्याकडे तेव्हा पूर्ण दुर्लक्ष केले. आपल्या मित्राच्या आग्रहाखातीर तिथे आलेल्या या व्यक्तीनं संभाषणात काही वाक्यही न बोलून माझ्याकडे सरळसरळ दुर्लक्ष केल्याबद्दल नाहीतरी मला तिडीक आली होतीच.
माझ्या सिगारेट फुंकण्याबद्दलचे ते वाक्य तीसबत्तीस वर्षानंतर आजही आठवतं याचं कारण म्हणजे मला त्या व्यक्तीच्या कामाची आणि एकूण व्यक्तिमत्त्वाची ओळख नंतर झाली होती त्यामुळं. 
 
धक्कादायक म्हणजे माझ्याप्रमाणेच ती व्यक्तीसुद्धा एकेकाळी पत्रकार होती आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात त्या माणसानं खूप मोठं काम केलं होतं याची जाणिव झाल्यानंतर मी एक बातमीदार म्हणून त्यांच्याशी जरासे आढ्यताखोरतेने पद्धतीने वागलो होतो याबद्दल स्वतःशीच खजिल झालो. 
 
त्या व्यक्तीचं नाव अर्थात डॉ. अनिल अवचट असं होतं. 
 
दिड दशके मी गोव्यात असल्याने आणि याकाळात तेथे मराठी दैनिके किंवा पुस्तके अजिबात वाचत नसल्याने पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या बारीकसारीक घडामोंडीची मला माहिती असणे शक्य नव्हते. 
 
पुण्यात आल्यावर बातमीदार म्हणून पहिल्या दिवशी भरत नाट्य मंदिरात नरुभाऊ लिमये यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित सत्कार समारंभात मी हजर होतो. त्यावेळी `कोण आहेत हे नरूभाऊ लिमये ?’ असा माझा साहजिकच प्रश्न होता. नंतर पुण्यात नरुभाऊ लिमये हे पुण्याच्या समाजकारणात, राजकारणात आणि सहकार क्षेत्रातले खूप मोठे प्रस्थ आहे हे लक्षात आलेच.
 
त्यादिवशी डॉ अनिल अवचट यांच्याबाबत असेच घडले होते. 
 
डॉ अवचट यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल मग मला पत्रकार या नात्याने अधिकाधिक माहिती होत गेली. 
 
त्या घटनेनंतर एका लेखाच्या निमित्ताने एकदा डॉ अनिल अवचट यांच्या पत्रकार नगरमधल्या घरी गेलो तेव्हा थेट त्यांच्याशी बोलणे झाले आणि त्यांच्या कामाबाबत आणि विविध छंदांबाबत सविस्तर चर्चा झाली. या भेटीत त्यांचं बासरीवादन ऐकल्याचे आठवते. नंतर येरवडा येथे असलेल्या त्यांच्या 'मुक्तांगण' व्यसनमुक्ती केंद्रालासुद्धा मी याच काळात भेट दिली होती. 
 
`इंडियन एक्सप्रेस’ मध्ये असताना काही काळ माझ्याकडे प्रसिद्धी पत्रके आणि इतर माध्यमांतून स्थानिक बातम्या देण्याचे काम होते. एकदा एक बातमी फोटोसह मला कुणीतरी आणून दिली आणि मी ती दिली नाही.
 
दोनतीन दिवसांनी ती बातमी देणारा शिडशिडीत अंगाचा एक तरुण मला पुन्हा भेटला आणि त्या बातमीविषयी मला विचारले.``वाढदिवसाच्या बातम्या आमचे दैनिक देत नाही,’’ असं मी त्याला सांगितलं
 
तेव्हा `एक अपवाद’ म्हणून वाढदिवसाची ती बातमी छापा असे तो म्हणाला.
 
``आमच्या मॅडमचा हा शेवटचा वाढदिवस असणार आहे , ही बातमी आणि केक कापल्याचा फोटो त्यांना आनंद देईल !'' असं तो म्हणाला तेव्हा मी चरकलो. 
 
दुसऱ्या दिवशी संक्षिप्त रूपात ती बातमी प्रसिद्ध झाली. 
 
काही दिवसांनी मुक्तांगण चालवणाऱ्या आणि खूप वर्षे रक्ताच्या कॅन्सरशी झुंज देणाऱ्या डॉ अनिता अवचट यांचे निधन झाल्याची बातमी मी दिली.
.
यानंतरच्या काळात डॉ अनिल अवचट यांनी लिहिलेली अनेक पुस्तके मी वाचली. 
 
मी लिहिलेल्या आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या मदतीने २००० साली प्रकाशित झालेल्या `महाराष्ट्र चरित्रकोश ( इ स,१८०० ते इ स, २००० )'' या पुस्तकात डॉ अनिल अवचट आणि डॉ अनिता अवचट या दोघांबद्दलही नोंदी आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या कुठल्या तरी कामाची समाजात अनेक दिवस चर्चा व्हावी, त्याचे तीव्र अनुकूल आणि प्रतिकूल पडसाद पडावे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे एका क्रांतीला किंवा एका नव्या पर्वाला जन्म द्यावा असे क्वचितच घडते. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस पत्रकार अरुण साधू यांच्या राजकीय कांदबऱ्यांनी इतिहास घडवला होता.
पत्रकारितेच्या क्षेत्रात असताना डॉ अनिल अवचट यांच्या बाबतीत हे पन्नास वर्षांपूर्वी घडले. आजही त्यांच्या त्या योगदानाबद्दल चर्चा घडते हे विशेष.
 
`दलित पँथर' ही संघटना जन्माला येत असताना `साधना' साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीचा रौप्यमहोत्सवानिमित्त १९७२ साली १५ ऑगस्टला काळा स्वातंत्र्यदिन विशेषांक काढला. यदुनाथ थत्ते `साधना'चे संपादक होते त्या अंकात असलेल्या राजा ढाले यांच्या लेखातील राष्ट्रध्वजाबाबत असलेल्या एका परिच्छेदाने खळबळ माजवली आणि इतिहासही घडवला.
 
चालू २०२२ हे स्वातंत्र्यप्राप्तीचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि त्याचप्रमाणे दलित पँथरच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष. `दलित पँथर'च्या प्रमुख संस्थापकांपैकी एक असलेल्या अर्जुन डांगळे यांनी लिहिलेले `दलित पँथर अधोरेखित सत्य; हे पुस्तक लोकवाङमयगृहाने अलीकडेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात डांगळे यांनी या `साधना' साप्ताहिकाच्या या काळा स्वातंत्र्यदिन विशेषांकाविषयी विस्तृतपणे लिहिले आहे. 
 
डांगळे लिहितात : जून १९७२चा तिसरा आठवडा असावा . नक्की आठवत नाही. `युवक क्रांती दल' आणि `युवक आघाडी'च्या कार्यकर्त्यांची एक बैठक सिद्धार्थ वसतिगृहात आयोजित करण्यात आली होती. तिला प्रा. मे. पु. रेगे सर, डॉ अनिल अवचट वगैरे उपस्थित होते. यावेळी डॉ. अवचटांनी म्हटले, `हे भारतीय स्वातंत्र्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. `साधना'च्या ह्या वर्षीच्या अंकात 'दलित समाज आणि अन्याय अत्याचार' हा केंद्रबिंदू असणार आहे. `काळा स्वातंत्र्यदिन' असा हा विशेषांक आहे. 
 
या विशेषांकात राजा ढाले, दया पवार, मोरेश्वर वाहणे, प्रल्हाद चेंदणकर आणि अर्जुन डांगळे यांचे लेख होते, त्याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागांतील दलित विद्यार्थी कार्यकर्ते ह्यांचेही अनुभव सांगणारे लेख होते. 
 
अर्जुन डांगळे लिहितात: ''खरे म्हणजे हा विशेषांक प्रचलित समाज वास्तवाचा दस्तऐवज म्हणून गाजायला हवा होता. पण या अंकातील राजा ढाले यांच्या लेखामुळे सगळे लेख झाकोळले गेले होते. '
 
राष्ट्रध्वजाविषयी राजा ढाले यांनी लिहिलेला मजकूर काय होता ते पाहू ... '' 
 
''लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःला दलित म्हणवून घेणे वेगळं आणि प्रत्यक्षात दलित, उपेक्षित म्हणून जगणं वेगळं नि लढ्याला सामोरं जाणं वेगळं. ….. राष्ट्रध्वज म्हणजे निव्वळ कापड. विशिष्ट रंगांत रंगवलेलं प्रतीक. प्रतिकाचा अपमान झाला तर ३०० रु. दंड नि सोन्ना गावच्या सोन्यासारख्या प्रत्यक्षातील चालत्याबोलत्या स्त्रीचं पातळ फेडलं तर ५० रुपये दंड ! .... राष्ट्र हे लोकांचं बनतं. त्यातल्या लोकांचं दुःख मोठं की प्रतिकाच्या अपमानाचं दुःख मोठं? मोठं काय? आपल्या अब्रूची किंमत एका पातळ्याच्या एव्हढी?' 
 
झालं, `साधना' साप्ताहिकाच्या या विशेषांकाच्या प्रकाशनानंतर राजा ढाले यांच्या लेखातील या परिच्छेदामुळे पुढे मोठे महाभारत घडले. 
 
''लिखाणातून आणि वक्तृत्वातून प्रक्षोभक आक्रमक विधाने निर्भीडपणे करणे हा राजा (ढाले) आणि नामदेव (ढसाळ ह्या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा समान गुण होता. 'दलित पँथर'चे विरोधक ह्या भाषेला 'शिवराळ' म्हणत,'' असे अर्जुन डांगळे यांनी या पुस्तकात म्हटले आहे. 
 
हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा नामदेव ढसाळ यांचा विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना असलेला 'गोलपिठा' काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला होता, गाजलेली दलित आत्मकथनं तोपर्यंत प्रसिद्ध झाली नव्हती. त्यामुळे ढाले यांच्या शब्दयोजनेमुळे मोठे वादळ निर्माण झाले यात आश्चर्य नव्हते. 
 
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याबद्दल `साधना'चे संपादक आणि कार्यकारी संपादक यांनी अवचट यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली, हे राजीनामे दिले गेले. `साधना'चे विश्वस्त समाजवादी नेते एस एम जोशी यांनी या प्रकाराबद्दल माफी मागावी अशी मागणी होती, त्याप्रमाणे एसेम यांनी माफी मागितली सुद्धा. पुणे महापालिकेने `साधना'चा निषेध करणारा ठराव मंजूर केला आणि `साधना'चे संपाद्क यदुनाथ थत्ते, डॉ अनिल अवचट आणि राजा ढाले यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली. `साधना' च्या कार्यालयासमोर मोर्चा आयोजित केला गेला, `साधना' अंकाची होळी पेटवली गेली . 
 
याविषयीची इत्यंभूत माहिती खुद्द डॉ अनिल अवचट यांनी आपल्या खास खुमासदार आणि तिरकस शैलीत `साधना'च्या ८ सप्टेंबर १९७२च्या अंकात लिहिली आहे. डांगळे यांनी `साधना'तील अवचटांचा हा लेखसुद्धा आपल्या पुस्तकात एक परिशिष्ट म्हणून दिला आहे.
 
आता नमुन्यादाखल हे काही परिच्छेद पाहा
 
``इकडे पुणे महापालिका पाहा. अरेच्या, साधना यांच्यापर्यंत पोहोचली वाटते. काँग्रेसच्या शिवाजी मावळ्यांनी ( पूर्वाश्रमीची शिवसेना ) तहकुबी मांडली. आमच्या राष्ट्रध्वजाचा अपमान. हात कलम केले पाहिजेत, चौकात फटके मारले पाहिजेत. इत्यादी. भाई वैद्य ह्यांनी हा राष्ट्रध्वजाचा अपमान नसून दलित तरुणाने व्यक्त केलेली तिडीक आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. आज तहकुबी, उद्या होळी, परवा मोर्चा.
 
मोर्चात दिड दोनशे मंडळी . एकाला वाटले साधना नटीनेच राष्ट्रध्वजाचा अपमान केला. तो म्हणाला, ''सालं काय नडलं होतं असं तिला करायचं? पण मग हा यदुनाथ थत्ते कोण?''
 
``मोर्चा आला. घोषणा सुरु झाल्या. मोर्च्याबरोबर दोन काठीवर नाचवत राष्ट्रध्वज आणले होते, ते उभे केले गेले. तिरडी पेटवली गेली. `यदुनाथ थत्त्याला खाली आणा’’ अशा घोषणा सुरु झाल्या. थत्ते त्यांच्या समोरच उभे होते. पोरांना लोकांनी सांगितले `हे थत्ते’ तेव्हा त्यांना पटले नाही. कारण घोषणा देऊन देऊन थत्त्यांची जी इमेज त्यांच्या मनात तयार झाली होती, ती अशी नव्हती.’’
 
मोर्च्यांसमोर काहींची भाषणे झाली,
 
``मग एस एम ला बोलायला दिले. ते दलित, महात्मा गांधी वगैरे बोलू लागताच ``अरे, याला बोलू देऊ नका. पोरांना ते पटलं तर घोटाळा होईल’’ असे म्हणून गडबड आणि रेटारेटी सुरु झाली. पोलिसांनी पुढे येऊन मुलांना मागे रेटले. शेवटी शिष्टमंडळ वर न्यायचे आणि बोलणी करायची असे ठरले. जाताना ``त्या एस एम ला आणखी त्या थत्त्याला झेंड्यासमोर येऊन नाक घासायला लावा’’ अशी मागणी खालच्या पोरांनी केली. 
 
निदर्शकांचे शिष्टमंडळ साधना कार्यालयात होते ``तेव्हा नरुभाऊ लिमये तिथे आले. तेव्हा भीम बडदे बोलत होते. ``असा अपमान आम्ही सहन करणार नाही, वगैरे’’ त्याला समजावले की ``कोणाला तू हे सांगतोस? एसेमना ? अरे त्यांनी राष्ट्रध्वजासाठी काय केले, हे माहीत आहे का ?’’ 
 
या प्रकरणात नंतर दलित मंडळी साधनाच्या बाजूनं उभी राहिली. 
 
``अहिल्या आश्रमाचे आवर येथून दलितांचा मोर्चा निघणार होता. परवाच्या काँग्रेस- जनसंघी मोर्चाच्या स्वरूपामुळे सर्वच जण खडबडून जागे झाले होते. पहिल्यापहिल्यांदा साधनाविरुद्ध असलेली लोकांची मने आता अनुकूल होऊ लागली होती. ‘’
 
त्या मोर्च्यासमोर एस एम जोशी यांनी घोषणा केली की ``संपादकांचे राजीनामे आम्ही स्वीकारणार नाही.'' टाळ्यांचा कडकडाट."
 
राजा ढाले यांच्या राष्ट्रध्वजाविषयीच्या वादग्रस्त शब्दप्रयोगाविषयी यांनी अवचट लिहितात. 
 
``प्रतीके ही माणसांनी माणसांसाठी केलेली असतात वरिष्ठ माणसांनी माणुसकी सोडली तर ज्यांच्यावर पिढ्यान् पिढ्या जुलूम झाला आहे त्यांनी त्यांच्या भाषेत निषेध नोंदविला तर काय गैर आहे तेच कळत नाही. ढाले आणि त्यांचे मित्र यांची हीच भाषा आहे हे मला माहीत आहे. त्यांच्या दृष्टीने या शब्दाला आपल्याला वाटतो तितका भयंकरपणा नाही. भाषा कडक आहे पण तिच्यात ध्वजाचा अपमान करण्याचा हेतु नाही, असे वाटते आणि दुसरे असे कि या अंकात या समाजाविषयी अस्पृश्य तरुण काय बोलतात हेच दाखवायचे होते. दुर्गा भागवतांचा वैयक्तिक उल्लेख गळायला हवा होता, हे समजू शकते. पण राष्ट्राविषयी आणि समाजाविषयी ते बोललेले आम्ही संपादित केले असते तर तो दलितांवरचा आणखी एक अत्याचारच ठरला असता.’’
 
साधना'च्या या लेखामुळे आणि विशेषांकामुळे `दलित पँथर' हे नाव झाले, ''तोपर्यंत `दलित पँथर' ही एक बातमी व मर्यादित चळवळ होती'', असे डांगळे यांनी लिहिले आहे. 
 
या विशेषांकांच्या पुर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीविषयी डॉ अवचट यांनी लिहिले आहे. '' वडाळ्याला आंबेडकर कॉलेजच्या शेजारी सिद्धार्थ विहार वसतिगृहाची चार मजली इमारत आहे. तिथे चौथ्या मजल्यावर १०५ क्रमांकाची खोली आहे. पँथरच्या इतिहासात ह्या खोलीचे स्थान फार मोठे आहे. पँथरची कल्पना, स्थापना, महत्त्वाच्या हालचाली ह्याच खोलीतून झाल्या आहेत. 'साधना'च्या रौप्यमहोत्सवी 'काळा स्वातंत्र्यदिन विशेषांक' संपादित करीत असता तिथे लिहू इच्छिणाऱ्या दलित मुलांची बैठक तिथेच घेतली होती. तेव्हा पँथरची स्थापना व्हायची होती. पण ह्या नावाची चर्चा मात्र तिथे झाली होती. '' 
 
जुलै १९७२ ला दलित पँथर'च्या स्थापनेवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. त्याआधीच `साधना'च्या या विशेषांकाचे आणि लेखांचे नियोजन झाले होते, त्या अर्थाने अवचट यांनी काढलेला हा विशेषांक आणि राजा ढाले यांचा स्फोटक लेख हा दलित पँथरचा Baptism in Fire किंवा अग्नीत झालेला बाप्तिस्मा असेच म्हणता येईल. 
 
अल्पकालीन म्हणजे केवळ अडीच वर्षे मात्र खूप महत्त्वपूर्ण आयुष्य लाभलेल्या `दलित पॅंथर'चा इतिहास लिहिणाऱ्या कुणालाही `साधना'चा हा विशेषांक आणि राजा ढालेंचा लेख याकडे कानाडोळा करता येणार नाही. 
 
यादृष्टीने डॉ अनिल अवचट यांचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि पत्रकारितेतील योगदान सुद्धा अधोरेखित होते.
 

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction