I have a dream: मार्टिन ल्युथर किंग (जुनियर)


I have a dream, a song to sing हे ABBA या ग्रुपने गायलेले सत्तरच्या दशकातील गाणे माझे खूप आवडते आहे. गोव्यात धेंपे कॉलेजात हायर सेकंडरीत शिकताना ऐकलेले हेे सुंदर रोमँटिक गाणे आहे. अलिकडच्या काळात किबोर्डवर हे गाणे वाजवायलासुद्धा मी शिकलो आहे.
या गाण्याचे शब्द, संगीत आणि आबा ग्रुपच्या गायिकांचा आवाज या सर्वांची एक वेगळीच जादू आहे.
I have a Dream, a song to sing
To help me cope, with anything
If you see the wonder, of a fairy tale
You can take the future, even if you fail
I believe in angels
Something good in everything I see
I believe in angels
When I know the time is right for me
I'll cross the stream, I Have a Dream
त्याशिवाय " I have a dream' याच शिर्षकाचे मार्टिन ल्युथर किंग (जुनियर) या आफ्रो-अमेरिकन नेत्याचे मानवी हक्क आणि समानता याविषयीचे भाषण मला अलिकडच्या काळात खूप भावले.
मानवी इतिहासात अजरामर ठरू शकतील अशा भाषणांत पंडित नेहरुंचे 'नियतीशी करार' हे भाषण, अब्राहाम लिंकन यांचे गेटीसबर्ग येथील 'गव्हर्नमेंट ऑफ द पिपल, बाय द पिपल, फॉर द पिपल' हे भाषण समाविष्ट केले जाते.
मार्टिन ल्युथर किंग (ज्यू.) यांचे हे भाषण अशाच प्रकारचे.
या भाषणातील एक वाक्य असें:
'माझे एक सुंदर स्वप्न आहे की आता छोटी असलेली माझी चार मुले एक दिवस अशा राष्ट्रात राहातील की जेथे त्यांच्या गुणांची पारख केवळ त्यांच्या कातडीच्या रंगावरून केली जाणार नाही. त्यांच्या गुणांची पारख त्यांच्या वर्तनावरून आणि स्वभाव वैशिष्ट्यांवरूनच केली जाईल. ''
( किंग यांच्या या चार मुलांपैकी थोरला मुलगा मार्टिन ल्युथर किंग (तिसरा) आपल्या आईवडिलांच्या 1959 च्या भारतदौऱ्याच्या सुवर्णमहोत्सवनिमित्त २००९ साली भारतात आला होता )
मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांच्या नेतृत्वाखाली वॉशिंग्टनमध्ये 28 ऑगस्ट 1963 रोजी भरलेला मेळावा म्हणजे जागतिक नागरी हक्कांच्या चळवळीतील एक रोमांचकारी घटना. या मेळाव्याने काळ्या लोकांच्या मागणीकडे सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले.
’मार्च ऑन वॉशिंग्टन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मेळाव्यात अब्राहाम लिंकन यांच्या भव्य स्मारकासमोर उभे राहून या लोकांनी वंशवादास विरोध केला
मानवी संस्कृतीच्या इतिहासातील समानतेच्या लढ्यात अब्राहाम लिंकन यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्या राष्ट्रातील निग्रो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना त्या देशाच्या स्वतंत्र नागरिकत्वाचे हक्क लिंकन यांनी प्रदान केले होते.


मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांचे हे ते भाषण .....
” आज येथे आपल्याबरोबर या मेळाव्यात उपस्थित राहण्यात मला खूप आनंद होतो आहे. स्वातंत्र्याच्या मागणीसाठी झालेले सर्वांत मोठे आंदोलन म्हणून या मेळाव्याची आपल्या राष्ट्राच्या इतिहासात नोंद होणार आहे.
एका अमेरिकनाने (अब्राहाम लिंकन) एक शतकापूर्वी मानवमुक्तीच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली त्या महान व्यक्तीच्या स्मारकापुढे आज आपण येथे जमलो आहोत.
या दस्तऐवजामुळे लाखो निग्रो गुलामांची गुलामगिरीतून सुटका झाली. मात्र शंभर वर्षांनंतरही निग्रो मुक्त नाहीत. एक शतकाच्या कालावधीनंतर आजही निग्रो लोक वर्णभेदाच्या आणि भेदभावाच्या शृंखलाच्या बंधनात आहेत.
एक शतकानंतर आजूबाजूला भौतिक सुबत्तेचे महासागर असताना निग्रो लोक आजही दारिद्रयाच्या निर्मनुष्य बेटावर जगतो आहे. शंभर वर्षांनंतर आजसुध्दा निग्रो माणूस अमेरिकन समाजाच्या एका कोपऱ्यात खितपत पडला आहे. आपल्या स्वत:च्याच भूमीवर असून ते अज्ञातवासात आहेत. म्हणून ही लज्जास्पद परिस्थिती बदलण्यासाठी आज आपण सर्व येथे जमलो आहोत.
आपल्या देशाच्या राजधानीत एका अर्थाने आपण एक चेक वटविण्यासाठीच आलेलो आहोत. आपल्या प्रजासत्ताकाच्या शिल्पकारांनी राज्यघटना आणि स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला तेव्हा ते सर्व अमेरिकन नागरिकांसाठी एका हुंडीवर म्हणजे प्रॉमिसरी नोटवरच स्वाक्षरी करत होते.
अमेरिकेतील सर्व नागरिकांना - हो, काळ्या आणि गोऱ्या वर्णाच्या सर्वांना - त्यांच्यापासून कधीही हिरावून न जाणाऱ्या जगण्याच्या, स्वातंत्र्याच्या आणि आपले सुखसमाधान मिळवण्याच्या हक्कांची या हुंडीवर हमी देण्यात आली होती.
अमेरिकेने आपल्या काळ्या नागरिकांच्या बाबतीत तरी या प्रॉमिसरी नोटेचा अनादर केला आहे, ही हुंडी निग्रो लोकांसाठी वटली जात नाही.
ही प्रॉमिसरी नोट वटवून घेऊन आपले पवित्र कर्तव्य पार करण्याऐवजी अमेरिकेने निग्रो लोकांना जो कधीही वटला जाणार नाही असा चेक दिला आहे. बँकेत वटण्यासाठी सादर केला तर त्यावर ’‘अपुरा निधी’ असा शिक्का मारून हा चेक परत केला जात आहे.
मात्र न्यायाची बँक दिवाळखोर झाली आहे हे आम्ही कधीही मान्य करणार नाही. त्यामुळे आम्हाला दिला गेलेला हा चेक वटविण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. हा चेक सादर करून मागणी करताच आम्हाला स्वातंत्र्य आणि न्यायाची सुरक्षा मिळायला हवी.
आमची मागणी अगदी तातडीने मान्य व्हावी यासाठी आम्ही या पवित्र स्थळी जमलो आहोत. लोकशाही तत्त्वाचे आश्वासन पूर्ण करण्याची ही वेळ आहे. वांशिक अन्यायाच्या घसरत्या वाळूवर असलेले आपले राष्ट्र बंधुभावाच्या मजबूत खडकावर उभे करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. देवाच्या सर्व लेकरांना न्यायाची वागणूक देण्याची वेळ आली आहे. ही मागणी मान्य करण्याच्या निकडीकडे दुर्लक्ष करणे आत्मघातक ठरेल.
निग्रो लोकांच्या कायदेशीर असंतोषाचा हा धगधगता ग्रीष्म ऋतू स्वातंत्र्य आणि समतेचा शरद ऋतू आल्याशिवाय संपणार नाही. हे 1963 साल अखेर नाही तर केवळ सुरूवात आहे.
निग्रो लोकांच्या असंतोषाची वाफ केवळ बाहेर पडण्याची गरज होती आणि आता ते साध्य झाल्यानंतर ते शांत राहतील असा कुणाचा समज असेल आणि त्यामुळे या राष्ट्राने पुन्हा ’जैसे थे’ स्थिती स्वीकारली तर मग या लोकांना एक कठोर धक्का बसणार आहे.
जोपर्यंत निग्रो लोकांना नागरिकत्व दिले जात नाही तोपर्यंत अमेरिकेत शांतता वा स्वैर्थ नांदणार नाही. न्यायाचा तेजस्वी दिन उजाडत नाही तोपर्यंत उद्रेकाचे घोंघावणारे वादळ आपल्या राष्ट्राच्या पायाला जोरदार धक्के देत राहणार आहे.
मात्र न्यायप्रासादाच्या उंबरठ्यावर आत जाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या माझ्या या लोकांना एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायलाच हवी. आपले न्याय्य हक्क प्राप्त करण्याच्या या प्रक्रियेत आपण काही चुकीची कृत्ये करता कामा नये. कटुतेच्या आणि द्वेषाच्या कपातून पाणी पिऊन स्वातंत्र्याची आपली ही तृषा भागविण्याचा प्रयत्न आपण करू नये.
आपला हा संघर्ष सदैव सभ्य आणि शिस्तीच्या मार्गाने चालू राहायला हवा. आपले सर्जनशील आंदोलन हिंसेच्या खालच्या पातळीवर जाता कामा नये. मनगटी बळाचा सामना आपण आत्मिक बळाने करून संघर्षाची उच्च पातळी आपण कायम राखायला हवी.
निग्रो समाजात अलिकडेच आश्चर्यकारक आक्रमकता निर्माण झाली आहे. मात्र त्यामुळे आपण गौरवर्णीय लोकांचा द्वेष करता कामा नये, कारण काळ्या अणि गोऱ्या लोकांचे भवितव्य एकमेकांशी गुंफले आहे हे अनेक गौरवर्णीय बांधवांना आता समजून चुकले आहे. त्यामुळेच यापैकी काही गौरवर्णीय आपल्या या मेळाव्यात आज उपस्थित राहिले आहेत.
त्यांचे आणि आपले स्वातंत्र्य एकमेकांपासून अलग करण्यासारखे नाही. आपणा दोघांनाही यापुढची वाटचाल एकमेकांच्या साथीने करायची आहे. अशा परिस्थितीत आपल्याला ’एकला चलो रे’ असे म्हणताच येणार नाही.
आपली ही वाटचाल चालू ठेवताना आपण प्रतिज्ञा करू या की आपण नेहेमीच आगेकूच करत राहू. आपल्याला मागे परतता येणार नाही.
नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांना काही जण विचारतात, ‘’तुमचे समाधान तरी कधी होणार आहे?”
निग्रो लोकांची पोलिसांच्या निर्घृण अत्याचारांपासून सुटका होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
जोपर्यंत दीर्घ प्रवासाने थकलेल्या आमच्या शरीरास हमरस्त्यांवर, मॉटेलांत आणि शहरातील हॉटेलांत विश्रांतीसाठी प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
छोट्या झोपडपट्टीतून जरा मोठ्याशा झोपडपट्टीत स्थलांतर करणे इतकीच आमची जोपर्यंत प्रगती असेल तोपर्यंत आम्ही स्वस्थ, समाधानी राहणार नाही.
”फक्त गोऱ्या लोकांसाठीच’ असे लिहिलेल्या फलकांनी आमच्या लहान मुलांच्या अस्मितेला आणि प्रतिष्ठेला धक्का बसत राहील तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
जोपर्यंत मिसिसीपी राज्यातील निग्रो लोकांना मतदानाचा अधिकार मिळत नाही आणि न्यूयॉर्क येथील निग्रोला मतदान करण्यात काही अर्थ नाही असे वाटत राहील तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
नाही, नाही, जोपर्यंत न्याय वाहत्या पाण्यासारखा आणि सदाचरण, प्रामाणिकता एखाद्या मोठ्या झऱ्यासारखा प्रचंड शक्तिनिशी वाहात नाही तोपर्यंत आम्ही शांत, स्वस्थ बसणार नाही.
तुमच्यापैकी काही जणांनी खूप त्रास आणि यातना सहन केल्या आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. तुम्हापैकी काही जणांची अलीकडेच अरूंद तुरूंग कोठडीतून सुटका झाली असेल. तुमच्यापैकी काही जणांनी स्वातंत्र्यासाठी लढताना पोलिसांचे अत्याचार सहन केले असतील. विनाकारण त्रास आणि यातना सहन केल्या असल्या तरी भावी काळात त्यामुळे आपल्याला नक्कीच लाभ होणार आहे असा विश्वास राखून आपले कार्य सतत चालू ठेवा.
आता तुम्ही मिसिसीपी, ॲलाबामा, दक्षिण कॅरोलिना, जॉर्जिया, लुझियाना य आपापल्या राज्यांत परत जा, आपल्या दक्षिणेतील झोपडपट्टींत आणि वस्तींत परत जा आणि ही परिस्थिती बदलता येणे शक्य आहे आणि तसे नक्की होणार आहे हे लक्षात असू द्या. आज आणि उद्या आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
असे असले तरी माझे एक स्वप्न आहे आणि हे स्वप्न अमेरिकेच्या स्वप्नातच खोलवर रूजलेले आहे.
माझे असे एक स्वप्न आहे कि एक दिवस हे राष्ट्र आपले हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवेल: ”आम्ही हे सत्य मानतो कि सर्व मानवजातीची समान दर्जावर निर्मिती झाली आहे.”
माझे एक सुंदर स्वप्न आहे. जॉर्जियाच्या तांबड्या माळावर एके काळच्या गुलामांचे वंशज आणि एके काळच्या गुलामांच्या मालकांचे वंशज बंधुभावाने जेवण्यासाठी एकाच टेबलाभोवती जमली आहेत.
माझे असे एक स्वप्न आहे की अन्यायाच्या आणि दडपशाहीच्या आगीने धगधगणारे मिसिसीपी राज्य एक दिवस स्वातंत्र्य आणि न्यायाचे ओॲसिस बनून जाईल.
माझे एक सुंदर स्वप्न आहे की आता छोटी असलेली माझी चार मुले एक दिवस अशा राष्ट्रात राहातील की जेथे त्यांच्या गुणांची पारख केवळ त्यांच्या कातडीच्या रंगावरून केली जाणार नाही. त्यांच्या गुणांची पारख त्यांच्या वर्तनावरून आणि स्वभाव वैशिष्ट्यांवरूनच केली जाईल.
माझे असे एक स्वप्न आहे की एक दिवस वंशभेद पाळल्या जाणाऱ्या ॲलाबामा राज्यातील छोट्याशा काळ्या मुलांना आणि काळ्या मुलींना तेथील छोट्याशा गोऱ्या मुलांचे आणि गोऱ्या मुलींच्या हातात हात गुंफणे शक्य होईल आणि त्यांच्यात बंधुत्वाचे नाते निर्माण होईल.
माझे एक सुंदर स्वप्न आहे की एक दिवस सर्व दऱ्याखोऱ्यांमधील खोल अंतर बुजवले जातील, प्रत्येक टेकडी-डोंगराची उंची कमी केली जाईल, खडबडीत आणि काही ठिकाणी उंच तर काही ठिकाणी खोल असलेल्या जागा समपातळीच्या केल्या जाईल, नागमोड्या वळणाच्या जागा सरळ केल्या जातील. प्रभूचा महिमा आणि कीर्ती सर्व जगाला प्रकट होईल आणि सर्व लोक याची एकत्रितरित्या अनुभूती घेतील.
असे होईल अशी आम्हां सर्वांची आशा आहे. ही आशा आणि श्रध्दा बरोबर घेऊन वर्णभेद पाळणाऱ्या अमेरिकेच्या दक्षिण राज्यांत मी परतणार आहे. याच श्रध्देच्या बळावर आपल्याला नैराश्याचा डोंगर खणून त्यातून आशेची शिला कोरणे शक्य होईल. याच विश्वासाच्या बळावर आपल्या राष्ट्रातील विसंवादाच्या कर्कश गोंगाटाचे रूपांतर बंधुत्वाच्या मधुर सुरांमध्ये करणे आपल्या शक्य होईल.
या श्रध्देमुळे आपल्या सर्वांना एकत्रितरित्या काम करणे, एकत्र प्रार्थना करणे, सर्वांनी एकत्रितरित्या लढा पुकारणे, तुरूंगात एकमेकांच्या साथीने जाणे आणि स्वातंत्र्याचा एकसाथीने गजर करणे शक्य होईल.
कधी तरी एक दिवस आपण सर्व जण स्वतंत्र होऊ हे आपले अंतर्मन आपल्याला सांगते आहे.
स्वातंत्र्याचा आपण सर्वजण असा जयघोष करू तेव्हा तो शुभदिन लवकर यावा यासाठी आपले प्रयत्न यशस्वी ठरतील. प्रभूची सर्व लेकरे वर्णभेद विसरून, जुने द्वेषमत्सर दूर करून एकत्र जमतील. यासाठी आपल्या सर्वांची ही धडपड आहे.
सगळ्या गावातील, वाडींतील, राज्याराज्यांतून आणि प्रत्येक शहरातील लोक एकत्र येतील. त्या जमलेल्या लोकांमध्ये काळे आणि गोरे लोक लोक असतील, ज्यू आणि ज्यू नसलेले लोक असतील, कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट असतील.
परस्परांमधील मतभेद आणि वादविवाद विसरून, एकमेकांच्या हातात हात घेऊन हे लोक ते जुने निग्रो धार्मिक गीत गातील:
‘झालो आम्ही स्वतंत्र, एकदाचे झालो आम्ही स्वतंत्र ! देवाच्या कृपेने आम्ही झालो स्वतंत्र !’
किंग यांचे भाषण संपले आणि लाखो लोकांच्या मेळाव्यात त्यानंतर शांतता पसरली.
आपण सर्व जण एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहोत, याची त्यापैकी अनेकांना त्याचवेळी खात्री पटली होती.
---
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग: भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद - कामिल पारखे (सुगावा प्रकाशन २०१८ मधील एक प्रकरण) )
---
मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांचा १५ जानेवारी हा जन्मदिन. संपूर्ण अमेरिकेत त्यानिमित्त जानेवारीच्या तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असते. मानवी हक्क चळवळीतील या नेत्यास ही आदरांजली
Camil Parkhe 14 January 2022`
May be a black-and-white image of 1 person and standing

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction