पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पूर्णाकृती पुतळा आधी फोडला गेला, मग हटवला गेला, त्याची गोष्ट
पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पूर्णाकृती पुतळा आधी फोडला गेला, मग हटवला गेला, त्याची गोष्ट
पडघम - साहित्यिककामिल पारखे
- पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पुतळा
- Fri , 31 July 2020
- पडघमसाहित्यिकलुई वाझ डी केमॉईसLuís Vaz de Camõesजॉर्ज फ्लॉयडGeorge Floydब्लॅक लाइव्हज मॅटर्सBlack Lives Matters
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीची मान एका श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने आपल्या गुढघ्याखाली दाबून धरल्याने त्याचा घुसमुटून मृत्यू झाला. त्यानंतर तीव्र झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनांतर्गत अमेरिका, युरोपमध्ये विन्स्टन चर्चिल, कोलंबस, एडवर्ड कोल्स्टन यांचे पुतळे पाडले गेले. कारण हे लोक साम्राज्यवादी वा त्याचे समर्थक होते. ३७ वर्षांपूर्वी गोव्यातही पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा पुतळाही याच कारणांवरून पाडला गेला होता. त्याची ही हकिकत......
१.
गोव्याला पर्यटक म्हणून येणारे बहुतेक सर्व जण जुन्या गोव्याला हमखास भेट देतात. कारण म्हणजे त्याचे मध्ययुगीन काळातले स्थान आणि त्या ऐतिहासिक काळाच्या तिथे अजूनही सुस्थितीत असलेल्या खाणाखुणा आणि पाश्चात्य गॉथिक शैलीचा समृद्ध वास्तुशास्त्रीय वारसा. गोव्याच्या तुलनेत अधिक वर्दळीच्या असलेल्या पणजी-फोंडा- मडगाव या रस्त्यावरील रायबंदर ओलांडले की, जुना गोवा येतो. तेथे वाहनांतून उतरल्यावर पर्यटक तेथील दोन मुख्य चौकांतील मधल्या तीनशे मीटर लांबीच्या रस्त्यावर येतात. हा येथील सर्वांत महत्त्वाचा परिसर. या रस्त्याच्या अगदी मधोमध एका बाजूच्या संकुलात भव्य सफेत रंगाची वास्तू दिसते ती म्हणजे सी कॅथेड्रल. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तांबड्या रंगाच्या दगडांनी बांधलेली अगदी जुनी वास्तू दिसते. ती आहे- बॉम जेजू बॅसिलिका.
सी कॅथेड्रलच्या वॉकिंग प्लाझामध्ये एक मोठी वर्तुळाकार जागा आहे, आसपास सुंदर लँड्स्केपची हिरवाई आहे. या वर्तुळाकार जागेत एकेकाळी म्हणजे १९८०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत उंच चौथऱ्यावर सोळाव्या शतकातील पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा मोठा पुतळा होता. ही सी कॅथेड्रलच्या सुंदर पार्श्वभूमीवर छायाचित्र किंवा सेल्फीसाठी एक अतिशय उत्तम जागा होती. दुदैवाने त्या काळात कृष्णधवल किंवा रंगीत छायाचित्र काढणे आजच्याइतके सोपे नव्हते. त्यामुळे या पुतळ्यापाशी काढलेले माझे स्वतःचे वा कुणा मित्रमंडळीची छायाचित्रं नाहीत.
पोर्तुगीजांच्या राजवटीत १७व्या-१८व्या शतकांत गोव्याला ‘पूर्वेकडचे रोम’ म्हटले जाई. कारण म्हणजे येथील मोठमोठी कॅथेड्रल, चर्चेस, सेंट पॉल युनिव्हर्सिटी यासारख्या धार्मिक शिक्षणाच्या संस्था आणि कॅथोलिक चर्चच्या जेसुइट्ससारख्या बहुतेक सर्व धर्मगुरूंच्या संघटनांचे येथील कार्य! चर्चच्या गॉथिक शैलीच्या भव्य वास्तू, जुन्या काळातील या स्थळाच्या गौरवशाली पर्वाची साक्ष देणारे सेंट ऑगस्टीन टॉवरसारखे उंच आणि भव्य भग्न अवशेष पर्यटकांना आजही गोव्याच्या एका वेगळ्या संस्कृतीची, ऐतिहासिक ठेव्याची चुणूक दाखवून देतात.
असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेल्या या जुन्या गोव्यात पोर्तुगीज सरकारने १९६० साली महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा पुतळा उभारला. हा ३.६ मीटर उंचीचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा लवकरच या पर्यटनक्षेत्राचे एक प्रमुख आकर्षण बनला. मध्ययुगीन सैनिकाच्या पोशाखात केमॉईस आकाशाकडे नजर लावून ‘ओ लुसीएड्स’ हे महाकाव्य अगदी अभिमानाने वाचतो आहे, असा हा पुतळा होता.
केमॉईस (१५२४/२५-१५८०)चे गलबतातून मांडवीच्या किनारी १५५३ साली आगमन झाले, तेव्हा तो एक साधा सैनिक होता. गोव्यातून त्या काळी पोर्तुगीज वसाहत असलेल्या मकाव येथे गेल्यावर त्याने ‘ओ लुसीएड्स’ हे आपले महाकाव्य पूर्ण केले. ते १५७२ साली प्रसिद्ध झाले. त्याने केमॉईशला महाकवीचे स्थान मिळवून दिले. दर्यावर्दी वास्को द गामाने भारताचा शोध लावला, या घटनेवर हे महाकाव्य आधारीत आहे. हे पोर्तुगीज भाषेतील सर्वांत श्रेष्ठ दर्जाचे, अभिजात साहित्य गणले जाते. केमॉईस पोर्तुगीज भाषेतला होमर, शेक्सपियर किंवा कालिदास समजला जातो. त्याला पोर्तुगालचा ‘राष्ट्रीय कवी’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्याच्या ‘द लुसिएड्स’ या महाकाव्याचे इंग्रजी, फ्रेंच आणि इतर अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे असलेली या महाकवीची समाधी पोर्तुगालचे एक राष्ट्रीय स्मारक आहे.
केमॉईस गोव्यात दोनदा आला होता. ‘ओ लुसीएड्स’च्या काही भागाची रचना त्याने गोव्यात असताना केलीय असावी, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. गोवा विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू ऑलिव्हियानो गोम्स यांनी ‘ओ लुसीएड्स’चा कोकणी भाषेत अनुवाद केला आहे. गोम्स यांनी त्याला रामायणाच्या धर्तीवर ‘लुसितायण’ असे नाव दिले आहे. कोकणी भाषेच्या देवनागरी आणि रोमन या दोन्ही लिपींत हा अनुवाद आहे. (कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांत कोकणी कन्नड लिपीत लिहिली जाते.)
२.
जुना गोवा ही ‘पोर्तुगीज इंडिया’ या पोर्तुगिजांच्या वसाहतीची सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून राजधानी होती. पोर्तुगीजांच्या राजवटीतच नोवा गोवा किंवा पणजी ही गोव्याची नवी राजधानी बनली. त्यानंतर पणजीपासून १२-१३ किलोमीटर अंतरावरील जुना गोवा हे नंतर एक दुर्लक्षित खेडेगाव बनले.
मला आठवते १९७०च्या दशकात येथे चहापाण्यासाठी बऱ्यापैकी हॉटेलही नव्हते. तीन डिसेंबरच्या दरम्यान बॉम जेजूच्या बॅसिलिकात ‘गोयंचो सायबा’ सेंट फ्रान्सिस झेव्हिअरच्या वार्षिक फेस्ताच्या निमित्ताने होणाऱ्या नऊ दिवसांच्या नोव्हेनाच्या काळातच येथे खूप स्टॉल लागायचे.
सतराव्या शतकात बांधलेल्या सी कॅथेड्रल आणि बॉम जेजू बॅसिलिका. या दोन वास्तू पाहिल्याशिवाय जुना गोवा या पर्यटनस्थळाची भेट पूर्णच होऊ शकत नाही. कारण बॉम जेजू (बाळ येशू) बॅसिलिका येथे सोळाव्या शतकातील संत फ्रान्सिस झेव्हिअर यांच्या शरीराचे अवशेष (रिलिक) ठेवले आहेत. तुम्ही या चर्चमध्ये गेल्यानंतर वेदीच्या उजव्या बाजूला उंचावर एका पारदर्शक पेटीत ठेवलेले हे अवशेष दिसतात. दहा वर्षांतून एकदा या संताच्या शरीराच्या अवशेषांचे प्रदर्शन किंवा एक्स्पोझिशन भरवले जाते. बॉम जेजू बॅसिलिकापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सी कॅथेड्रलमध्ये हे प्रदर्शन भरले जात. (ख्रिस्ती चर्चसंस्थेमध्ये चॅपेल, चर्च, कॅथेड्रल आणि बॅसिलिका या त्यांच्या धार्मिक महत्त्वानुसार अनुक्रमे चढत्या श्रेणीच्या धार्मिक उपासनेच्या वास्तू असतात. उदाहरणार्थ, इटालीमधील व्हॅटिकनच्या प्रसिद्ध सेंट पीटर्स चौकात जेथून पोप प्रवचन देतात, ती सेंट पिटर्स बॅसिलिका.)
भारतातील कॅथोलिक समाजाच्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांमध्ये तामिळनाडूतील वेलंकणी मातेचे मंदिर आणि मुंबईतील बांद्रा येथील माऊंट मेरी बॅसिलिका याबरोबरच जुना गोव्याच्या बॉम जेजू बॅसिलिकाचाही समावेश होतो. या एक्स्पोझिशनच्या काळात देशातून आणि जगभरातून लाखो भाविक गोव्यात येतात. गोवा राज्याच्या दृष्टीने हे दशवार्षिक प्रदर्शन ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ किंवा धार्मिक पर्यटनउद्योगाची मोठी पर्वणीच असते. भाजप गोव्यात सत्तेवर असताना राज्य सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे या ख्रिस्ती संताच्या शरिराची दशवार्षिक प्रदर्शनाची परंपरा चालू राहिली आहे.
केमॉईसचा पुतळा १९६० साली उभारण्यात आला, तेव्हा सी कॅथेड्रलसमोरची ही जागा आताइतकी आकर्षक नव्हती. त्यानंतर केवळ वर्षभरातच पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भारतीय जनमताच्या रेट्यास झुकून आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या परिणामाची पर्वा ना करता पोर्तुगीज अंमलातून गोवा मुक्त करण्यासाठी लष्करी कारवाई केली. भारतीय सैन्याने १८ आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी कारवाई करून साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश मुक्त केला.
गोवामुक्तीनंतर हा चिमुकला प्रदेश भारतातील एक प्रमुख पर्यटनस्थळ बनला. जुना गोवा हे गोमंतकातील एक प्रमुख पर्यटनस्थळ बनले. पर्यटन उत्तेजनासाठी सी कॅथेड्रल आणि बॉम जेजू बॅसिलिका आवारात विकसिकरण आणि सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे केमॉईसचा पुतळा सी कॅथेड्रलच्या भव्य आवारात आणि चौकात अगदी केंद्रस्थानी आला. गोव्यात कुठेही कुणाही व्यक्तीच्या एखाद्या पुतळ्याला इतकी मोक्याची, मध्यवर्ती आणि त्यामुळे इतक्या सन्मानाची जागा मिळाली नव्हती. ही मध्यवर्ती जागा खरेच हेवा करण्यासारखी होती. मात्र ही मोक्याची जागा आणि हा सन्मान या महाकवीच्या पुतळ्याच्या नशिबी फार काळ असणार नव्हता.
गोवामुक्तीनंतर पोर्तुगीज गुलामगिरीचे अवशेष असणारे पोर्तुगीज व्हॉईसरॉय, गव्हर्नर वगैरेंची अनेक सार्वजनिक ठिकाणी असलेली पुतळे काढण्यात आले. वास्को द गामा, अफान्सो डी अल्बुकेर्क वगैरेंच्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पुतळ्यांची रवानगी ‘अर्कायलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या संग्रहालयात करण्यात आली. केमॉईसचा पुतळा मात्र या कारवाईतून त्या वेळी वाचला. तो इतरांप्रमाणे साम्राज्यवादी वा वसाहतवादी नव्हता, या कारणामुळे बहुधा त्या वेळी त्याच्या पुतळ्याची उचलबांगडी टळली असावी.
३.
जुन्या गोव्याच्या अगदी एका टोकाला पण केमॉईशच्या पुतळ्यापासून तीनशे-चारशे मीटर अंतरावर मांडवी नदीच्या किनाऱ्यापाशी आजही चांगल्या स्थितीत असलेले पण छोटेशेच ‘व्हॉईसरॉय आर्च’ आहे. गोव्याचे सागरी प्रवेशद्वार असलेली ती कमान एका अर्थाने ‘गेट वे ऑफ पोर्तुगीज इंडिया’ असेही म्हणता येईल. मांडवीच्या तीरावर नांगर टाकलेल्या गलबतातून लिस्बनहून आलेले वास्को द गामा आणि अफान्सो डी अल्बुकेर्क वगैरे व्हॉईसरॉय, गव्हर्नर जनरल या सागरी प्रवेशद्वारातून या ‘व्हॉईसरॉय आर्च’मधून लष्करी इतमामाने गोव्यात प्रवेश करत असत.
मी जुन्या गोव्यात आलो की, कुटुंबियाबरोबर किंवा मित्रांसोबत इथे येतो आणि मग येथून सुटणाऱ्या फेरीबोटने दिवार या बेटावर एक फेरफटका मारून येतो. गोव्याच्या या सागरी प्रवेशद्वाराविषयी माहिती नसल्याने बहुतेक पर्यटक या निर्जन टोकाला फिरकतदेखील नाहीत वा त्यांचे पर्यटक गाईड त्यांना इकडे आणत नाहीत. याच ऐतिहासिक सागरी प्रवेशद्वारातून केमॉईसने गोव्यात पहिल्यांदा म्हणजे १५५३ साली प्रवेश केला होता. मकावहून गोव्याला परतल्यावर १५६७पर्यंत त्याचे गोव्यात वास्तव्य होते. या ‘व्हॉईसरॉय आर्च’वर म्हणजे कमानीच्या अगदी टोकावर आजही गोव्यात पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या युरोपियन दर्यावर्दी वास्को द गामाचा छोटासा पण पूर्णाकृती पुतळा आहे.
मागे बायको आणि मुलीबरोबर युरोपच्या सहलीला गेलो होतो, तेव्हा रोम येथील व्हॅटिकन सिटीला भेट दिली. व्हॅटिकनमधल्या त्या ऐतिहासिक भव्य सिस्टाईन चॅपेलमध्ये मी उभा राहिलो, तेव्हा माझी मती अगदी गुंग झाली होती. मायकल अँजेलो या कलाकाराने तेथील छतावर आणि भिंतींवर रेखाटलेल्या चित्रांतील सौंदर्य निरखण्यास माहितगारास एक दिवसच काय काही आठवडेसुद्धा पुरणार नाहीत.
काहीशी अशीच अवस्था येथे जुन्या गोव्याला आल्यावर माझी होती. येथील सी कॅथेड्रल, बॉम जेजू बॅसिलिका, सेंट मोनिका कॉन्व्हेंट, भग्नावस्थेतील सेंट ऑगस्टीन टॉवर, आता अस्तित्वात नसलेली सेंट पॉल युनिव्हर्सिटी, मांडवीच्या तीरावरचे हे ‘व्हॉईसरॉय आर्च’ आणि अशा इतर कितीतरी वास्तू आणि शिल्पांबद्दल माझ्याबरोबर आलेल्या पर्यटक मित्रमंडळींना काय आणि किती सांगावे असाच संभ्रम पडतो. अनेकांना इतकी खोलवर माहिती जाणून घेण्याची इच्छाही नसते.
४.
गोवामुक्तीनंतर साधारणतः दोन दशकांनंतर म्हणजे १९८०च्या सुमारास केमॉईसच्या या पुतळ्याविषयी गोव्यात नापसंती व्यक्त होई लागली. पोर्तुगीज वसाहतवादी सत्तेचे गुणगान गाणाऱ्या या भाटाचा जुन्या गोव्यात इतक्या मोक्याच्या जागी पुतळा ठेवून त्याचा सन्मान का करावा असा युक्तीवाद काही जण करू लागले. गोवामुक्ती आंदोलनात सहभागी झालेले काही स्वातंत्र्यसैनिक याबाबत आघाडीवर होते. राष्ट्रवाद आणि देशप्रेम यांचा आदर करून या पोर्तुगीज महाकवीचा पुतळा भव्य चौथऱ्यावरून हलवावा अशी मागणी जोर धरू लागली. लवकरच केमॉईसचा पुतळा ही गोवा सरकारसाठी एक ठसठसणारी जखम बनली.
काही वर्षांपूर्वी पुण्यात लाल महालात असलेल्या बाळ शिवाजी आणि जिजामाता यांच्याबरोबरच्या दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याने मोठे वादळ निर्माण केले होते. या घटनेच्या वेळी साहजिकच मला केमॉईसच्या पुतळ्याच्या वादाची आठवण झाली होती. त्या परिसरात अनेक दिवस संचारबंदी लादून एके मध्यरात्री कोंडदेव यांचा पुतळा कडक बंदोबस्तात हलवण्यात आला, तेव्हाच हे वादळ शांत झाले.
गोव्यात कुठल्याही संवेदनाशील विषयाला फाटे फोडण्यासाठी या मुद्द्याला धार्मिक वळण देणे अगदी सोपे असते. याचे कारण म्हणजे या छोट्याशा राज्यात हिंदू आणि ख्रिस्ती समाजाचे लोकसंख्या प्रमाण. केमॉईसच्या पुतळ्याचे समर्थन करणाऱ्या लोकांची राष्ट्रविरोधी वा पोर्तुगीजधार्जिणे म्हणून संभावना करणे सोपे होते. ज्येष्ठ कोकणी साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी विचारवंत रविंद्र केळेकार (केळेकार) यांनीही महाकवी केमॉईसचा पुतळा हलवू नये असे म्हटले होते. (रविंद्रबाब केळेकारांना नंतर ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.)
गोवा प्रशासनाच्या सुदैवाने केमॉईसच्या पुतळ्याचा वाद अगदी अनपेक्षितरित्या, चुटकीसारखा सुटला आणि सर्व संबंधितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. १९८३च्या एके सकाळी केमॉईसच्या या पुतळ्याचा संपूर्ण नरडा फाडला गेला आहे असे दिसले. बहुधा जिलेटीनच्या कांड्या वापरून हा स्फोट घडवून आणला असावा. नवशिक्या व्यक्तींचे हे काम असावे. त्यांचा संपूर्ण पुतळा उडवून देण्याचा इरादा नसावा किंवा त्यांची तितकी तयारी नसावी हे उघड होते. त्या भव्य पुतळ्याचा गळ्यापासून छातीपर्यंतचा भाग त्रिकोणाच्या आकारात फोडल्याचे ते दृश्य माझ्या नजरेसमोर आजही आहे.
त्या दिवशी पणजी आणि म्हापसा शहरांत फटाके वाजवण्यात आले. मात्र या स्फोटाने गोवा सरकारला नक्कीच हायसे वाटले होते. ‘सुंठीवाचून खोकला’ जावा तसा हा प्रकार होता. त्याच दिवशी गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याने क्रेनच्या मदतीने या महाकवीचा पुतळा ‘अर्कायलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या संग्रहालयात हलवण्यात आला. आता तो वॉस्को द गामा, अफान्सो दि अल्बुकेर्क या इतर पोर्तुगीजांच्या सहवासात जांभा दगडांच्या जाडजूड भिंतींत बंदिस्त आहे.
गोव्याला मित्रमंडळींबरोबर गेल्यावर जुन्या गोव्याची भेट नक्की असते. सी कॅथेड्रलच्या त्या मुख्य चौकात आलो की, तिथल्या तो उंच चौथरा आणि महाकवी लुई वाझ डी केमॉईसच्या त्या भव्य पुतळ्याविना तो देखणा चौक मला आजही अगदी ओकाबोका वाटतो !
Comments
Post a Comment