'मेरी ख्रिसमस'
वयाच्या पंधराव्या वर्षी गोव्यात राहायला गेल्यापासून ख्रिस्तमस व कुठल्याही फेस्तला म्हणजे सणाला माझा ब्रेकफास्टचा मेन्यू कायम राहिला आहे. बनपाव किंवा बर्गरला भरपूर बटर लावून, त्यात चीज आणि हाफ-फ्राईड अंडे टाकून गरमगरम कॉफी पित सणाच्या सेलेब्रेशन मूडमध्ये जाता येते. (बल्गेरियात असताना आणि अलीकडच्या युरोप दौऱ्यावर हा माझा दररोजचा नाश्ता असायचा !)
तर आज सकाळी शेजारच्या बेकरीत गेलो आणि बनपाव मागितला तर तिथल्या युपीमधून गेल्या वर्षी आलेल्या मुलाने सकाळीच एकाने तीसचाळीस बनपाव नेले आणि आता एकही बनपाव राहिला नाही म्हणून सांगितले !
त्या बेकरीत सगळीकडे अनेक प्रकारच्या केकचे ढिग रचून ठेवले होते, त्या मुलाला आज एव्हढ्या केकचे कारण काय विचारले तर अस्लम डोके खाजवायला लागला. त्याला आजच्या सणाचे नाव माहित नव्हते. ''आज कोई बहुत केक खाते है ना, इसलिए बनाये है'' असे तो म्हणाला.
मागच्याच वर्षी पुण्यात आलेल्या अस्लमने बहुधा ख्रिसमस वा नाताळ हा शब्द कधी ऐकलाही नसावा.
नंतर चिंचवडगावातल्या आमिर बेकरीत बर्गर, बनपाव घ्यायला तेव्हा तिथेही केकचे ढिग लावलेले दिसले. बेकरीचा मालक मुसलमान असला तरी बेकरीत केवळ पूर्ण शाकाहारी पदार्थच असतात, अगदी अंडीसुद्धा तो ठेवत नाही.
घरकाम करणाऱ्या बायांसाठी आणि इतरांना देण्यासाठी काही केक मी घेतले तर बेकरीवाल्याने नंतर एक काळा रंगाचा चौकोनी केक माझ्यासमोर ठेवला. ''रम टाकून बनवलेला केक आहे, सणासाठी घेऊन जा !''
त्याने अशी मिठ्ठास आवाजात फर्माईश केल्यावर लगेच दोन केक मी घेतलेही. माझी ओळखपाळख नसली तरी मी निघताना 'मेरी ख्रिसमस' असे म्हणायला तो विसरला नाही !
नाताळाच्या आधल्या दिवशी काल सकाळी मी नेहेमीप्रमाणे पिंपरीच्या फारुकभाईंना फोन लावून चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली तेव्हा शुद्ध मराठीत बोलत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. कोरोनामुळे आपला कॅटरिंगचा धंदा गेली आठ महिने बंदच असून दुसऱ्या राज्यातल्या आपल्या घरी गेलेले कामगार अजून आले नाहीत असे ते म्हणाले.
नाताळ ते नूतन वर्षं हा त्यांच्या धंद्याचा पूर्ण वर्षातील पिक सिझन असतो तरीही ऑर्डर घेता येत नाही याची खंत करत त्यांनी तातडीने दुसऱ्या एका होम डिलिव्हरी कॅटरिंग सेवा पुरवणाऱ्या मित्राचा फोन नंबरही दिला.
चिकन बिर्याणी घरपोच पुरवणारा हा दुसरा `गाववाला' होता आणि नाताळानिमित्त आज त्याला भरपूर ऑर्डरी येत होत्या असे दिसले.
आज दुपारी बारा वाजता चिकन बिर्याणी देण्यासाठी घरी आल्यावर तोसुद्धा मला 'हॅपी खिसमस' म्हणेल याची मला खात्री आहे.
Comments
Post a Comment