हा आफ्रिकन किंवा ब्लँक नेटिव्हिटीचा फोटो आहे.
लाकडावर कोरलेले हे ब्लॅक नेटिव्हिटीचे शिल्प अनेक वर्षांपासून माझ्याकडे आहे. नेटिव्हिटी किंवा Nativity of Jesus म्हणजे ख्रिसमस किंवा नाताळ. या शिल्पात ख्रिसमसला सजवतात त्या क्रिब ( crib) किंवा गव्हाणीत जी मुख्य पात्रे असतात ती सर्व या शिल्पात आहेत.
फरक इतकाच कि नेहेमीच्या ख्रिसमसच्या चित्रात जसे गोरेेगोरेपान, लालचुटुक ओठाचे बेबी जिझस, तितक्याच गौरवर्णाचे मदर मेरी, सेंट जोसेफ आणि आकाशातले देवदूत असतात तसे या चित्रात नाही.
या शिल्पातला बाळ येशू, त्याची आई मारिया, सेंट जोसेफ आणि देवदूतसुद्धा चक्क घनदाट कुरळे केस असणारे काळे म्हणजे आफ्रिकन आहेत !
म्हणूनच मी या शिल्पासाठी `ब्लॅक नेटिव्हिटी' हा शब्द वापरला आहे. जसे आपल्याकडे मदर मेरीला साडीत आणि योसेफला धोतर आणि कांबळींसह दाखवतात अगदी तस्सेच
येशू ख्रिस्ताचा जन्म इस्राएलमध्ये झाला, त्याअर्थाने तो आशियाई, मात्र संपूर्ण जगभर येशू आणि त्याच्या जीवनातील प्रसंग चित्रांत आणि शिल्पांत रेखाटले जातात ते पाश्चिमात्य लोकांप्रमाणे. याचे कारण म्हणजे हे चित्रे आणि शिल्पे साकारणारे लिओनार्दो द व्हिन्सी, मायकल अँजेलो सारखे युरोपियन चित्रकार आणि शिल्पकार.
काळ्या वर्णाच्या लोकांना दिली जाणारी विषमतेची वागणूक किंवा वर्णद्वेष याविरुद्ध लढणारे दक्षिण आफ्रिकेतील आर्चबिशप डेसमंड टुटू यांचें अलिकडेच ख्रिसमस सप्ताहात वुध्दापकाळाने निधन झाले. ही बातमी ऐकली तेव्हा ख्रिसमसनिमित्त बाहेर काढलेले माझ्या संग्रहातील हे ब्लॅक नेटिव्हिटीचे शिल्प माझ्यासमोरच होते.
नेल्सन मंडेला यांच्याबरोबरीने दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्ध लढा देणाऱ्या आर्चबिशप टुटू यांना नोबेल पारितोषकाने सन्मानित करण्यात आले होते.
त्याआधी अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन लोकांना श्वेतवर्णीय लोकांच्या बरोबरीने सार्वजनिक बसमध्ये प्रवास करण्यास, एकाच शाळा-कॉलेजांत शिकता यावे, एकाच चर्चमध्ये, हॉटेलांत, चित्रपटगृहांत आणि बागांत प्रवेश मिळावा यासाठी साठच्या दशकात रेव्ह. डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी यशस्वी लढा दिला.
या अमेरिकेत ख्रिस्ती असणऱ्या काळ्या लोकांना गोऱ्या ख्रिस्ती लोकांनी गुलाम बनवले. कारण याबाबतीत धर्मापेक्षा अर्थकारण महत्त्वाचे होते. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन यादवी युद्धानंतर कायद्याने गुलामगिरी बंद केली पण अमेरिकेत काळ्या लोकांना समानतेची वागणूक अगदी साठच्या दशकापर्यंत दिली जात नसे. त्यांना साधा मतदानाचा सुध्दा हक्क नव्हता. मात्र त्याआधी कितीतरी वर्षे आधी म्हणजे १९४७ सालीच भारताने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसार अस्पृश्यता पालनावर कायदयाने बंदी आणली होती आणि अशाप्रकारे समानतेचे राज्य प्रस्थापित केले होते.
त्यावेळी मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकेत मात्र याकाळात गोऱ्या लोकांच्या बरोबरीने काळ्या लोकांना बसमध्ये किंवा चर्चमध्ये बसता येत नसे. तसा कायदाच होता तिथे.
भारतातल्या अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद यात गुणात्मक असा काही फरक नव्हता, किंबहुना भारतातील अस्पृश्यांचे जिणे अमेरिकेतील निग्रोपेक्षा खूप वाईट होते असे नरहर कुरुंदकर यांनी लिहिले आहे.
ख्रिस्ती बॅप्टिस्टपंथीय धर्मगुरु असलेल्या मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी याविरुद्ध संघर्ष केला आणि कायद्यात बदल झाला. त्यांना नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आले. कोकणी ज्ञानपीठ पारितोषक विजेते रविंद्र केळेकार यांनी एक गोष्ट सांगितली आहे. :
''आचार्य काका कालेलकर अमेरिका दौऱ्यानंतर भारतात आले तेव्हा अमेरिकेत काय पाहिले असे विचारल्यावर ते म्हणाले : मी नायगाराचा प्रचंड धबधबा पाहिला, स्वातंत्र्यदेवतेची मूर्ती पाहिली आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग हा तरुण पाहिला.''
आचार्य कालेलकरांनी नंतर पंतप्रधान पंडित नेहरु यांच्याशी बोलून डॉ किंग (ज्यू) यांचा भारत दौरा घडवून आणला.
समानतेविषयी डॉ किंग (ज्यू.) यांचे या ``I have a dream'' शिर्षकाचे प्रसिद्ध भाषण चिरंतन मूल्य असणारे आहे.
या डॉ किंगला मात्र ऐन तरुणपणी वयाच्या ३९ व्या वर्षी हौतात्म्य प्राप्त झाले. महात्मा गांधींप्रमाणेच. एका माथेफिरूने गोळीबार करुन त्यांचे मिशन आणि जीवन संपवले. त्यांच्या शांततापूर्ण लढ्यामुळे डॉ किंग (ज्युनियर) यांना अमेरिकेचे महात्मा गांधी म्हटले जाते. खरे पाहता वर्णभेद संपवून अमेरिकेत वर्णविरहित समता स्थापन केल्याबद्दल त्यांना अमेरिकेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणता येईल.
``डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद'' हे माझे या दोन महामानवांचे चरित्र आणि कार्य यावरचे पुस्तक उषाताई आणि डॉ विलास वाघ सरांच्या सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
आपल्याकडची दलित पँथर चळवळीची मूळ प्रेरणा अमेरिकेतील ब्लॅक पँथरची. ब्लॅक लाईव्हज मॅटर' ही तर अगदी अलिकडची मोहिम..
त्यामुळे या `ब्लॅक नेटिव्हिंटी' ला वेगळे महत्त्व आहे. ब्लॅक इज ब्युटिफुल ही घोषणा त्यामुळेच जन्माला आली.
ता. क.
जगाच्या अनेक भागात २५ डिसेंबरला सुरु झालेला ख्रिसमस फेस्टिवल सोहोळा नवीन वर्षाचे स्वागत करुन संपला. रशियात आणि इतर काही देशांत मात्र ऑर्थोडॉक्स चर्च ६ जानेवारीला ख्रिसमस साजरा करणार. कारण रशियातले आणि इतर काही देशातले ऑर्थोडॉक्स चर्च अजूनही ग्रेगरियन कॅलेंडर वापरत नाही.
धर्मावर बंदी असलेल्या कम्युनिस्ट सोव्हिएत रशियात केजीबी या गुप्तचर संस्थेचे प्रमुख असलेले (आणि त्यामुळे तेव्हा बहुधा नास्तिक असलेले) रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हेसुद्धा नेहेमीप्रमाणे ६ जानेवारीच्या ख्रिसमस फेस्टिवलमध्ये सहभागी होतील. .
Camil Parkhe, January 4, 2022
Comments
Post a Comment