आमची कॉम्रेडगिरी We as comrades
सोमवार , १० सप्टेंबर, २०१८कामिल पारखे
कम्युनिस्टांना कॉम्रेड तर समाजवाद्यांना साथी म्हणून संबोधण्याची पद्धत १९७०च्या दशकात चांगलीच होती. त्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या 'कॉम्रेड'गिरीच्या काही आठवणी.
मी गोव्यात हायर सेकंडरीसाठी मिरामारच्या धेम्पे कॉलेजात दाखल झालो तेव्हा हिप्पी युग नुकतेच संपत आले होते. १९७०च्या दशकात गोव्यात पर्यटन आजच्याइतके वाढले नव्हते. गोवा भारत संघराज्यात सामील होऊन आताशी कुठे एक तप उलटले होते आणि आम्हाला शिकवणाऱ्या प्राध्यापकवर्गापैकी काही जण पोर्तुगीजांच्या लायसेममध्ये पोर्तुगीज भाषेत शिकलेले असल्यामुळे इंग्रजीत शिकवताना अक्षरशः: अडखळत आणि धडपडत होते. आणि याकाळात आम्हा युवकांमध्ये चळवळीची लाट पसरत होती.
गोव्यात नुकत्याच स्थापना झालेल्या ऑल गोवा स्टुडन्टस युनियनने (आग्सु) त्यावेळी विद्यार्थ्याना बसच्या प्रवासासाठी निम्मे प्रवासभाडे असावे यासाठी आंदोलन सुरू केले. मला सीनियर असलेले सतीश सोनक आणि नंदकुमार कामत त्यावेळी आग्सुचे नेते होते. गोव्यात त्यावेळी फक्त खासगी बस असल्याने हा प्रश्न खूप चिघळला आणि सुशेगाद गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 'खळ-खट्याक' आवाज झाला.
बीए होताच मी नवहिंद टाइम्समध्ये बातमीदार म्हणून रुजू झालो होतो, तरी एमए करत असल्याने विद्यार्थीही होतो. या दुहेरी नात्याने विद्यार्थी आणि युवा चळवळींतील सर्वांशीच माझा जवळचा संबंध होता. याच काळात गोव्यात कॉलेज कॅम्पसमध्ये लाल झेंडा आला आणि युवकांमध्ये कॉम्रेडगिरी सुरू झाली. प्रोग्रेसिव्ह स्टुडण्ट्स युनियन (पीएसयू) या नावाने सुरू झालेल्या या संघटनेत माझ्या हॉस्टेलमधली, कॉलेजातील अनेक मित्र होते. वेगवेगळ्या चळवळीतील ही सर्व मुले-मुली त्यात्या कॉलेजांच्या कँटिनमध्ये भेटत. गोव्यात त्यावेळी इनमीन दहाबारा कॉलेजेस होती आणि ती पणजी, म्हापसा, मडगाव, वॉस्को, पोंडा या चार शहरांतच होती, बांबोळीला गोवा मेडिकल कॉलेज आणि पोंड्याला इंजिनियरिंग कॉलेज होते. मात्र व्यावसायिक कॉलेजांतील विदयार्थी चळवळीच्या फंदात पडत नसत. बातमीदार आणि विद्यार्थी या नात्याने मला किती विश्वासात घ्यायचे याबद्दल हे विद्यार्थी युनियन नेते द्विधा मनःस्थितीत असत आणि मीही त्यांच्याबरोबर कितपत वाहवत जावे याविषयी माझ्याही मनात संभ्रम होता.
या विद्यार्थी आंदोलनातील तो एक प्रसंग मला आजही आठवतो. सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांचा एका ग्रुप सुरक्षारक्षकांना ना जुमानता मांडवी नदीसमोरील समोरच्या थेट मंत्र्यालयात घुसला आणि पहिल्या मजल्यावरील विधानसभेच्या हॉलमध्ये शिरला. या घटनेने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. सभापतींच्या परवानगीविना पोलिसांना विधानसभेत शिरण्याची परवानगी नव्हती आणि केवळ मार्शल इतक्या विद्यार्थ्यांना बाहेर काढू शकत नव्हते. या विद्यार्थ्यांमध्ये मीही होतो. पोलिसांचे पीआरओ असलेले सीआयडीचे डीवायएसपी पदावरील बर्डेसाहेब कागदपत्रांची काही कपाटे सुरक्षित जागी हलवत होते. तेवढ्या गडबडीत आमची दोघांची नजरानजर आलीच. अखेरीस सभापती असलेले लुईस प्रोतो बार्बोसा स्वतः तेथे आले, निदर्शकांविरुद्ध काहीही कारवाई होणार नाही असे आश्वासन देऊन त्यांनी सर्वांना 'सेफ पॅसेज' दिला तेव्हा कुठे घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते सभागृह सोडले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात शिरत होते, तेव्हा बर्डेसाहेबांना तेथून बाहेर पडताना पाहिले. ऑफिसात शिरताच प्युनने मला सांगितले, 'मुदलीयार सायबाने आपयलें तुका.. !"
केबिनमध्ये मी शिरताच वृत्तसंपादक मुदलीयार साहेबांनी आपला चिरूट शिलगावला. अशा पोझमध्ये ते हुबेहूब केंद्रिय मंत्री प्रणब मुखर्जीसारखे दिसायचे.
"तुझा नक्की रोल काय आहे हे बर्डे मला विचारत होते. जिथे काही गडबड होणार असते तिथे तू नेहेमी पोलिसांच्या आधीच पोहोचतो असे ते म्हणत होते.
मी त्यांना स्पष्ट सांगितले, तू आंदोलक विद्यार्थी म्हणून नाही तर रिपोर्टर म्हणून तिथे पोहोचत असतो. ''
एवढे बोलून मुदलियार साहेबांनी पॉझ घेतला आणि म्हणाले, ''मी त्यांना काहीही सांगितले तरी खरं काय आहे हे मला माहीत आहे..... "' आणि हे प्रकरण इथेच मिटले.
पीएसयूचे कार्यकर्ते इतर विध्यार्थी संघटनेच्या सभासदांपेक्षा वेगळे वाटत. ही संघटना डावी होती हे सर्वमान्य झाले होते. जीन्सची निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट या पेहेरावात पीएसयूची मुले-मुली पथ नाट्ये करायची. चळवळीतील लोकांचा - स्त्री-पुरुषांचा - जीन्सची पॅन्ट आणि पांढरा नेहरू शर्ट आणि खांदयावर शबनम बॅग हा ड्रेस कोड तोपर्यंत निश्चित झाला होता. चळवळ्ये म्हणून असेल कदाचित पण आम्हा पत्रकारांचा सुद्धा अनेक वर्षे हाच ड्रेस कोड असायचा. त्यावेळी मी एमए (फिलॉसॉफी) करत असताना आमचे एक प्राध्यापक डाव्या विचारसरणीचे होते. त्यांच्या प्रभावामुळे प्रबंधासाठी मी चक्क 'चारू मुझुमदार आणि नक्षलबारी चळवळ' हा विषय घेतला होता! पीएसयू या संघटनेतील माझे काही मित्र नंतर माझ्याच पावलावर पाऊल ठेवून पत्रकारीतेच्या क्षेत्रात आली. काहींनी सामाजिक कार्य चालू ठेवले आहे तर एक जण चक्क न्यायाधीश म्हणून अलीकडेच निवृत्त झाला असे ऐकले.
"तुझा नक्की रोल काय आहे हे बर्डे मला विचारत होते. जिथे काही गडबड होणार असते तिथे तू नेहेमी पोलिसांच्या आधीच पोहोचतो असे ते म्हणत होते.
मी त्यांना स्पष्ट सांगितले, तू आंदोलक विद्यार्थी म्हणून नाही तर रिपोर्टर म्हणून तिथे पोहोचत असतो. ''
एवढे बोलून मुदलियार साहेबांनी पॉझ घेतला आणि म्हणाले, ''मी त्यांना काहीही सांगितले तरी खरं काय आहे हे मला माहीत आहे..... "' आणि हे प्रकरण इथेच मिटले.
पीएसयूचे कार्यकर्ते इतर विध्यार्थी संघटनेच्या सभासदांपेक्षा वेगळे वाटत. ही संघटना डावी होती हे सर्वमान्य झाले होते. जीन्सची निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट या पेहेरावात पीएसयूची मुले-मुली पथ नाट्ये करायची. चळवळीतील लोकांचा - स्त्री-पुरुषांचा - जीन्सची पॅन्ट आणि पांढरा नेहरू शर्ट आणि खांदयावर शबनम बॅग हा ड्रेस कोड तोपर्यंत निश्चित झाला होता. चळवळ्ये म्हणून असेल कदाचित पण आम्हा पत्रकारांचा सुद्धा अनेक वर्षे हाच ड्रेस कोड असायचा. त्यावेळी मी एमए (फिलॉसॉफी) करत असताना आमचे एक प्राध्यापक डाव्या विचारसरणीचे होते. त्यांच्या प्रभावामुळे प्रबंधासाठी मी चक्क 'चारू मुझुमदार आणि नक्षलबारी चळवळ' हा विषय घेतला होता! पीएसयू या संघटनेतील माझे काही मित्र नंतर माझ्याच पावलावर पाऊल ठेवून पत्रकारीतेच्या क्षेत्रात आली. काहींनी सामाजिक कार्य चालू ठेवले आहे तर एक जण चक्क न्यायाधीश म्हणून अलीकडेच निवृत्त झाला असे ऐकले.
गोव्यात डाव्यांचे म्हणजे सिटूचे आधीपासून अस्तित्व होते. ज्येष्ठ नेते जॉर्ज वाझ होते आणि युवा कार्यकर्ता ख्रिस्तोफर फोन्सेका हे कामगारांचे आणि रापणकारांचे (रापण - जाळी- टाकून मासेमारी करणारे लोक ) प्रश्नांसाठी झगडत होते. डावे, पुरोगामी, सेक्युलर आणि अगदी स्त्री-पुरुष समतावादी असण्याचे युवकांमध्ये एक फॅड होते आणि विशेष म्हणजे अशा लोकांना त्याकाळात वाईट किंवा देशद्रोही समजले जात नव्हते. मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून उदय झाला नव्हता. साम्यवादी विचारसरणीचे साहित्य 'प्रोपागंडा लिटरेचर ' म्हणून अगदी स्वस्तात किंवा फुकटातच मिळायचे. त्यामुळे अगदी सफेद कागदांवर छापलेले आणि जाडजूड आकाराचे मराठी भाषेतील मॅक्झिम गॉर्कीची 'आई' ही कादंबरी, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, लेनिन वगैरेंचे लिखाण अशी पुस्तके वाचनाची थोडीशीही आवड असणाऱ्या व्यक्तींकडे हमखास असायची. घरगुती ग्रंथसंग्रह वाढविण्यासाठी या पुस्तकांचा खूप उपयोग व्हायचा. गोवा, श्रीरामपूर, औरंगाबाद, पुणे आणि नंतर पिंपरी चिंचवडला अगदी जपून आणलेला हा ग्रंथसंग्रह मी सुदैवाने अलीकडेच म्हणजे दोन वर्षाआधी रद्दीत काढला.
मी पत्रकार आणि वृत्तपत्र कर्मचारी यांच्या कामगार संघटनेत सक्रिय झालो तेव्हा हे क्षेत्र डावे, समाजवादी किंवा पुरोगामी लोकांनी काबीज केले आहे असे मला दिसले. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचा सरचिटणीस म्हणून इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टसची (आयएफडब्ल्यूजे) कटक, श्रीनगर, बेंगळुरू येथल्या अधिवेशनाला मी गोव्याच्या तुकडीचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे आम्ही सर्व वृत्तपत्र कामगार चळवळीतील लोक एकमेकांना 'कॉम्रेड' म्हणूनच संबोधित असू. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्ती के. विक्रम राव (आयएफडब्ल्यूजे) अध्यक्ष होते आणि सिटूचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड एस वाय कोल्हटकर देशातील वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष होते. कॉम्रेड कोल्हटकर वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगावर आम्हा कामगारांचे प्रतिनिधित्व करत असत.( काही व्यक्तींची नावे त्याआधी काम्रेड, साथी अशी आदरयुक्त संबोधने असल्याशिवाय पूर्ण होत नसत. उदाहरणार्थ, कॉम्रेड एस. ए. डांगे, साथी जॉर्ज फर्नांडीस, साथी किशोर पवार).
देशपातळीवरील पत्रकारांच्या कामगार चळवळीत वर्चस्वासाठी त्याकाळी कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांमध्ये कट्टर लढत असे. मात्र पत्रकार संघाच्या कुठल्याही कार्यक्रमांत दुसऱ्या सहकाऱ्याचा 'कॉम्रेड' म्हणूनच उल्लेख व्हायचा. या कॉम्रेड नेत्यांची भाषणे आक्रमक आणि कामगारांच्या काळजाला भिडणारी असत हे मी यावेळी अनुभवले आणि त्यांचे अनेकदा अनुकरणही केले. वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगासंदर्भात पणजीत मी अनेकदा मोर्च्यांचे नेतृत्व केले. अशाच एका मोर्च्याच्या वेळी 'सोडचे ना रे, सोडचे ना, जिंक्ल्याबिगर सोडचे ना!' अशी घोषणा मी देत होतो तेव्हा स्वतःच चळवळ्ये असलेले 'गोमंतक'चे संपादक नारायण आठवले गॅलरीतून कौतुकाने माझ्याकडे पाहत होते, ते अजूनही आठवते.
गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा सरचिटणीस म्हणून काम करताना मी मंत्रालयात असलेल्या प्रेस रूममध्ये युनियनवची फाईल घेऊन शिरलो कि कुणीतरी म्हणायचे, 'आमचो जॉर्ज फर्नांडीस आयलो मरे!'' खूप बरे वाटायचे ते ऐकून! डॉ. दत्ता सामंतांचे कामगार चळवळीत आगमन होण्याआधी कॉम्रेड डांगे आणि साथी जॉर्ज फर्नांडीस ही कामगार चळवळीतील होतकरू कार्यकर्त्यांची दैवते किंवा आदर्श असायची. त्याशिवाय जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी माझे एक वेगळेच भावनिक नाते होते. एका धार्मिक कुटुंबातील असलेल्या जॉर्ज हे संन्यासी ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी बेंगळुरुत सेमिनरीत दाखल झाले होते. त्यांच्याप्रमाणेच मीसुद्धा वयाच्या पंधराव्या वर्षी धर्मगुरू होण्यासाठी घरदार सोडले होते!
सन १९८९ मध्ये पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झाल्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या बैठकीत मी इतर पत्रकारांचा 'कॉम्रेड' म्हणून उल्लेख करत असे तेव्हा काही पत्रकारांना धक्काच बसत असे ! कामगार चळवळीची ही झूल मी अनेक वर्षे अंगावर वागवली. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर गेल्या काही दशकांत जगभर कामगार चळवळ ठप्प झाली आहे. आपल्या देशात तर खासगी क्षेत्रांत कामगार युनियन चळवळ जवळजवळ शेवटचे श्वास घेतेय की काय असे मला वाटायला लागले आहे. या बदललेल्या काळात गेली अनेक वर्षें कुणीही मला 'कॉम्रेड' म्हणून साद दिलेली नाही व मीही कुणाला तशी हाक दिलेली नाही. काळाचा महिमा म्हणतात तो हा!
Comments
Post a Comment