बॉसच्या फार जवळ जाऊ नये, फार पुढेपुढे, सलगी करु नाही असे शहाणी माणसे म्हणतात. हा मंत्र मी फार कसोशीने पाळत आलो आहे. चार दशकांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत एकदोन जणांचा किंवा अख्ख्या टीमचा बॉस होण्याची आपत्ती माझ्यावर फार कमी काळ -अगदी नोकरीच्या शेवटच्या टप्प्यावर - आली. माझे कनिष्ठ सहकारी किंवा माझ्याबरोबरीचे कालांतराने माझे बॉस झाले तेव्हाही मी वरचा हा मंत्र सतत ध्यानात ठेवला.

माझ्या अगदी पडझडीच्या काळात संपूर्ण जग नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकीय विभागाच्या बॉसने शेरना गांधी (आणि मुख्य वार्ताहर अभय वैद्य ) यांनी मला इंडियन एक्स्प्रेसमधून बोलावले. कॉनी मस्कारेन्हास याने म्हटले आहे की शेरना यांना फक्त कामाशी मतलब होता, एखाद्या व्यक्तीच्या खासगी किंवा पूर्वायुष्याशी नाही.
पुण्यात टाइम्समध्ये दोन वर्षे शेरना गांधी Sherna Gandhy बॉस होत्या. (Gandhy हे नाव गांधी असे लिहिले जाऊ नये असा एक मुद्दा इथे मागच्या वर्षी एका पुस्तकाविषयी वाद झाला तेव्हा मांडला गेला होता.) वर म्हटल्याप्रमाणे मी कधीही शेरना मॅडमच्या घरी खाण्यापिण्याच्या पार्टीना गेलो नाही, मात्र त्यांच्या कामाच्या वकुबाविषयी editorial skill बाबत मला कायम आदर राहिला.
माझा अनुभव आणि वय काहीही असले तरी पगार आणि पद याबाबत टाइम्स ऑफ इंडियाच्या पुण्याच्या आवृत्तीत संपादकीय विभागात मी सर्वात कनिष्ठ होतो. पण इंडियन एक्स्प्रेसप्रमाणेच या राष्ट्रीय पातळीच्या इंग्रजी दैनिकात काम करण्याची मजा आणि नशा काही और होती.
आजही मी या दोन्ही दैनिकांत काम केल्याचे मी सांगितले की लोकांचा माझ्याविषयीचा आदर थोडाबहुत वाढतो असे माझ्या लक्षात आले आहे.
शेरना यांना बेनेट अँड कोलेमान व्यवस्थापनाने डावलल्याने त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया सोडले. त्यानंतर आलेल्या नव्या बॉसच्यासुद्धा वळचणीला मी गेलो नाही, त्याचा जोरदार फटका मला बसलाच.
काही वर्षांपूर्वी इथले गोव्याबद्दल आणि पत्रकारितेच्या माझ्या अनुभवांचे काही लिखाण शेरना मॅडमच्या नजरेस पडले तेव्हा त्यांनी मला चक्क मेल लिहून याबाबत आश्चर्य व्यक्त केले. टाइम्समध्ये तू त्या PUWJ मधून आलेल्या प्रेसनोट्सचा गठ्ठा सांभाळायचा, एव्हढेच माझ्या लक्षात आहे, तुझ्या या बॅकग्राउंडबावत मला काहीच माहिती नव्हती असे त्यांनी मेल मध्ये लिहिलं होते.
पत्रकारितेची पगारी नोकरी सोडण्याचा मूर्खपणा मी दोनदा ( सडाफटिंग असताना) केला. दुसऱ्या वेळी शेरना गांधी यांनी मला पुन्हा लाईनीत, मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली. त्यानंतर कैक वर्षांनी मी रितसर सन्मानाने निवृत्त झालो. याबाबत मी शेरना गांधी यांचा कायम ऋणी राहिल.
Rest in peace Dear Sherna Ma'm...

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction