हॉल ऑफ फेम - कराड येथे टिळक हायस्कुलात मी अकरावीला शिकत होतो तेव्हा तिथल्या ऑफिसाशेजारी लावलेल्या एका फलकाकडे माझे नेहेमी लक्ष जायचे.
संपूर्ण महाराष्ट्रात खूप वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शाळेतील एका विद्यार्थ्यांचे नाव त्यावर लिहिले होते. त्या फलकावर त्या एका नावाशिवाय खाली इतर नावे होती कि नव्हती ते आता आठवतही नाही, मात्र ते पहिले नाव अगदी लख्ख आठवते. ते नाव होते वि. स. पागे.
त्यावेळी मी विद्यार्थी होतो तरी हे वि. स. पागे त्याकाळात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते हे मला माहित होते, त्यामुळेच तो फलक आणि ते नाव आतापर्यंत कायम आठवणीत राहिले.
रोजगार हमी योजनेचे (रोहयो) जनक असलेल्या विठ्ठल सखाराम पागे यांनी १९६०-१९७८ ही १८ वर्षे सलगपणे विधानपरिषदेचे सभापतीपद सांभाळले होते. .
ते शैक्षणिक साल होते १९७६-७७, काळ आणीबाणीचा होता आणि पंतप्रधान इंदिरा गांधी अन त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी माझे आणि खुद्द कराडमधील अनेक लोकांचे मत फारसे अनुकूल नव्हते.
तर अशा प्रकारचे नामवंतांचे नामफलक किंवा फोटो पाहण्याचा मला छंदच आहे.
काही विशिष्ट ठिकाणीच असे फलक किंवा फोटो भिंतींवर ओळीने मांडून ठेवलेले असतात.
ऐंशीच्या दशकाअखेरीस गोवा सोडून मी नुकताच पुण्यात `इंडियन एक्सप्रेस'ला बातमीदार म्हणून रुजू झालो होतो तेव्हाची गोष्ट.
पुणे महापालिका बिट कव्हर करणाऱ्या सहकारी पत्रकाराबरोबर पुणे महापालिकेत गेलो होतो. तेव्हा तिथे एका कक्षात भिंतीवर अनेक कृष्णधवल फोटो ओळीने मांडून ठेवलेले दिसले.
उपजत उत्सूकतेपोटी मी ते सर्व फोटो आणि त्या व्यक्तींची नावे वाचत गेलो.
पुणे नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून १९९० पर्यंत या संस्थेचे नगराध्यक्ष आणि महापौर यांचे ते फोटो होते, त्यांचा कालखंडसुद्धा तिथे लिहिला होता. त्यात अनेक परिचित नावे आणि फोटो होती.
त्या घटनेनंतर आज पंचवीस वर्षानंतर त्यापैकी काही ठळक नावेच आठवतात. उदाहरणार्थ, न. चिं. केळकर, नानासाहेब गोरे, मोहन धारिया आणि भाई वैद्य.
त्याआधी श्रीरामपूरला सोमैय्या हायस्कुलात शिकताना माझे एकट्याचेच नाव एकदा नोटीस फलकावर झळकले होते आणि ती नोटीस मला नक्कीच भूषणावह नव्हती. ती तशी काही फार गंभीर बाब नव्हती तरी त्या आठवड्याभर मला शाळेच्या मैदानासमोर वावरणे मुश्किल झाले होते हे आजही आठवते.
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी खूप वर्षांपूर्वी मी रशिया आणि बल्गेरियात होतो. शीतयुद्धाच्या आणि साम्यवादाच्या या अखेरच्या सुवर्णकाळात या दोन राष्ट्रांत ठिकठिकाणी अशा अनेक महापुरुषांचे पुतळे किंवा तसबिरी ओळीने दिसायच्या.
मॉस्को येथे असताना कॉम्रेड ब्लादिमीर लेनिन यांचे शव जतन करून ठेवलेल्या त्या स्मारकापाशी ओळीने खडे केलेले ते अर्धपुतळे माझ्या आजही नजरेसमोर आहेत.
सर्वप्रथम भव्य पुतळा होता कार्ल मार्क्सचा, त्यानंतर फ्रेडरिक अँजल्स, लेनिन आणि जोसेफ स्टँलिन.
आजमितिला पुतळ्यांची ही रांग त्या जागीच आहे कि सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर त्यांची रवानगी वस्तुसंग्रहालयात करण्यात आली आहे हे मला माहित नाही.
लंडन शहरातील मादाम तुसा संग्रहालय तर याबाबतीत जगप्रसिद्ध आहे. जगभरातील विविध क्षेत्रांतील नामवंत लोकांचे मेणाचे पुतळे येथे आहेत.
काही वर्षांपूर्वी युरोपमध्ये कुटुंबियांसह तीन आठवडे राहूनसुद्धा इंग्लंडला मला जाता आले नाही याची मनाला कायम चुटपुट आहे.
माझे `महाराष्ट्र चरित्रकोश (इ.स. १८०० ते इ.स. २०००)'चे काम चालू होते त्यावेळी पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाचनालयात वारंवार जाणे होई. तेव्हा तेथेसुध्दा अनेक साहित्यिकांचे कृष्णधवल फोटो होते, त्यापैकी अनेक परिचित, काहींचे फोटो मी पहिल्यांदाच पाहत होतो.
या फोटोंमध्ये अर्थातच हरी नारायण आपटेपासून केशवसुत, माधव ज्युलियन, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, शंकर पाटील, बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज वगैरे नामवंत साहित्यिकांचे फोटो आणि नावे होती.
ज्यांची साहित्यकृती आपण वाचत आलो त्यांचे फोटो असे एकत्रितपणे पाहणे मला खूप आनंददायी होते.
मागच्या आठवड्यात एका मराठी पुस्तकविक्री दालनात गेलो होतो. तिथे दोन्ही जिन्यांवर काही मोजक्याच साहित्यिकांची मोठी छायाचित्रे लावली होती. त्यामध्ये मराठीतील सर्व ज्ञानपीठ पारितोषक विजेते लेखक होते, त्याशिवाय आचार्य अत्रे, जयवंत दळवी, शांता शेळके, वसंत कानेटकर वगैरेंची छायाचित्रे होती.
आणि ही अगदी कालपरवाची गोष्ट. एका मोठ्या मॉलमध्ये असलेल्या बुकस्टॉलमध्ये सहज नजर टाकायला म्हणून गेलो होतो. तिथे काही पुस्तके चाळताना माझी नजर अचानक पुस्तकांच्या शेल्फच्या अगदी वर असलेल्या फोटोंकडे गेली.
त्या मोठ्या दालनात तिन्ही भिंतींच्या अगदी वर इथूनतिथून भलेमोठे कृष्णधवल फोटो ओळीने मांडले होते. उंचावरच्या त्या प्रत्येक फोटोखाली त्या व्यक्तीचे नाव लिहिले होते तरी ते झाकले गेल्याने वाचता येत नव्हते. तरी त्या फोटोंतील अनेक व्यक्ती परिचित होत्या.
पुस्तकाच्या दुकानातील फोटोंमधील त्या सर्व व्यक्ती जगातील नामवंत साहित्यिक होते हे सांगण्याची गरज नाही.
त्यापैकी काही परदेशी साहित्यिक परिचित होते, बर्ट्रांड रसेल, विन्स्टन चर्चिल, स्टिफन हॉकिंग, झुम्फा लाहिरी, सलमान रश्दी वगैरे त्याशिवाय भारतीय साहित्यिकांपैकी मुन्शी प्रेमचंद, रस्किन बॉंड, सुधा मूर्ती, अरुंधती रॉय, शशी थरुर, गुलजार वगैरेंचे फोटो तेथे होते.
पण अचानक माझी नजर एका फोटोवर थबकली होती.
त्या पुस्तक दालनात येणाऱ्या कुणाही व्यक्तीला तो फोटो एकदम परिचयाचा असणार होता. पण तरीही या विशिष्ट क्षेत्रातील नामवंतांच्या फोटो मालिकेत ती व्यक्ती `ऑड मॅन आऊट' होती.
अर्थात त्यांच्यासारखी आणि त्यांच्याच क्षेत्रातील आणखी एका व्यक्तीचासुद्धा - सर विन्स्टन चर्चिल यांचाही - तेथे फोटो होता.
आचार्य अत्रे यांचे `कऱ्हेचे पाणी' हे खंडात्मक आत्मचरित्र मी शाळेत असतानाच वाचले होते, त्यानंतर गोव्यात कॉलेज जीवनात इंग्लडचे दोन वेळेस पंतप्रधान बनलेल्या सर विन्स्टन चर्चिल यांच्या तशाच जाडजूड आकाराच्या आत्मचरित्राचा काही भाग मी वाचला होता.
तरी तो अगदी परिचित फोटो या जगभरातील साहित्यिकांच्या मांदियाळीत पाहून मला सुरुवातीला आश्चर्य वाटले ते क्षणाभरच. कारण त्या व्यक्तीच्या महत्त्वपूर्ण साहित्यिक योगदानाबाबत काही शंकाच नव्हती.
तो फोटो भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा होता. त्यांनी लिहिलेला `डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा जाडजूड आणि मौल्यवान ग्रंथही त्या पुस्तक दालनात होताच.
नेहरु यांची पुस्तके मुळातून मी स्वतः वाचलेली नाही, मात्र त्यांच्यावर लिहिले जाणारे मी सतत वाचत आलेलो आहे.
मनापासून सांगतो त्या लोकप्रिय `बेस्ट सेलर' साहित्यिकांच्या रांगेत भारताच्या या माजी पंतप्रधानांनासुद्धा मानाचे स्थान मिळावे याचा मलाच खरच आनंद आणि अभिमान वाटला होता.
Camil Parkhe
Comments
Post a Comment