एकच बातमी दोनदा छापण्याची गोष्ट Kiran Bedi


गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८




एकच बातमी दोनदा छापण्याची गोष्ट
सोमवार , ३० जुलै, २०१८   goo.gl/U5VdQx कामिल पारखे
एकदा छापलेली बातमी तशीच्या तशी पुन्हा छापायची नाही असा संकेत आहे. मात्र, आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या विनंतीमुळे तो कसा बाजूला ठेवला गेला याची ही गोष्ट.
किरण बेदी यांची दिल्लीहून गोव्याला बदली झाली तेव्हा त्या ज्युनियर पोलीस अधिकारी होत्या. गोवा, दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश त्यावेळी दमण आणि दीव यांच्यासह बारा तालुके असलेला एकच जिल्हा होता. त्यामुळे तेव्हा एकच जिल्हाधिकारी आणि एकच जिल्हा पोलिस अधीक्षक असे.  बेदी या वाहतूक खात्याच्या उपअधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. ही घटना आहे मार्च १९८३ सालची. दोनच वर्षांपूर्वी  'नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार या पदावर मी रूजू झालो होतो. माझ्यासह आमच्या दैनिकात केवळ तीनच बातमीदार होते. आणि त्यामुळे ज्युनियर असल्याने माझ्याकडे असलेल्या अनेक बिट्समध्ये क्राईमचाही समावेश होता. बेदी ज्युनियर असल्या तरी त्यांच्याभोवती तेव्हाच एका वलय निर्माण झाले होते. इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये (आयपीएस) भरती होणाऱ्या त्या पहिल्यावहिल्या महिला होत्या. दिल्लीत अकाली आणि  निरंकारी गटांचे आंदोलन यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल राष्ट्रपतींचे शौर्यपदक त्यांना मिळाले होते. त्याशिवाय  दिल्लीत पंतप्रधानांच्या कार्यालयातील कुणा अधिकाऱ्याची 'नो पार्किग झोन'मधली  मोटारगाडी त्यांनी क्रेनच्या मदतीने टो करून नेल्याच्या घटनेने त्यांना तोपर्यंत 'क्रेन बेदी' ही उपाधी चिकटली होती. अर्थात त्यांची ही कामगिरी मला खूप नंतर कळाली. त्यामुळे  मी त्यांना दबकून राहायचा प्रश्नच नव्हता. माझ्या वृत्तपत्राच्या कार्यालयापासून केवळ  तीनशे मीटर्स दूर असलेल्या गोवा पोलीस मुख्यालयात दररोज संध्याकाळी माझी फेरी असायची. तिथल्या फौजदाराशी  गप्पा झाल्यावर आणि बातम्या गोळा करून मी परतायचो. पणजीबाहेरची किंवा काही महत्त्वाची बातमी असली तर पहिल्या मजल्यावर असलेल्या पोलीस उपअधीक्षक किंवा पीआरओशी बोलणे व्हायचे.  
किरण  बेदी पणजीत आल्या आणि पोलीस मुख्यालयाच्या  पहिल्या मजल्यावरच्या माझ्या फेऱ्या वाढल्या. त्याचे कारण म्हणजे  बेदी यांची दिल्लीहून गोव्याला एका खास 'मिशन'साठी नेमणूक करण्यात आली होती.  १९८३ सालच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राष्ट्रकुल परिषदेत सामील असणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या  प्रमुखांची दिल्लीत बैठक होणार होती. इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार होत्या. ही  कॉमनवेल्थ हेडस ऑफ गव्हर्नमेंट मीटिंग (चोगम) दिल्लीत पार पडल्यानंतर हे सर्व राष्ट्रप्रमुख अनौपचारिक चर्चेसाठी (रिट्रीट) गोव्यात तीन दिवसांच्या मुक्कामासाठी येणार होते. इंग्लंडच्या राणीसाहेबा, पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि त्यांच्यासह एकूण चाळीस राष्ट्रप्रमुख त्याशिवाय परिषदेच्या यजमान असणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी गोव्यात इतका दीर्घकाळ मुक्कामास असणार होते.  या अत्यंत हाय प्रोफाइल 'चोगम  रिट्रिट'साठी सुरक्षा आणि वाहतूक नियोजन करणे आवश्यक होते. यापैकी वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी बेदींवर सोपवण्यात आली होती. याआधी दिल्ली येथे झालेल्या एशियाड १९८२ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या वेळीही  वाहतुकीची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. 
बेदी गोव्यात आल्या आणि चोगमच्या वाहतुकीचे नियोजन करण्याच्या कामास लागल्या. राष्ट्रकुल प्रमुख आणि इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मान्यवर दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर झुआरी पुलावरून आगाशी-पणजीमार्गे त्यांच्या मुक्कामस्थळी म्हणजे खास उभारलेल्या आग्वादा येथील 'ताज व्हिलेज' कडे जाणार होते. काही व्हीआयपींसाठी विमानतळावरून हेलिकॉप्टरने जाण्याचाही पर्याय होता. मात्र सर्व पर्याय खुले होते. या नियोजनासाठी वास्को-दाबोळी ते पणजी-ताज व्हिलेज  ड्राय रन सुरू झाले आणि बातमीसाठी मीही किरण  बेदी यांच्याबरोबर त्यांच्या जिप्सी जीपमध्ये बसून जाऊ लागलो. जीपमध्ये बेदी ड्रायव्हरबरोबर पुढच्या सीटवर बसत.  वॉकी-टॉकीचे जड मशीन घेऊन बसलेला एका पोलीस कॉन्स्टेबल आणि मी मागे  बसत असू. वॉकी-टॉकी हातात घेऊन बेदी कायम सूचना देत असत. 'चार्ली वन  स्पिकिंग,'  'चार्ली वन ओव्हर'  असे  ते संभाषण चालत एका-सव्वा तासांत आम्ही  दाबोळी  ते ताज व्हिलेज अंतर कव्हर करत असू. विशेष म्हणजे त्याकाळात पणजीत वा गोव्यात कुठेही एकही ट्रॅफिक सिग्नल नव्हता. उत्तर गोव्यातून म्हणजे म्हापशातून पणजीला येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जुना (नंतर पडलेला) मांडवी पूल आणि त्यानंतरचा पोर्तुगीजकालीन साडेचारशे वर्षे जुना असा पाटो ब्रिज होता. आताही वापरात असलेल्या या पाटो ब्रिजवरच गर्दीच्या काळात एक पोलीस कॉन्स्टेबल लाल आणि हिरवा सिग्नल घेऊन वाहतुकीचे नियंत्रण करत असे.  
खास चोगमसाठी उभारण्यात आलेले  ताज व्हिलेज म्हणजे आधुनिक काळातील विविध सुविधा असलेली एका मयसभाच होती. मार्गारेट थॅचर, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान बॉब हॉक, झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे वगैरे राष्ट्रप्रमुखांना आपापल्या देशांशी सतत संपर्कात राहता यावे यासाठी त्यांच्या वातानुकलीत कॉटेजेसमध्ये हॉटलाईन्सची सुविधा होती. संपर्कासाठी त्यावेळी हॉटलाईन ही अत्यंत आधुनिक सुविधा होती .   
'चोगम'ची वेळ जवळ येत राहिली तशी बेदी यांची धावपळ वाढत गेली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या सरकारने विविध पावले उचलली होती, त्यापैकी एक म्हणजे चोगमच्या काळात  गोव्यात सर्व सरकारी कार्यालयांना, शाळा-कॉलेजांना तीन दिवस सुट्टी जाहिर करण्यात आली. त्यामुळे गोव्याच्या राजधानीत पणजीत आणि इतर शहरांत कामानिमित्त येण्याऱ्या  लोकांची, विद्यार्थ्यांची संख्या आपोआप कमी होणार होती. त्याकाळात रविवारी  आणि इतर सुट्टीच्या दिवशी पणजी शहर अगदी ओस पडत असे. सुरक्षेचा आणखी एका उपाय म्हणून दाबोळी ते ताज व्हिलेज या हा परिसरातील निवासी बाग आणि हॉटेल्स पोलिसांनी अगदी पिंजून काढला होता. कोणीही संशयास्पद व्यक्ती या काळात तेथे वावरणे धोक्याचे होते. अचूक नेमबाजीचा सराव असणारे स्नायपर्स पणजीतील कॅनॉलशेजारच्या रिओ दे ओरेम रस्त्यावरील उंच नारळाच्या झाडांचाही  टेहळणीसाठी वापर करतील असेही  आम्हाला सांगण्यात आले होते. 
'चोगम'चे पाहुणे गोव्यात पोहोचण्याच्या दोन दिवस आधी किरण बेदींनी पणजीतील आणि शेजारच्या परिसरात होणाऱ्या वाहतूक बदलांची आणि काही निर्बंधांची माहिती देणारे एक प्रसिद्धीपत्रक मला दिले. दुसऱ्या दिवशी नवहिंद टाइम्सच्या पान  तीनवर चौकटीत अगदी ठळकपणे ती बातमी प्रसिद्ध झाली. सर्वच स्थानिक दैनिकांनी ती बातमी वापरली होती. त्या दिवशी सकाळी मी बेदींच्या केबिनमध्ये पोहोचलो तेव्हा तीच बातमी मी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जशीच्या तशी वापरावी असे त्यांनी मला सांगितले. 
बेदींची ती सूचना ऐकताच मी हसलो. 'एकदा छापलेली बातमी पुन्हा तशीच कशी आणि काय म्हणून छापणार?' असा माझा सवाल होता. बातमीत वाहतुकीच्या बदलासंबंधी वा निर्बंधाबाबत काही चूक असल्यास दुरुस्ती करुन ती बातमी पुन्हा छापता  येते पण काहीच बदल न  करता एकच बातमी वृत्तपत्रे परत छापत नसतात असे मी त्यांना विचारले. तुम्हाला तोच मजकूर पुन्हा पुन्हा छापायचा असेल तर तुम्हाला तो मजकूर जाहिरात म्हणून द्यावा लागणार आणि त्यासाठी जाहिरात विभागाशी संपर्क साधावा लागेल असे मी बेदींना सांगितले. 
हे प्रकरण इतके गुंतागुंतीचे असेल याची किरण बेदींना कल्पना नव्हती. शिवाय त्यासाठी  त्यांच्याकडे  फार वेळही नव्हता. पण त्यावर त्यांनी लगेच उपायही शोधला. ''कामिलो, कम विथ मी टू युवर न्युजपेपर ऑफिस..  आय विल स्पिक टू बिक्रम!''
यावर मी पुन्हा हसलो.  बेदी ज्या बिक्रमविषयी बोलता होत्या ते बिक्रम व्होरा माझे बॉस म्हणजे 'नवहिंद टाइम्स'चे मुख्य संपादक होते. तिशीच्या आत त्यांचे वय  असले तरी 'इलेस्ट्रेटेड विकली  ऑफ इंडिया'त खुशवंत सिंग यांच्या तालमीत ते तयार झाले होते. एकच बातमी आपल्या दैनिकात पुन्हापुन्हा छापण्यास ते तयार होतील असे शक्यच नव्हते. 'संपादकसुद्धा  यापेक्षा काही वेगळे सांगणार नाहीत. तुम्हाला त्यांच्याशी बोलायचे असले तर बोला', मी म्हणालो.  
संपादकांशी याबाबत बोलण्यासाठी किरण बेदी आपल्या केबिनमधून बाहेर पडल्या अन मीही त्यांच्यापाठोपाठ जिप्सी जीपमध्ये बसलो. नेहेमीप्रमाणे बेदींच्या हातात पोलीस अधिकाऱ्याची ती छोटीशी केन होतीच. नवहिंद टाइम्सच्या कौलारू एकमजली ऑफिसच्या लाकडी पायऱ्या चढून पोलीस अधिकाऱ्याच्या वेशातील बेदी आणि त्यांच्या पाठोपाठ मी आलो तेव्हा ऑफिसमधील सर्वांच्या नजरा बेदींवर खिळल्या होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व होतेच तसे अगदी रुबाबदार. एकेकाळच्या नावाजलेल्या टेनिसपटू असलेल्या बेदींनी स्वतःला अगदी तंदुरुस्त ठेवले होते.  
ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरील लाकडी फ्लोअरवर आपल्या बुटांचा आवाज करत संपादकांच्या केबिनमध्ये आम्ही शिरलो आणि आता गांगरण्याची पाळी  माझी होती. किरण बेदींना पाहताच  'की  हाल है' असे  म्हणत आमचे संपादक आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी बेदींचे स्वागत केले. संपादक आणि किरण बेदी पंजाबीतून आणि इंग्रजीतून संभाषण करू लागले आणि मी मुकाट्याने आपल्या खुर्चीवर बसून राहिलो. त्या  दोघांची ही पहिलीच भेट नव्हती हे उघडच होते.  लवकरच बेदी आपल्या कामाच्या मुद्दयाकडे वळल्या आणि त्यांची प्रेस नोट आणखी दोन दिवस छापावी अशी त्यांनी विनंती केली. त्याआधी याबाबत मी काय म्हणालो होतो हेही त्यांनी सांगितले. मात्र त्यात माझ्याविषयी तक्रार करण्याचा बिलकुल सूर नव्हता. 
बेदींचे म्हणणे ऐकताच संपादक महाशयांनी त्यांची मागणी ताबडतोब मान्य केली अन माझ्याकडे वळून म्हणाले,  'कामिलो, रिपिट  दॅट न्यूज आयटम फॉर द नेक्स्ट टू डेज अॅज ए स्पेशल केस.'
'बट सर...  ' मी बोलण्याचा प्रयत्न केला. पण माझे मत विचारात घेतले जाणार नाही याची आता मला कल्पना आली होती. 
त्यानंतर बेदींना त्यांच्या वाहनापर्यंत पोहोचवून मी परत संपादकांच्या केबिनमध्ये शिरलो तेव्हा मी जाम चिडलो होतो. मुखभंग काय असतो याचा मी नुकताच अनुभव घेतला होता. बातमीबाबतचे  वृत्तपत्राचे नेहेमीचे संकेत बाजूला सारुन बेदींची मागणी संपादकांनीं मान्य करावे हे मला पसंत पडले नव्हते. संपादकांमुळे माझ्या बीटमधल्या बातमीचे एक  महत्त्वाचे सोर्स असलेल्या एका अधिकाऱ्यासमोर मी तोंडघशी पडलो होतो. 
सिगारेटचे झुरके घेत बिक्रम व्होरांनी माझे म्हणणे शांततेने ऐकून घेतले. आपल्या खुर्चीवरून उठून ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले. 'कामिलो, यू हॅव्ह जस्ट स्टार्ट्रेड युअर कॅरिअर. बट जस्ट थिंक. तुझ्या यापुढच्या कॅरिअरमध्ये किती वेळा तुला राष्ट्रकुल परिषद, पंतप्रधान इंदिरा गांधी  आणि  मार्गारेट थॅचर, बॉब हॉक, रॉबर्ट मुगाबे अशा चाळीस राष्ट्रप्रमुखांचे कार्यक्रम कव्हर करायची संधी मिळणार आहे ? अशा हाय-प्रोफाइल परिषदा, कार्यक्रम अत्यंत दुर्मिळ असतात. आणि अशावेळची सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थाही  अगदी अपवादात्मक स्वरूपाच्या असतात.  अशावेळी आपणही आपले नेहेमीचे वृत्तपत्रीय संकेत बाजूला ठेवले तर काय बिघडले?"
"दुसरे म्हणजे किरण बेदी या अगदी असामान्य पोलीस अधिकारी आहेत.  यू विल व्हेरी रेअरली मिट अँन, एफिशिन्ट, डेडिकेटेड गव्हर्नमेंट ऑफिसर लाईक हर. अशा धडपडया, कर्तृत्ववान अधिकाऱ्यास त्यांच्या कामात मदत होण्यासाठी अशी महत्त्वाची बातमी रिपिट केली तर त्यात वावगे काय?" संपादक मला समजावत होते. मला त्यांचे म्हणणे पटत होते तरी बेदींशी आधी याबाबत वाद घालून  आता मीच तोंडघशी पडलो याचेच मला जास्त वाईट वाटत होते. 
मग कुणालाही समजावण्यासाठी वापरण्याचे आपले परवलीचे शब्द व्होरा साहेबांनी वापरले.  'कमॉन, हॅव अ हार्ट, बी अ  स्पोर्ट  अँड गिव्ह हर चान्स' ते म्हणाले. यानंतर मात्र माझा रोष खूप प्रमाणात कमी झाला. त्यानंतर पुढील तीन-चार दिवस व्हीव्हीआयपींच्या आगमनामुळे आणि त्यांच्या बातम्या करण्याच्या धावपळीत आणि खूप नव्या अशा एक्साईटमध्ये गेले. 'चोगम' परिषदेचे वार्तांकन करणे अनेक कारणांनी अस्मरणीय ठरले.  त्यामुळे बेदींबरोबर झालेला वाद याकाळात मी पूर्ण विसरून गेलो. त्यानंतरच्या काळात आमच्या संभाषणात बेदींनीही हा विषय कधीही काढला नाही.  
साडेतीन दशकांच्या कालावधीनंतर आज मागे पाहताना आणि बेदींच्या कर्तृत्वाचा, कारकिर्दीचा लक्षणीय आणि काहीसा वादग्रस्त प्रवास पाहता संपादक बिक्रम व्होरांचे म्हणणे खरेच होते हे अगदी मनापासून पटते. 

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction