तियात्र
- Get link
- X
- Other Apps
तियात्र
पोर्तुगिज भाषेत त्रियात्रो म्हणजे नाटक. गोव्यात कोकणीतील संगीतनाटकाला तियात्र म्हणतात. त्रियात्रवर युरोपीयन प्रभाव असला, तरी संहितेचा गाभा मात्र स्थानिक मातीशी निगडित असतो.
in संस्कृती
आज रात्री अंजुना स्कुलच्या ग्राऊंडवर तियात्र आहे, तू येतोस का पाहायला?” माझ्या बहिणीने मला विचारले अन मी एकदम खुश झालो. गोव्यात वागातोरला सुट्टीवर आलो होतो आणि आज शनिवारी रात्री तियात्रचा शो आहे असे ऐकले आणि मी ताबडतोब होकार दिला. खूप वर्षांनंतर तियात्र पाहण्याचा योग आला होता आणि मी ही संधी सोडणार नव्हतो.
तियात्र (Tiatr) म्हणजे कोकणी भाषेतील संगीतमय नाटक. पोर्तुगीज भाषेत तियात्रो म्हणजे नाटक. वागातोरहून चालत रात्री साडेनऊच्या दरम्यान अंजुना येथील शाळेच्या मैदानावर पोहोचलो. तेथेच तियात्र आयोजित करण्यात आले होते. देणगी कुपन्सवर प्रवेश देण्यात येत होता. खुल्या मैदानात फोल्डिंगच्या लोखंडी खुर्च्यांवर बसण्याची सोय होती. अगदी पुढच्या रांगेत पांढऱ्या झग्यातील काही फादर बसले होते. बहुतेक त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि स्थानिक चर्चचे धर्मगुरू असणार. त्याशिवाय साध्या वेशांत असलेले काही धर्मगुरूही तेथे होते हे त्यांना अभिवादन करणाऱ्या मुला-मुलींना आणि त्यांच्या पालकांना पाहून लक्षात येत होते. माझ्या बहिणीबरोबर इतरही वेगवेगळ्या काँग्रिगेशनच्या (संस्थांच्या) सिस्टर्स म्हणजे नन्स तेथे आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हॅबिटमध्ये हजर होत्या. अनेकदा या हॅबिटवरून त्या सिस्टरांची संस्था ओळखता येते, जसे निळी किनार असणारी पांढरी साडी म्हणजे मदर तेरेसांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीजचा पोशाख! तियात्रचे एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचा गोव्यात वा भारतात कुठेही आणि अगदी परदेशांतही प्रयोग असला तर तेथील मूळचे गोवन असलेले फादर आणि सिस्टर्स (पाद्री आणि माद्री) श्रोत्यांच्या भूमिकेत हमखास असतात आणि अनेकदा तियात्रच्या संहितेत म्हणजे स्टेजवरही फादर किंवा सिस्टरचे पात्र असतातच. तियात्र सादर करणारे बहुतेक कलाकार आणि या लोककलेचे आश्रयदाते श्रोते बहुतांशकरुन कॅथॉलिक लोकच असतात. तियात्रची संहिता ही गोव्याच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांवर बेतलेली असतात. गोवन ख्रिस्ती कुटुंबांत आणि समाजकारणात पाद्री आणि माद्रीचा काहीही ना काही संबंध असतोच त्यामुळे त्यांच्या पात्रांची तियात्रमधील ही अनिवार्यता!
तियात्र सुरू झाले, कथानक पुढे सरू लागले आणि काही मिनिटांत एक पात्र खास ऑपेराशैलीत गाऊ लागले. या तियात्रमधले हे पहिले कांतार… तियात्रमध्ये अशी खूप कांतार म्हणजे गाणी असतात, एकटयाने, दुकलीने, किंवा अनेक जणांनी म्हटलेली. तियात्रात पार्श्वगायन नसते. त्या पात्राला स्टेजवर हातात माईक घेऊन किंवा स्टेजवर टांगलेल्या माईकच्या पुढयात गायला लागते. त्यामुळे उत्तम गायला येणे ही तियात्रमध्ये प्रमुख भूमिका मिळण्यासाठी एक आवश्यक बाब असते. तियात्र या कलेचे एका खास वैशिष्टय म्हणजे यातील कांतार ते गाणाऱ्या पात्रानेच लिहिले असते, स्वतःच गायले असतें आणि संगीत रचनाही स्वतःच केलेली असते. फक्त संगीतवाद्ये वाजविणारी मंडळी वेगळी असतात. त्यामुळे तियात्रमध्ये गाणारे पात्र हरहुन्नरी, बहुआयामी असावे लागते.
तियात्रवर नक्कीच युरोपियन संस्कृतीचा प्रभाव आहे. मात्र संहितेचा गाभा- विषय- मात्र पूर्णतः स्थानिक मातीचा असतो. तियात्रमध्ये वापरल्या जाणाऱ्या संगीत वाद्यांमध्ये व्हॉयोलिन, गिटार, बँजो, ट्रम्पेट आणि घुमटचा समावेश होतो. एका तियात्रमध्ये दहापासून पंधरापर्यंत कांतारा असू शकतात. गंमत म्हणजे ही सगळी कांतार तियात्रच्या संहितेशी संबंधित असतातच असे नाही. कधीकधी तर असे वाटते की केवळ कांतार असावे म्हणून किंवा पात्राला गायची हौस आहे म्हणून ती तियात्रामध्ये समाविष्ट केली जातात पण कांताराशिवाय तियात्रची कल्पनाच करता येत नाही हेही खरे आणि प्रेक्षकांचीही या कांतारांना पसंती असतेच. चांगला विषय आणि चांगली कांताराही असली तरच तियात्रे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतात.
या तियात्रात मध्यंतरानंतर मला सुखद धक्का बसला. एका दृश्यात सर्व पात्रांनी एकत्र येऊन एका सुंदर मांडो गीत आणि नृत्य सादर केले. ‘मांडो’ हे समूहनृत्य आणि समूहगीत गोव्याच्या लोककलेचा एका महत्त्वाचा भाग आहे. पाश्चिमात्य धर्तीवरील मात्र पूर्णतः गोव्याच्या मातीत रुजलेली ही एक लोककला आहे. या मांडो नृत्यात पुरुष पात्रे युरोपियन पद्धतीचा पोशाख म्हणजे बो टाय, वेस्टकोट, बूट वापरतात तर स्त्रियांचा वेष काहीसा पारंपारिक आणि काहीसा वेस्टर्न असतो. महिलांच्या हातांत नाजूकसे पंखे असतात. सर्व पात्रांनी एकमेकांच्या हातात हात गुंफवून म्हटलेले आणि विशिष्ट पदलालित्य असणारे हे एक ग्रेसफुल समूहनृत्य आणि समूहगीत आहे. गोव्याचे खास वाद्य असलेल्या घुमट, गिटार आणि व्हायोलिनच्या साथीत फुललेल्या या मांडोने आम्हा सर्व श्रोत्यांना डुलायला लावले.
दोन तासांनंतर तियात्र संपले तेव्हा गोव्यात सध्या काय कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मंथन चालू आहे याची एक झलक मिळाली होती. प्रत्येक तियात्रमध्ये असते त्याप्रमाणे या तियात्रच्या संहितेतसुद्धा या सर्व क्षेत्रांवर मार्मिक टिपण्णी होती. उदाहरणार्थ, मूळ गोमंतकीय लोकांची संख्या झपाटयाने कमी होत असून भायलो लोक सगळीकडे मालमत्ता विकत घेत आहेत आणि उद्या गोयंकार स्वतःच्याच भूमीवर उपरे ठरतील हा एक मुद्दा तियात्र लेखकाने आणि दिग्दर्शकाने मांडला होता. प्रत्येक तियात्रमध्ये असा काहीतरी संदेश असतोच, लोकांचे मनोरंजन करणारे विनोद असतो. हुंडा, जातीपातीचे विषय, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह, कौटुंबिक कलह, दारूचे आणि ड्रगचे व्यसन वगैरे गोव्यातील प्रश्न आणि प्रेक्षकांना भावतील असे विषय या तियात्रमध्ये हाताळले जातात.
विशेष म्हणजे गोव्याचा महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या तियात्र या कलेचा जन्म मात्र मुंबईचा आहे ! पोर्तुगीजांच्या सत्तेच्या काळात अनेक गोवन्स मुंबईत कामाच्या शोधात स्थायिक झालेली असत. उत्तर गोव्याच्या बार्देस तालुक्यातील आसगावच्या लुक्झिन्हो रिबेरो या तरुणाने जॉ अगस्तिन्हो फर्नांडिस आणि इतरांच्या मदतीने ईस्टर फेस्तनिमित्त १७ एप्रिल १८९२ला ‘इटालियन बुर्गो’ (इटालियन मुलगा) या नावाचे कोकणी नाट्य मुंबईत सादर केले आणि तियात्र या कलेचा जन्म झाला. रिबेरो त्याकाळात एका इटालियन ऑपेरा कंपनीत कामाला होते. ही कंपनी ‘इटालियन बॉय’ नावाचा ऑपेरा सादर करायची. या नाटकाचीच वेशभूषा वापरुन रिबेरो यांनी आपले कोकणी तियात्र सादर केले होते. मात्र रिबेरो यांचे सहकारी जॉ अगस्तिन्हो फर्नांडिस यांनी नंतर अनेक तियात्रे लिहिली आणि दिग्दर्शित केली म्हणून त्यांनाच तियात्र कलेचे जनक म्हटले जाते.
विशेष म्हणजे गोव्याचा महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या तियात्र या कलेचा जन्म मात्र मुंबईचा आहे ! पोर्तुगीजांच्या सत्तेच्या काळात अनेक गोवन्स मुंबईत कामाच्या शोधात स्थायिक झालेली असत. उत्तर गोव्याच्या बार्देस तालुक्यातील आसगावच्या लुक्झिन्हो रिबेरो या तरुणाने जॉ अगस्तिन्हो फर्नांडिस आणि इतरांच्या मदतीने ईस्टर फेस्तनिमित्त १७ एप्रिल १८९२ला ‘इटालियन बुर्गो’ (इटालियन मुलगा) या नावाचे कोकणी नाट्य मुंबईत सादर केले आणि तियात्र या कलेचा जन्म झाला. रिबेरो त्याकाळात एका इटालियन ऑपेरा कंपनीत कामाला होते. ही कंपनी ‘इटालियन बॉय’ नावाचा ऑपेरा सादर करायची. या नाटकाचीच वेशभूषा वापरुन रिबेरो यांनी आपले कोकणी तियात्र सादर केले होते. मात्र रिबेरो यांचे सहकारी जॉ अगस्तिन्हो फर्नांडिस यांनी नंतर अनेक तियात्रे लिहिली आणि दिग्दर्शित केली म्हणून त्यांनाच तियात्र कलेचे जनक म्हटले जाते.
‘देखणी’ हे गाणे आणि नृत्य आज गोव्याच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनले आहे. राज कपूरने आपल्या ‘बॉबी’ या चित्रपटात या गाण्याच्या – घे घे रे घे रे, घेरे सायबा, माका नाका गो, माका नाका गो’ ओळी आणून हे कोकणी गाणे आणि नृत्य राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केले. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होणारा गोव्याचा कार्निव्हल फेस्टिव्हल आणि या उत्सवाचा नायक असलेला किंग मोमो देशभर प्रसिद्ध आहे. त्याशिवाय शिगमो हा उत्सवही गोव्यात उत्साहाने साजरा केला जातो. पर्यटन खात्यातर्फे कार्निव्हल आणि शिगमोची भरपूर प्रसिद्धी केली जाते. त्यातुलनेत तियात्र आणि ‘मांडो’ या गोव्याच्या कला मात्र गोव्याबाहेरच्या लोकांनां अपरिचितच राहिल्या आहेत.
मी गोव्यात १९८०च्या दशकात बातमीदार असताना कांदोळीचे सरपंच आणि शिक्षक असलेले तोमाझिन कार्दोज यांची ओळख झाली. कार्दोज हे तियात्रची संहिता लिहित आणि प्रयोगही करत असत. त्यावेळी पहिल्यांदाच गोव्याच्या या कलेची मला जवळून ओळख झाली. (कार्दोज नंतर गोवा विधानसभेवर निवडून आले आणि काही काळ विधानसभेचे सभापतीही होते.)
गोव्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या तियात्र आणि मांडो या कला गोव्यातील ख्रिस्ती लोकांनी जपून ठेवला आहे. गोव्यातील कॉन्व्हेंट शाळांत सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आणि चर्चच्या फेस्त (सण) निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांतही आवर्जून मांडो नृत्याचा समावेश केला जातो. गोव्यात अनेक चर्चचा किंवा चॅपेलचा फेस्त (वार्षिक सण) फुटबॉल स्पर्धांशिवाय पूर्ण होत नाही तसेच तियात्रचा प्रयोगही या फेस्तचा एक अविभाज्य भाग असतो. गोव्याची वैशिष्टयपूर्ण संस्कृती आणि वेगळेपण राखण्यात कॅथॉलिक चर्चने फार मोठी भूमिका पार पडली आहे हे आज सर्वच जण मान्य करतात. गोवा १९६१ साली भारतीय संघराज्यात सामील झाला. त्यानंतर हा चिमुकला प्रदेश महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याबाबत भारतात पहिल्यांदाच सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतात अगदी काही थोडक्या टक्क्यांनी स्वतंत्र प्रदेश राहण्याबाबत निर्णय झाला, नाहीतर गोवा महाराष्ट्राचा एका जिल्हा झाला असता. या सार्वमतात गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याबाबत आणि नंतर १९८०च्या दशकांत कोकणीला राज्यभाषा दर्जा मिळावा म्हणून झालेल्या आंदोलनात तेथील चर्चची भूमिका कुणी विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे कोकणी भाषेच्या संवर्धनात आणि दैनंदिन वापरांतही कॅथॉलिक चर्चचे फार मोठे योगदान आहे, हे मान्य करायलाच हवे. गोव्यात सर्वच क्षेत्रांत इंग्रजीचा फार मोठया प्रमाणात वापर होत असला तरी गोव्यात सगळीकडे चर्चच्या उपासनाविधीत कोकणीला आजही प्रमुख स्थान आहे. त्यामुळे पणजी आणि इतर सर्व शहरांत, गावांत रविवारची मुख्य मिस्सा वा कुठल्याही सणाची उपासनाविधी कोकणी भाषेतच होते हे विशेष आहे. जगाच्या कानाकोपऱ्यांत पसरलेले मल्याळी ख्रिस्ती लोकही अशाचप्रकारे आपल्या प्रार्थना आणि उपासना मातृभाषेतच होतील याविषयी अत्त्यंत जागरूक असतात. त्यातुलनेत मराठीभाषक ख्रिस्ती समाज मात्र आपल्या मातृभाषेविषयी आग्रही नाही. आज पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसह अनेक ठिकाणी महाराष्ट्रात चर्चमधील प्रार्थनांतून मराठी कधीच हद्दपार होऊन इंग्रजीचे प्रस्थ वाढत चालले आहे. पुण्या-मुंबईत आणि जगभर स्थायिक झालेला गोयंकार ख्रिस्ती समाज मात्र आजही आपल्या प्रार्थनांत आणि गायनांत कोकणी भाषेचाच वापर करत असतो हे विशेष !
तियात्र हा गोव्यातील संस्कृतीचा खास ठेवा आहे. बहुतेक सर्व तियांत्रिस्ट ख्रिस्तांव असल्याने या तियात्रची संहिताही रोमन लिपीत असते. मराठी भाषाही बोलणारे गोव्यातील हिंदू कोकणी देवनागरी लिपीत लिहितात. कोकणी भाषेसाठी अधिकृतरित्या म्हणजे सरकारदरबारी केवळ देवनागरी लिपीलाच मान्यता आहे. (त्यामुळे साहित्य अकादमी किंवा ज्ञानपीठासाठी केवळ देवनागरी लिपीतील कोकणी साहित्याचा विचार केला जातो. देवनागरीत लिहिणाऱ्या कोकणो साहित्यिक रवींद्र केळेकार यांना ज्ञानपीठ मिळाले आहे . गोवन ख्रिस्ती मात्र लोक ‘आमची भास’ म्हणजे कोकणी रोमन लिपीतच लिहितात आणि कर्नाटकात मेंगलूर वगैरे ठिकाणी स्थायिक झालेले मार्गारेट अल्वा यांच्यासारखे कोकणीभाषिक ख्रिस्ती लोक कोकणी कन्नड लिपीत लिहितात.)
गोव्यातील ख्रिस्ती कुटुंबे जगभर कुठेही स्थायिक झाली तेथे तियात्रचे प्रयोग केले जातात, पुण्यात आणि पिंपरी चिंचवड शहरांत ‘आमची भास’ बोलणारे अनेक गोयंकार आहेत. त्यामुळे पुण्यात दरवर्षी या दोन्ही शहरांतील चर्चमध्ये जाहिरात करुन तियात्रचे प्रयोग केले जातात आणि रसिक मंडळी त्यास चांगला प्रतिसाद देत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यांत गोयंकार मोठया संख्येने स्थायिक झालेले आहेत.या विविध देशांत गोव्यातील तियांत्रिस्ट मंडळी तियात्रचे प्रयोग वेळोवेळी करत असतात. यापैकी काही त्रियात्रीस्ट तर निव्वळ हौसेखातीर पदरमोड करून तियात्रचे प्रयोग करत असतात. गोव्याला भेट देणाऱ्या लोकांनी तियात्र आणि त्याचप्रमाणे मांडो या कलांचा एकदातरी आस्वाद घ्यायला हवा. गोव्याच्या संस्कृतीची आणखी एक आगळीवेगळी झलक त्यातून दिसेल!
Comments
Post a Comment