पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला व्हॅटिकन सिटीला पोप फ्रान्सिस यांना भेटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला असताना थोडी वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीला जाऊन पोप फ्रान्सिस यांना जाऊन भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला असताना थोडी वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीला जाऊन पोप फ्रान्सिस यांना जाऊन भेटले. या घटनेला एकदम दुर्लक्षित करता येणार नाही.
या भेटीत मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचेही आमंत्रण दिले आहे.
विमानसेवा सुरु झाल्यावर जगभ्रमंतीवर निघणारे आणि इस्राएलच्या पवित्र भूमीला भेट देणारे पॉल सहावे हे पहिलेच पोप. पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीमध्ये विविध राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटण्याचा विक्रम केला, त्याची तुलना केवळ ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्याशीच करता येईल
पोप फ्रान्सिस हे पोप जॉन पॉल दुसरे त्यांच्यासारखेच हटके आणि यात्रेकरु (पिलग्रिम) पोप आहेत. ख्रिस्ती अगदी नाममात्र संख्येने असलेल्या आशियातील म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका येथे पोप फ्रान्सिस यांचे लाल गालिच्यावर स्वागत होत होते. मात्र मोदी सरकारने पोप यांच्या भारत दौऱ्यावर आतापर्यंत कोलदांडाच घातला होता.
व्हॅटिकन सिटीचे प्रमुख म्हणून पोप यांना राष्ट्रप्रमुख असा दर्जा असल्याने राजकीय शिष्टाचारानुसार अधिकृत आमंत्रण असल्याशिवाय त्यांना कुठल्याही देशाच्या दौऱयावर जाता येत नाही.
पंतप्रधान मोदी यांची पोप यांच्याशी झालेली भेट सुद्धा भारत सरकार आणि व्हॅटिकन सिटीचे परराष्ट्र खाते यांच्याशी अशीच रितसर, औपचारिक चर्चा होऊनच झालेली आहे.
राष्ट्रप्रमुख आणि धर्माचार्य अशी दोन पदे असल्याने पोप कधीच कुणाला भेटायला जात नसतात, स्वागत करायला जात नसतात. इतर राष्ट्रप्रमुखच त्यांच्या भेटीला व्हॅटिकन सिटीत किंवा परदेशातील त्यांच्या निवासस्थानी भेटत असतात.
या शिष्टाचारानुसारच पंतप्रधान मोदी यांच्या आधी एक दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पत्नीसह व्हॅटिकन येथे जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली.
विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन हे कॅथोलिक आहेत ही बाबसुद्धा महत्त्वाची. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत याआधी फक्त जॉन एफ केनेडी हे कॅथोलिक राष्ट्राध्यक्ष होते.
जगातल्या कुठल्याही शहरातल्या एखाद्या छोट्याशा परिसराइतकी म्हणजे पुणे विद्यापिठाच्या कॅम्पसहूनही कमी आकाराच्या असणाऱ्या व्हॅटिकन सिटीला एका राष्ट्राचा आणि तिथल्या धर्माचार्याला भारतासह अनेक देशांनी आणि संयुक्त राष्ट्रसंघात राष्ट्रप्रमुखाचा दर्जा दिला जावा हा तसा अत्यंत गमतीदार प्रकार आहे. जगातल्या या सर्वात छोट्या सार्वभौम राष्ट्राच्या नागरिकांची संख्या असते सातशे-आठशेच्या आसपास.
मध्ययुगीन काळात अनेक राष्ट्रांच्या सम्राटांच्या आणि सम्राज्ञीच्या डोक्यावर पोप राजमुकुट ठेवत असत, ती सरंजामशाही परंपरा आजही चालू आहे असे म्हणता येईल!
पोपपदाच्या शिष्टाचाराबाबत आणि मानापनासंबंधी वाचलेली एक जुनी गोष्ट आठवते. सम्राट नेपोलियन आणि तेव्हाचे पोप यांची भेट ठरली होती, पण मानापनाचा मुद्दा आला. कोणी कुणाचे स्वागत करायचे.? अखेरीस नेपोलियनने यावर एक शक्कल लढविली. पोपमहाशय ज्या मार्गाने येणार होते त्याच मार्गावर हे सम्राट निघाले आणि केवळ कर्मधर्मसंयोगाने समोरासमोर आल्याचे भासवून मग आपापल्या घोड्यांच्या बग्गीतून उतरून हे दोघेही एकमेकांना सामोरे गेले आणि दोघांचीही प्रतिष्ठा आणि सन्मान शाबूत राहिला !
पंतप्रधान मोदी एका छोट्याशा कारने व्हॅटिकन सिटीत पोहोचले आणि तेथे एका कार्डिनलने त्यांचे स्वागत केले हा फोटो सोशल मिडियावर शेअर झाला. त्यावर चविष्ट चर्चाही झाली .
रोमला काही दिवस राहिल्याने मला व्हॅटिकन सिटीच्या काही गोष्टी माहित आहेत.
व्हॅटिकन सिटीचा आकारच इतका छोटा आहे कि तिथे तुम्हाला तुमचे कुठलेही खासगी वाहन नेता येत नाही. जसे इटलीमध्येच असलेल्या व्हेनिसला मोटारवाहने नसतातच, तिथे बराचसा प्रवास बोटीनेच होत असतो.
रोममधल्या मेट्रोने एक स्टॊपवर उतरले कि तुम्हाला समोर व्हॅटिकन सिटी दिसते अन तिथून तुम्ही चालत गेला कि आत भव्य सेंट पिटर्स स्केअर दिसतो आणि समोर असते सेंट पिटर्स बॅसिलिका. तिथे एकही वाहन आणण्यास मुळी परवानगीच नसते आणि गरजही भासत नाही. काही मिनिटांत चालत तुम्ही सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या प्रवेशदारापाशी आलेले असतात.
जगभरातलॆ कार्डिनल २०१३ साली आपापल्या बँगांसह नवे पोप निवडण्यासाठी असेच चालत या भव्य आवारात आले होते त्यांच्यातल्या अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बॉर्गग्लिओ यांची पोप म्हणून निवड झाले तेव्हापासून पोप फ्रान्सिस इथेच राहत आहेत. अजूनही ते आपल्या (!) देशात परतले नाहीत.
मोदी यांनी व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप यांची भेट घेतली आणि पोपमहोदयांना भारतभेटीचे निमंत्रण दिलेे याचे एक कारण सांगितले जाते , ते म्हणजे गोव्यात लवकरच निवडणुका होणार आहेत.
अर्थात गोव्याच्या निवडणुकीव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय राजकारण आणि दबावाचे कितीतरी मुद्देसुद्धा मोदींच्या व्हॅटिकन भेटीमागे आहेत. उदाहरणार्थ, भारतातील सत्तारुढ भाजपाची आणि संघ परिवाराची आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा, मोदींची स्वतःची आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रतिमा आणि जगात अनेक ठिकाणी ताकदवान होणाऱ्या उजव्या, प्रतिगामी शक्ती, वगैरे.
पुढच्या महिन्यात गोव्याच्या निवडणुका जाहीर होतील.
पोर्तुगीज काळात ओल्ड गोवा येथील भव्य चर्चेस, तिथल्या विविध ख्रिस्ती संस्था, तसेच जेसुईट (येशूसंघिय ) धर्मगुरुंच्या आधुनिक विषय शिकवणाऱ्या आशियातील पहिल्याच सेंट पॉल युनिव्हर्सीटी मुळे गोवा त्याकाळात 'रोम ऑफ द ईस्ट' म्हणून ओळखले जायचे.
काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन भाजपने गोव्यातील सत्तेत चंचुप्रवेश मिळवल्यानंतर आणि नंतर पूर्ण सत्ता काबीज केल्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच गोव्यात निवडणुका होत आहेत.
मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये 'दीदी, ओ दीदी'' अशी ज्यांना भरसभेत वारंवार हाक मारली, त्या ममता बॅनर्जी गोव्यात भाजपला आव्हान देत आहेत. गोव्याचे जुने काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
व्हॅटिकन सिटीत पोपमहाशयांना भेटल्यावर निवडणूका जाहीर होताच गोंयकरांना साद घालण्यासाठी पंतप्रधान मोदी गोव्यात येतील. दिल्लीप्रमाणेच गोवा छोटे राज्य असले तरी राजकीय प्रतिमेच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे !
पश्चिम बंगालप्रमाणेच गोव्यातही फ़ुटबाँल लोकप्रिय आहे. तेथे लवकरच `खेला होबे’ रंगणार असे दिसते आहे.
Comments
Post a Comment