पंतप्रधान राजीव गांधींची निवडणुक प्रचारसभा त्या बातमीबद्दल त्या वेळी मला वाटलेली शरम अजूनही गेलेली नाही!



त्या बातमीबद्दल त्या वेळी मला वाटलेली शरम अजूनही गेलेली नाही ! पंतप्रधान राजीव गांधींची निवडणुक प्रचारसभा  

पडघम - माध्यमनामा



  • माजी पंतप्रधान राजीव गांधी
  • Thu , 21 May 2020
  • पडघममाध्यमनामाराजीव गांधी
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त हा विशेष लेख...
.............
पत्रकार या नात्याने पंतप्रधानपदी असलेल्या, माजी पंतप्रधान असलेल्या वा भविष्यात या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर आलेल्या काही राजकीय नेत्यांना खूप जवळून पाहण्याची, भेटण्याची, त्यापैकी काहींशी बोलण्याची आणि हस्तांदोलन करण्याचीही संधी  मला मिळाली. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंह राव, राजीव  गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर या नेत्यांना याच क्रमानुसार मी जवळून पाहिले वा त्यांना भेटलो.
टेलिव्हिजनवर या नेत्यांना वा इतर कुणाला पाहणे आणि प्रत्यक्षात जवळून पाहणे यात खूप खूप अंतर असते. एखाद्या कसलेल्या कॅमेरामॅनने आपल्या कॅमेऱ्याने क्लोज अप आणि वाईड अँगलने एखाद्या व्यक्तीच्या कितीही हालचाली कुशलतेने टिपल्या तरी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी त्या व्यक्तीच्या टिपलेल्या हालचालींची सर त्यांना नसते. मानवी डोळ्यांनी लाईव्ह टिपलेले क्षण आणि हालचाली त्यामुळेच आपल्या आठवणीत कायम राहतात. त्याच व्यक्तींच्या आणि घटनांचे टेलिव्हिजनवर दाखवलेल्या दृश्यांचे तसे नसते. म्हणूनच इंदिरा गांधींपासून तो थेट अलिकडे पंतप्रधान होऊन गेलेल्या वाजपेयींच्या त्या छोट्याशा भेटींचे क्षण माझ्या डोळ्यांसमोर आजही अगदी ताजे आहेत.
इंदिरा गांधी म्हणा वा अटल बिहारी वाजपेयी किंवा नरसिंह राव म्हणा, या सर्व पंतप्रधान होऊन गेलेल्या व्यक्तींनी आपली सर्व हयात राजकारणात घालवली. ते पंतप्रधान होण्याआधीचा त्यांचा दीर्घ भूतकाळ राजकारणाचा असला तरी देशातील असंख्य लोकांना तो अपरिचितच असतो. याउलट राजीव गांधी राजकारणात आले ते माझ्या पिढीच्या डोळ्यादेखत. त्यांची इनमिन अकरा वर्षांची पूर्ण राजकीय कारकीर्द आम्हा लोकांच्या नजरेसमोर झाली आणि त्या कारकिर्दीचा आणि त्यांचा आयुष्याचा दुःखद अंतही आम्ही अनुभवला. राजीव गांधींची राजकीय कारकीर्द त्यामुळेच माझ्या विशेष स्मरणात आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधींचा राजकीय वारस असलेल्या संजय गांधींचे विमान अपघातात निधन होईपर्यंत राजीव गांधी भारतीय राजकीय पटलावर कुठेच नव्हते. पूर्वीपेक्षा अधिक लोकसभा जागा जिंकून इंदिराजींनी १९८०ला सत्तेवर पुनरागमन केले होते आणि काही महिन्यांतच संजयचे अपघाती निधन झाले. संजयच्या अंत्यसंस्कारावेळी शोक करणाऱ्या पण काळा गॉगल लावून आपले दुःख जगापासून लपवणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधींचं ते छायाचित्र प्रसिद्ध आहे. त्या अंत्यविधीच्या छायाचित्रात राजीव गांधींना पाहिल्याचं आठवत नाही. यानंतर आपल्या आईच्या  आग्रहास्तव आणि पत्नी सोनिया यांचा ठाम विरोध डावलून अगदी अनिच्छेनेच काँग्रेसचे सरचिटणीस होऊन राजीव राजकारणात आले. संजयच्या अमेठी मतदारसंघातून निवडून येऊन ते खासदार झाले आणि १९८४ला इंदिराजींची हत्या झाली.
त्या ३१ ऑकटोबरला  मी पणजी येथे ‘नवहिंद टाइम्स’चा क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत होतो. पणजीला त्या वेळीही शीखांची संख्या अगदी तुरळक होती. दुपारी चारच्या दरम्यान गोवा सचिवालयामागे असलेल्या माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांच्या पुतळ्यापाशी पन्नाशीच्या आसपास असलेल्या एका शीख व्यक्तीला मारहाण होताना मी पाहिले. त्या माणसाने लोकांच्या तावडीतून स्वतःची कशीबशी  सुटका करून घेतली. अर्ध्या तासानंतर बातम्यांचा राऊंडअप घ्यायला मी जवळच्या पोलीस मुख्यालयात गेलो, तेव्हा रक्तबंबाळ झालेले डोके एका कपड्याने बांधून बसलेला तो शीख माणूस मला तेथे दिसला. पोलीस मुख्यालयातच संदेशवहनाच्या म्हणजे वॉकीटॉकी कक्षात तो काम करत होता असे त्या वेळी समजले. पुढील दोन-तीन दिवस देशाच्या राजधानीत आणि इतर ठिकाणी होणाऱ्या नरसंहाराची ती चुणूक होती, हे मला त्या वेळी कळाले नाही.
इंदिरा गांधींची हत्या सकाळी झाली होती, तरी राजीव गांधींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी झाल्यानंतरच सरकारतर्फे संध्याकाळी अधिकृतरीत्या इंदिराजींच्या निधनाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सलग दोन दिवस दूरदर्शनवर अंतिम दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची रांग आणि शोकमग्न नूतन पंतप्रधान राजीव गांधी दाखवण्यात येत होते. त्या काळी दूरदर्शन एकमेव टेलिव्हिजन चॅनेल होते. सततच्या त्या दृश्याने लोकांच्या भावना भडकल्या नसत्या तर नवल असते. त्या दिवसांत शिखविरोधी हिंसाचारात दिल्लीत शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले. मोठा वटवृक्ष कोसळतो तेव्हा भूमीलाही त्यांचे कंप जाणवतातच, हे राजीव गांधींचे या हिंसाचाराबाबतचे विधान त्यामुळेच वादग्रस्त ठरले.
राजीव गांधी पंतप्रधान झाले ते वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी. शपथविधीनंतर लगेच निवडणुका घेऊन जनतेचा कौल मागितला. त्या वेळी देशाच्या जनतेने भरपूर मताधिक्य आणि लोकसभेच्या दोनतृतीयांश जागा देऊन राजीव यांच्यावर आपले प्रेम व्यक्त केले. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बोलावलेल्या पक्षाच्या पहिल्याच अधिवेशनात सरकार आणि जनता यांच्यामध्ये दलाल म्हणून काम करणारा घटक नाहीसा करण्याची त्यांची घोषणा खूप गाजली. सरकारने मंजूर केलेल्या योजनेतील प्रत्येक रुपयातील केवळ पंधरा पैसे लाभार्थी लोकांपर्यंत पोहोचतात, हे राजीव यांचे त्या वेळचे आणखी एक प्रसिद्ध वाक्य.
राजीव गांधींनी अनेक चांगले निर्णय घेऊन लोकांची सदिच्छा कमावली. संत लोंगोवाल यांच्यांशी लोंगोवाल करार करून त्यांनी पंजाबच्या खलिस्तानवादी आणि अतिरेकी कारवायांना चाप लावला. दुदैवाने संत लोंगोवाल यांची लगेचच हत्या झाली. मात्र आपले विश्वासू सहकारी आणि ट्रबल शूटर अर्जुनसिंग यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून आणि रिबेलो यांची पंजाब पोलिसांचे मुख्य नेमून या अशांत राज्यात शांती प्रस्थापित करण्याचे श्रेय राजीव गांधींना दिले पाहिजे. आसाम करार करून तेथे फुटीरता रोखण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले.
राजीव गांधी सरकारबरोबरचा जनतेचा आणि प्रसारमाध्यमांचा हनिमून दोन वर्षे चालला. राजीव गांधींनी मतदार पात्रता वय २१ वरून १८ वर आणले. याच काळात ग्राहक संरक्षक कायदा मंजूर झाला. सॅम पित्रोदा यांना घेऊन राजीव यांनी देशात संगणक युग आणले. डावे पक्ष आणि कामगार चळवळीचा ऑटोमेशनला ठाम विरोध असतानाही देशात संगणक क्रांती आणण्याचे श्रेय राजीव गांधी  सरकारला द्यावेच  लागेल. तेव्हा चाळिशीत आलेल्या आणि त्यामुळे ‘लंबी रेस का घोडा’ असेल अशी भावना असलेल्या राजीव गांधींचे वर्णन देशाला एकविसाव्या शतकाकडे घेऊन नेणारे राजकीय नेतृत्व असे केले जायचे.
ईशान्य प्रांतांच्या दौऱ्यावर असताना राजीव गांधी जीनपँट आणि टी शर्ट घालून फिरले, गॉगल घालून स्वतः जिप्सी चालवणाऱ्या तरुण राजबिंड्या पंतप्रधानाला पाहून देशातली प्रसारमाध्यमे आणि जनता हरखून गेली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पोपसुद्धा दरवर्षी सुट्टीवर जात असतात. पंतप्रधानपदी असताना कुटुंबियांसह अधिकृत सुट्टीवर जाणारे राजीव हे पहिले भारतीय पंतप्रधान. नंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हेसुद्धा सुट्टीवर जात असत.
श्रीलंकेतील तमिळ दहशतवाद अगदी टिपेला पोहोचला, तेव्हा राजीव गांधींनी तेथे भारतीय शांतीसेना पाठवली होती. श्रीलंकेत राजीव गांधी तेथे गेले असता मानवंदनेच्या वेळेस परेडमधील सैनिकांचे इन्स्पेक्शन करताना तमिळ वंशाच्या एका सैनिकाने बंदुकीच्या दस्त्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. प्रसंगावधान राखत राजीव यांनी शिताफीने खाली वाकत त्यावेळी तो हल्ला चुकवला होता. तमिळ प्रश्नाच्या मुद्द्यावरूनच त्यांच्यावर दुसऱ्यांदा पूर्वनियोजित हल्ला झाला तेव्हा मात्र राजीव बचावले नाही.
राजीव यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली ती त्यांचे विश्वासू सहकारी आणि  केंद्रीय अर्थमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग हे बोफोर्स प्रकरणात भ्रष्ट्राचाराचा आरोप करून सरकारमधून बाहेर पडले तेव्हापासून. शाहबानो तलाक प्रकरणात सरकारने सपशेल प्रतिगामी माघारी घेतल्याने केंद्रिय मंत्री अरिफ मोहमद खान यांनी राजीनामा दिला आणि व्ही पी. सिंग यांच्याबरोबर तेही राजीव सरकारविरोधी आघाडीच्या गळ्यातील ताईत बनले.  त्या काळात अख्ख्या देशातील पुरोगामी चळवळीचे हिरो बनलेले अरिफ मोहमद खान भाजपसमर्थक बनून आज केरळच्या राज्यपालपदी विराजमान झाले आहेत हे विशेष. राजीव गांधी सरकारने अयोध्या प्रकरण उकरून काढले आणि देशातील उजव्या राजकीय गटाच्या शिडात आयते वारे भरवून दिले. वरील विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधी वातावरण प्रचंड तापले. विरोधी पक्षनेत्यांना उद्देशून राजीव यांनी म्हटलेले नानी याद दिला देंगे हे वाक्यही टवाळीस निमंत्रण देणारे ठरले.
गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे विभाजन करून स्वतंत्र गोवा राज्याची १९८७ साली निर्मिती झाली. नव्या राज्यस्थापनेच्या सोहोळ्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी पणजीला आले होते. मात्र त्या वेळी आमच्या ‘नवहिंद टाइम्स’ दैनिकाच्या फक्त दोनच बातमीदारांना पास मिळाल्याने पंतप्रधानांचा तो कार्यक्रम कव्हर करण्याची आणि त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची माझी संधी हुकली होती. दोन वर्षानंतर मी पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला जॉईन झालो, तेव्हा ही संधी मला मिळाली.
पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करून राजीव हे १९८९ ला निवडणुकीस सामोरे गेले, तेव्हा सरकारविरोधी वातावरण प्रचंड तापले होते. पुण्यात स.प. महाविद्यालयाच्या मैदानात त्यांची निवडणूक प्रचारसभा झाली. तेव्हा ‘इंडियन एक्सप्रेस’साठी मला बातमीदाराचा पास मिळाला होता. सुरक्षेच्या कारणामुळे बातमीदारांनी पेन आणि नोटपॅडशिवाय स्वतःकडे कुठलीही वस्तू ठेवू नये असे आम्हाला सांगण्यात आले होते. मैदानाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बांबू लावून प्रवेश नियंत्रित करून सर्वांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी होत होती. पत्रकार कक्षाकडे वळण्याआधी पोलिसांनी माझी तपासणी केली, तेव्हा माझ्या पँटच्या खिशात एक गोलाकार वस्तू त्यांना सापडली. कॅमेराचा न धुतलेला म्हणजे डेव्हलप न केलेला तो एक रोल होता. तो रोल घेऊन मला सभास्थानी पत्रकार कक्षाकडे जाता येणार नाही असे पोलीस अधिकाऱ्यांनी मला सुनावले. माझा पास फोटोग्राफरचा असता तर कदाचित मला त्या रोलसह जाण्यास परवानगी मिळाली असती. तो छोटासा रोल वा संशयास्पद वस्तू आता त्या सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर तेथेच टाकून देणे तर अशक्य होते. या गडबडीत माझ्याबरोबरचे इतर पत्रकार घाईघाईने पुढे निघून गेले आणि मी स्वतःला शिव्या देत मागे परतलो. अंधारात दूर एका ठिकाणी रोलची मी ती छोटीशी डबी तिरमिरीत लांबवर भिरकावली आणि अक्षरशः धावत पत्रकार कक्षाकडे आलो. छोटीशीच ही घटना, माझ्याच चुकीमुळे घडलेली. पण ती चूक वेळीच दुरुस्त करून राजीव गांधींच्या कार्यक्रमास मला वेळेवर येता आल्याने त्या घटनेवर लगेच पडदा पडला होता.
सभा लवकरच सुरू होणार होती, पंतप्रधानांचे आगमन झाले होते. अचानक व्यासपीठाकडे जाणाऱ्या जिन्यापाशी काही गडबड जाणवली. राहुल गांधी आला आहे, असे कोणीतरी म्हटले आणि आम्ही सर्वांनी त्या दिशेने बघितले. दूरवर पांढरा पायजमा आणि पांढरा गुरुशर्ट घातलेला चष्माधारी एक विशीतला तरुण जलदगतीने जाताना दिसला. फोटोग्राफरांनी आपले कॅमेरा त्याच्यादिशेने रोखेपर्यंत तो आमच्या नजरेच्या टप्प्यातून नाहीसा झाला होता!
रात्री साडेसात आठच्या दरम्यान राजीव गांधींचे भाषण सुरू झाले. त्यांच्या भाषणाची मुख्य बातमी ‘इंडियन एक्सप्रेस’मधील माझा सहकारी नरेन करुणाकरन देणार होता, तर सभेचे साईडलाईट्स मी देणार होतो. राजीव गांधी बोलताना अधूनमधून आपल्या गळ्याभोवतीच्या उपरण्याने चेहऱ्यावरचा घाम पुसत होते, समोर ठेवलेल्या पाण्याचे अधूनमधून घुटके घेत होते.
दुसऱ्या दिवशीच्या ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये राजीव गांधींचे भाषण पान एकवर प्रसिद्ध झाले. साईडलाईट्समध्ये मी राहुल गांधींच्या उपस्थितीचा उल्लेख केला होता. देशातील तापलेल्या राजकीय वातावरणाचा संदर्भ देत पंतप्रधान गांधींना घाम फुटला होता आणि ते सारखे घाम पुसत होते, पाणी पित होते असे मी बातमीत लिहिले होते आणि तो एक परिच्छेद ‘इंडियन एक्सप्रेस’ने आतील पानावर पण चौकटीत ठळकपणे छापला होता.
यानंतर दोन-तीन दिवसानंतर आम्ही काही पत्रकार कुठल्याशा कार्यक्रमासाठी कारने निघालो होतो. गाडीत बसल्यावर काही क्षणातच ‘इंडियन पोस्ट’चे वार्ताहर किरण ठाकूर यांनी  ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये ती बॉक्स न्यूज कोणी लिहिली होती असे मला विचारले. चौकटीतील ती बातमी मीच लिहिली होती असे मी सांगताच ते म्हणाले, ‘कुठलाही वक्ता अर्धापाऊण बोलत असताना चेहऱ्यावर रुमाल फिरवणार, समोरच्या फुलपात्रातील पाणी पिणार हे नैसर्गिकच आहे. त्यात त्यांना राजकीय कारणांमुळे घाम फुटला असे म्हणणे ठीक नाही. कामिल, लेट मी टेल यू दॅट वॉज नॉट राईट. दॅट इज नॉट जर्नालिझम !’
पुढच्या काळात पुणे विद्यापिठात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे प्रमुख झालेल्या किरण ठाकूर यांचे ते म्हणणे मान्य करण्याशिवाय मला पर्यायच नव्हता. त्या बातमीबद्दल त्या वेळी मला वाटलेली शरम अजूनही गेलेली नाही.  
नोव्हेंबर १९८९च्या निवडणुकीनंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काही महिन्यानंतर राजीव गांधी यांनी पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मी हजर होतो. मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या टिळक रोडवरील इमारतीत झालेल्या त्या परिषदेतपूर्वी आम्ही पत्रकारांनी त्यांना विचारायचे लिखित प्रश्न आपापसांत वाटून घेतले होते. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वतीने मीही माझा प्रश्न वाचला होता आणि त्यास राजीव यांनी उत्तर दिले होते. पत्रकार परिषदेनंतर राजीव गांधी हॉलच्या दरवाज्यापाशी उभे राहिले आणि आम्हा प्रत्येक बातमीदारांशी हस्तांदोलन केले. सफेद कपडे आणि गळ्याभोवती उपरणे असलेल्या राजीव गांधींशी हस्तांदोलन करताना ‘कामिल पारखे फ्रॉम इंडियन एक्सप्रेस’ अशी मी स्वतःची ओळख करून दिली, तेव्हा मंद स्मितहास्य करणाऱ्या राजीव यांचा चेहरा आजही माझ्या नजरेसमोर ताजातवाना राहतो.
या घटनेनंतर दोन वर्षांनी निवडणूक प्रचारसभेत २१ मे रोजी फुलांचा हार हातात असलेल्या धनुच्या रूपाने साक्षात मृत्यूच राजीव यांच्यासमोर उभा ठाकला. त्यांच्या त्या भयानक हत्येचे वर्णन वाचताना मला नोव्हेंबर १९८९चा पुण्यातील प्रचारसभेतील तो प्रसंग आठवला. पंतप्रधान राजीव यांच्याच सुरक्षेच्या कारणामुळे कॅमेराचा साधा रोलसुद्धा व्यासपीठाहून दीडशे-दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पत्रकार कक्षात नेण्याची परवानगी मला त्या वेळी नाकारण्यात आली होती. ही तशी अगदी किरकोळ, क्षुल्लक घटना मी साफ विसरलो होतो. राजीव गांधींच्या हत्येमागील धनु आणि इतरांची भूमिका स्पष्ट झाली, तसे पुण्यातील त्या प्रचारसभेतील माझा तो कॅमेऱ्याच्या रोलचा प्रसंग अगदी बारीकसारीक तपशिलांसह माझ्या नजरेसमोर पुन्हा साकार झाला. पत्रकारितेच्या माझ्या कारकिर्दीतील तो एक मामुली प्रसंग तर आता न विसरता येण्यासारख्या घटनांपैकी एक बनला आहे!
..






Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction