पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली'


काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका लेखात "पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये असताना वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली' असे लिहिले होते. 'वाकडी वाट' हा शब्दप्रयोग मुद्दाम वापरला होता. कारण ख्रिस्ती धर्माचे परमाचार्य पोप फ्रान्सिस यांची त्यांच्या राष्ट्रात जाऊन गळाभेट घेणे, तिथे फोटोग्राफरच्या साक्षीने बायबलची प्रत भक्तिभावाने कपाळाला लावणे हा पंतप्रधान मोदीजींच्या आजवरच्या कारकिर्दीच्या रुळलेल्या आणि लोकांनाही अपेक्षित असलेल्या मार्गातील प्रवास निश्चितच नव्हता.

इंडियन एक्स्प्रेसने ``पंतप्रधान मोदी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटणार'' या आशयाचा मथळा असलेली बातमी त्यादिवशी पान एक वरची पहिली बातमी किंवा लिड न्युज म्हणूनच छापली होती. केवळ अत्यंत अनपेक्षित आणि त्याचबरोबर अनेक दृष्टीकोनांतून महत्त्वाची असलेल्या बातमीलाच पान एकवरची ही जागा मिळत असते हे आता पत्रकारांबरोबरच वाचकांनासुद्धा बऱ्यापैकी माहित. झाले आहे. इतर किती इंग्रजी, मराठी आणि इतर भाषक वृत्तपत्रांनी या घटनेचे योग्य ते बातमीमूल्य ओळखले आणि त्यापैकी किती दैनिकांनी ही बातमी पान एकवर वापरली, त्या बातमीला किती प्राधान्य दिले आणि कुठल्या पानावर किती जागा दिली हे मला माहित नाही.
मोदीजी सत्तेवर आल्यापासून त्यांनी आपल्या आणि भाजप या आपल्या पक्षाच्या कुठल्याही धोरणाला, तत्त्वाला आणि अजेंडाला कधीही मुरड घातली नाही ही त्यांची आजवरची ख्याती आहे. भर कार्यक्रमात त्यांच्यापुढे केलेली स्कल कॅप किंवा गोल टोपी घालण्यास स्पष्ट नकार देणे किंवा अगदी मुसलमान बहुसंख्यांक असलेल्या मतदारसंघांत सुद्धा या अल्पसंख्यांक समाजाला भाजपचे तिकीट न देणे अशा भाजपच्या काही अलिखित बाबी किंवा संकेत आहेत. अल्पसंख्यांकांच्या खुशमस्करीस नकार या गोडस नावाखाली भाजप मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकांच्या भारताच्या निधर्मी राज्यघटनेने बहाल केलेल्या लोकशाही हक्कांवर अशाप्रकारे मिऱ्या वाटत असतो,
मोदी यांनी व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप यांची भेट घेतली आणि पोपमहोदयांना भारतभेटीचे निमंत्रण दिलेे याचे एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे गोव्यात लवकरच निवडणुका होणार आहेत. दिल्लीप्रमाणेच गोवा छोटे राज्य असले तरी राजकीय प्रतिमेच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे !
मोदी व्हॅटिकन सिटीला जातात काय आणि तिथे पोपमहाशयांना चक्क आलिंगन देऊन त्यांना भारतभेटीचे आमंत्रण देतात काय, हा सगळाच अविश्वसनीय मामला होता. याचे कारण म्हणजे पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचे आमंत्रण देण्यास मोदी सरकारने गेली सात वर्षे स्पष्ट नकार दिला होता. संघ परिवार आणि संसदेत पूर्ण बहुमत असलेल्या भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेत पोपमहाशयांना असा सन्मान देणे बसत नव्हते. नागपुरात मुख्यालय असलेल्या संघ परिवाराचे व्हॅटिकन सिटीशी कसल्या प्रकारचे सख्य असेल हे सांगायची गरज नाही.
मोदी यांनी रोमला पोहोचल्यावर व्हॅटिकनकडे वळून नुसतीच वाकडी वाट घेतली नव्हती तर आतापर्यंतच्या आपल्या स्वतःच्या धोरणाबाबत आणि विचारसरणी बाबत चक्क `यु टर्न' घेतला होता. आतापर्यंतच्या निर्माण झालेल्या, करण्यात आलेल्या मोदी यांच्या कणखर, खंबीर प्रतिमेशी हे त्यांचे वागणे जुळणारे नव्हते, खरे तर ते एकदम विसंगत असेच होते.
मोदी सरकारच्या भक्तवर्गालाच नाही तर त्यांच्या विरोधकांनाही व्हॅटिकनमधल्या मोदीजींच्या या वेगळ्या चालीने अचंबित केले होते.
खूप वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे एक सर्वात ज्येष्ठ असलेल्या लालकृष्ण अडवानी यांनी असेच परदेशात म्हणजे पाकिस्तानमध्ये असताना पक्षाच्या आणि संघ परीवाराच्या धोरणांशी पुर्णतः विसंगत असलेले वर्तन आणि विधान करुन मोठा गदारोळ उडवून दिला होता.
पाकिस्तानचे जनक महंमद अली जिन्ना यांच्या कराची इथल्या स्मारकाला भेट देणे आणि जिन्ना यांच्याविषयी स्तुतीसुमने उधळणे अडवानींना खूप महागात पडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यावेळी ओढवून घेतलेल्या नामर्जीमुळे अडवानींना भाजपचे अध्यक्षपद आणि या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार या पदावरही तिलांजली सोडावी लागली होती.
पंतप्रधानपदी असलेल्या मोदीजींच्या बाबतीत अर्थात असे काही होण्याचा प्रश्नच नव्हता.
तरीही संघाचे एके काळचे खंदे प्रचारक आणि हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे रेटणारे नेते या नात्याने व्हॅटिकनला जाऊन पोप महाशयांची गळाभेट घेणे, त्यांना भारतभेटीचे आग्रहाचे आमंत्रण देणे म्हणजे खूपच धक्कादायक होते.
भारतात परतल्यानंतर काही दिवसांतच मोदीजी पुन्हा एकदा असेच त्यांच्या रुढ प्रतिमेशी विसंगत असे काही करतील अशी मात्र कुणी कल्पनाही केली नव्हती.
त्यामुळेच शेतकऱ्यांनी नाकारलेले ते तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी यांचा तो `यु टर्न' म्हणूनच अनेकांना कितीही आनंददायी असला तरी तितकाच धक्कादायक होता !
मोदींनी आपल्या भूमिकेबाबत यू टर्न घेण्यास खरे तर व्हॅटिकन सिटीमध्येच सुरुवात केली होती. फक्त त्याची स्पष्ट जाणीव आपल्याला त्यावेळीं झाली नव्हती इतकेच.
मतदार राजाचा कोप आणि खप्पा मर्जी निवडणुकीत महागात पडू शकते याची जाणिव अखेरीस पंतप्रधान मोदी यांना जाणिव झाली असावी अशी चिन्हे आहेत. त्यानुसार मोदीजींनी आपले पोलादी रुप सोडून लवचिकपणा स्वीकारण्यास सुरुवात केली आहे असे दिसते.
गोव्याच्या फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने मोदी यांनी व्हॅटिकन सिटीची वाकडी वाट स्विकारली. पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकींमुळे त्यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला.
या निवडणुकांनंतर देशात इतरही बऱ्याच राज्यांत निवडणुका आहेत आणि २०२४ साली तर सार्वत्रिक निवडणुका आहेत....
Now is the time to wait and watch.

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction