नूतन वर्षाचा आरंभ.


 गोव्यात मी शिकत असताना तिथल्या कॅथोलिक म्हणजे किरिस्ताव लोकांसाठी तीन दिवस किंवा फेस्त खूप महत्त्वाचे असायचे. हे तीन फेस्त म्हणजे २५ डिसेंबरचा ख्रिसमस, सेंट फ्रान्सिस झेव्हियरचा तीन डिसेंबरला येणारा आणि पब्लिक हॉलिडे असणारा फेस्त आणि 31st डिसेंबरची रात्र म्हणजेच नूतन वर्षाचा आरंभ.

तर पणजीतल्या The Navhind Times या इंग्रजी दैनिकात मी बातमीदार होतो तेव्हाची ही गोष्ट. आमच्या या इंग्रजी दैनिकात अनेक कामगार लायनो मशिन ऑपरेटर, फोरमन, वगैरे ख्रिस्ती होते आणि या पेद्रु, मिंगेल, कॅजिटन, रिबेलो वगैरे मंडळींना ख्रिसमसची २५ डिसेंबरला मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनाविधीसाठी सुट्टी द्यावी अशी मागणी असायची.
या दिवशी गोव्यात इंग्रजी दैनिकातील जाहिराती वगैरे आर्थिक बाबी विचारात घेता हे शक्य नसायचे. ..
मग या सर्व कामगारांना तडजोड म्हणून ३१ डिसेंबरच्या न्यु इयर बॉलला म्हणजे डान्सला हजेरी लावण्यासाठी पाने लवकर लावून जाण्याची मुभा असे आणि १ जानेवारी रोजी The Navhind Times आणि मराठी जुळे दैनिक 1नवप्रभा' कामगारांना चक्क सुट्टी असायची.
.
नववर्षाला बंद असणारे द नवहिंद टाइम्स आणि नवप्रभा ही दैनिके जगात एकमेव असावी.
त्याशिवाय गुड फ्रायडे या दिवशीसुद्धा याच कारणाने या दैनिकांना सुट्टी असायची. आता याबाबत काय स्थिती आहे हे मला माहित नाही.
ख्रिसमसला मिडनाईट मास किंवा प्रार्थनेला आवर्जून उपस्थित राहणारे लोक त्याकाळात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या Thanksgiving प्रार्थनेला हजर राहतील अशी शक्यता कमी असायची.
याचे कारण म्हणजे ३१ डिसेंबरचा रात्रीचा New Year Ball किंवा डान्स.
गोव्यात पणजीत, म्हापशात, मडगावला आणि इतर ठिकठिकाणी असे डान्स कार्यक्रम असायचे आणि तिथे तुफान गर्दी असायची. अर्थात लोक म्हणजे जोडपी डान्स पाहायला नाही तर डान्समध्ये सहभागी होण्यासाठी गर्दी करत असत.
गोव्यात लग्न वगैरे कार्यक्रमांत संगीत आणि डान्सला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. तरूण, मध्यमवयीन आणि अगदी साठी सत्तरीतली जोडपी अशावेळी थ्री पिस सुटांत आणि फॉर्मल वेशात डान्स फ्लोअरवर येऊन अगदी मनसोक्त नाचत असतात. Live Band असतोच. प्रत्येक गाण्याच्या आणि संगीताच्या डान्स स्टेप्स त्यांना माहित. असतात.
मी स्वतः पणजी चर्चपाशी असलेल्या आणि त्यावेळी लाकडी फ्लोअर असलेल्या Clube Nacional या हॉलमध्ये असाच अनेकदा नृत्यात सहभागी झालेलो आहे.
मी हे जे वर्णन करतो आहे ते सत्तरच्या दशकातले आहे. तोपर्यंत गोव्यात ख्रिसमस आणि न्यू इयर स्वागत हे कौटुंबिक आणि खासगी कार्यक्रम असत. जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात असायला पाहिजे अशी गोव्याबाहेरच्या लोकांची भावना तोपर्यंत रूढ झाली नव्हती.
गेली काही वर्षे ख्रिसमसला मी गोव्यात असतो, तिथे यावेळी तशी गर्दीही नसते पण न्यू इयरची गर्दी जमण्याआधीच तेथून परत निघतो.
पण 31st डिसेंबर रात्र म्हणजे म्हणजे डान्स आणि सेलेब्रेशन हे समीकरण डोक्यात अगदी पक्के बसले आहे.
Camil Parkhe December 31, 2023

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction