आरिफ शेख यांनी माझी कारकिर्द घडवण्यात कळतनकळत हातभार लावला.

औरंगाबाद श्रमिक पत्रकार संघाच्या आंदोलनाचे १९८९ मधील छायाचित्र गोव्यातील नवहिंद टाइम्सची नोकरी सोडून श्रीरामपूरच्या 'सार्वमत'मार्गे मी औरंगाबादला लोकमत टाइम्स इंग्रजी दैनिकात बऱ्यापैकी स्थिरावला होतो. पणजी येथे प्रथम कॉलेज विद्यार्थी चळवळीचा आणि नंतर कामगार चळवळीचा अंगात वळवळणारा किडा इथेही सुटला नव्हता, त्यामुळे या शहरात आल्यानंतर लगेचच सभासद होऊन सहा महिन्यातच निवडणुका लढवून मी औरंगाबाद श्रमिक पत्रकार संघटनेचा सरचिटणीसही बनलो होतो. ही गोष्ट आहे १९८९ची. औरंगाबाद शहर तसे मला नवखे असायचे कारण नव्हते. मी तसा मूळचा मराठवाड्यातला कारण माझे मूळ गाव वाहेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातले. हळूहळू मी या ऐतिहासिक शहराच्या प्रेमात पडायला लागलो आणि माझ्या श्रीरामपूरच्या घराच्या भेटी पंधरवड्याऐवजी महिन्याच्या होत गेल्या. अचानक सप्टेंबरच्या दरम्यान ही एक घटना घडली. लोकमत टाईम्समधल्या क्राईम रिपोर्टर असलेल्या मुस्तफा आलम या माझ्या सहकारी मित्राने पुण्यातील इंडियन एक्सप्रेसच्या बातमीदाराच्या जागेसाठी अर्ज दिला होता. यादरम्यान मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या आणि भारतकुमार राऊत कार्यकारी संपादक असलेल्या इंडिपेंडंट या इंग्रजी दैनिकाचा औरंगाबाद प्रतिनिधी म्हणून मुस्तफाची निवड झाली होती आणि त्याने इंडियन एक्सप्रेसच्या जागेसाठी माघार घेतली. इंडियन एक्सप्रेसने पुण्यात आवृत्ती उघडण्याचे ठरवले होते, पुण्यात इंग्रजी पत्रकारितेची त्यावेळी मोठी परंपरा नव्हती. पुढे टाइम्स ऑफ इंडियाचे मुख्य संपादक बनलेले दिलीप पाडगावकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात पुणे कॅंपातल्या पूना हेराल्ड (नंतर महाराष्ट्र हेराल्ड) मध्ये केली होती हा एक सन्माननीय अपवाद. आमच्या औरंगाबादच्या `लोकमत टाइम्स’च्या स्टाफबाबतसुद्धा अशीच बोंब होती. गोव्यात तर इंग्रजी नवहिंद टाइम्स आणि हेराल्ड या इंग्रजी दैनिकांसंदर्भात आणि गोमंतक मराठी दैनिकांबाबतही अशीच तऱ्हा होती. या दैनिकांसाठी वृत्तपत्र मालक नेहेमीच गोव्याबाहेरून संपादक आणायचे. पोर्तुगीज राजवटीतून गोव्याची १९६१साली मुक्तता केल्यानंतर गोव्यात सुरु झालेल्या पहिल्या इंग्रजी दैनिकाचे संपादक त्र्यंबक विष्णू पर्वते होते. हेराल्डो या पोर्तुगीज दैनिकाचे इंग्रजी दैनिक करण्यात आले तेव्हा मुंबईहून राजन नारायण यांना संपादक म्हणून आणले आणि या पदावर ते अनेक वर्षे होते. मराठी ‘गोमंतक’चे माधव गडकरी, नारायण आठवले, 'नवप्रभा'चे श्री. श्री. कोकजे अशी कितीतरी उदाहरणे आहेत. आजही त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. गोव्याचे भूमिपुत्रांनी मात्र देशात आणि परदेशांत पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठ्या पदांवर काम केले आहे आणि करत आहेत. `पिकते तिथे विकत नाही' अशी मराठीत म्हण आहे आणि `संदेष्टयाला स्वतःच्या गावात सन्मान मिळत नसतो' असे बायबलमध्ये वचन आहे ते इथे लागू पडते. त्यामुळे इंडियन एक्सप्रेससाठी पुण्याबाहेरील इंग्रजी दैनिकांतील बातमीदार आणि उपसंपादक आणण्याचे निवासी संपादक कर्दळे यांनी ठरवले होते. अशा परिस्थितीत इंडियन एक्सप्रेसचे औरंगाबादचे प्रतिनिधी आरिफ शेख हे इंडियन एक्सप्रेसचे पुणे निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांच्या सांगण्यावरुन नोकरीसाठी अनुभवी उमेदवार औरंगाबाद येथें शोधत होते. मुस्तफाने इंडियन एक्सप्रेसची नोकरी नाकारली तेव्हा त्याचा मित्र म्हणून त्याच्या मोटारसायकलवर बसून मी एक्सप्रेसच्या औरंगाबादच्या गुलमंडी ऑफिसात आरिफ शेख यांना भेटण्यासाठी आलो होतो. मुस्तफा आलमने अशी अखेरच्या क्षणाला माघार घेतल्याने आरिफ शेख तोंडघशी पडल्यासारखे झाले होते. त्यावेळी ''कामिल, आपही एक्सप्रेस के जॉब के लिए अप्लाय करो ना!'' असे मुस्तफाने हसतहसत म्हटले आणि आरिफ शेख यांनी लगेच सुटकेचा निःश्वास टाकत त्याची री ओढली. दोघांनी जवळजवळ जबरदस्ती करत माझ्याकडून माझा छोटासा बायोडेटा लिहून घेतला आणि आमच्या दोघांसमोरच आरीफ शेख यांनी टेलीप्रिंटरवर टाईप करुन पुण्याला प्रकाश कर्दळे यांना पाठवूनही दिला ! मी हे प्रकरण तिथून बाहेर आल्यावर विसरुनही गेलो. तीन दिवसांनंतर आरिफ शेख यांनी मुस्तफा आलममार्फत निरोप पाठवून मला इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात बोलावून घेतले. ''या शुक्रवारी पुण्यात निवासी संपादक कर्दळे यांनी मुलाखतीसाठी तुला बोलावले आहे,'' असे त्यांनी सांगितल्यावर मी हबकलोच. आरिफ शेख आणि मुस्तफा आलम यांनी माझ्याकडून बायोडेटा लिहून घेतला तेव्हा हे प्रकरण या थराला जाईल अशी मी कल्पनाही केली नव्हती. `लोकमत टाइम्स'ला मी रुजू होऊन जेमतेम दहा महिने झाले होते आणि आता इतक्या लवकर हे दैनिक वा औरंगाबाद शहर सोडण्याची मी मानसिक तयारी केली नव्हती. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा सक्रिय पदाधिकारी असताना पणजीतल्या नवहिंद टाईम्सची चांगल्या पगाराची नोकरी सोडून मी महाराष्ट्रात श्रीरामपूरला परततो आहे हे ऐकून गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष गुरुदास सिंगबाळ चकित झाले होते. दहावीनंतर श्रीरामपूरहून मी गोव्यात फादर होण्यासाठी म्हणजे संन्यासी होण्यासाठी आलो होतो, तेव्हा कुटुंबाचे आणि इतर सर्व पाश मी मागे टाकले होते. त्यावेळी सिंगबाळ यांना मी ''मला कसले पाश आहेत? मी तर एक फकीर, आपली शबनम घेऊन या गावाहून दुसऱ्या गावी जाणार,'' असे म्हटल्याचे आठवले होते. (आपल्या राष्ट्रभाषेतील अगदी असेच उद्गार अलिकडच्या काळात कानावर पडले तेव्हा ही आठवण येऊन मी स्वतःशीच खूपखूप हसलो होतो ! ) पण आता `आलिया भोगासी असावे सादर' असे म्हणत मी पुण्याला मुलाखतीसाठी गेलो, तेथे संपादक प्रकाश कर्दळे यांनी इंडियन एक्सप्रेसचा पगार चांगला घसघशीत असल्याने पगाराची बोलणी न करता थेट 'कामिल, तू लवकरात लवकर कधी जॉईन होऊ शकतो?'' असा पहिलाच प्रश्न विचारला तेव्हाच आपले औरंगाबादचे दोरे आता कापले गेले आहेत याची जाणीव झाली होती.
औरंगाबाद सोडून आता बत्तीस वर्षे होत आलेत. आधी पायाला लावलेल्या भिंगरीची गती हळूहळू कमी होऊन ती भिंगरी कधी गळून पडली हे मला कळालेच नाही. पुण्यात इंडियन एक्सप्रेसमध्ये अकरा वर्षे, त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियात पाचसहा वर्षे आणि सकाळ माध्यमसमूहाच्या महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ टाइम्समध्ये गेल्या मार्चच्या कोरोनाकाळापर्यंत म्हणजे तब्बल सोळा वर्षे अशी पुण्यातील इंग्रजी पत्रकारितेत काम केले. इंडियन एक्सप्रेसच्या आरिफ शेख यांनी मला पुण्यात आणण्यात आणि माझी कारकिर्द घडवण्यात त्यांच्या कळतनकळत असा मोठा हातभार लावला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती येतात आणि त्या आयुष्याला कलाटणी लावण्यासारखे काहीतरी करून जातात. त्याबद्दल त्यांना श्रेय देण्याची संधी येत नाही किंवा आपण तसे बोलून दाखवत नसतो हे खरेच. गेल्या तीन दशकांत आरिफ शेख आणि माझी कधी गाठभेटही झाली नाही. आज ज्येष्ठ पत्रकार मित्र निशिकांत भालेराव यांचा आरिफ शेख यांच्यासंदर्भात लेख वाचला आणि ही खूप जुनी घटना डोळ्यांसमोर उभी राहिली. औरंगाबाद श्रमिक पत्रकार संघाच्या आंदोलनाचे १९८९ मधील छायाचित्र

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction