
बॉसच्या फार जवळ जाऊ नये, फार पुढेपुढे, सलगी करु नाही असे शहाणी माणसे म्हणतात. हा मंत्र मी फार कसोशीने पाळत आलो आहे. चार दशकांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत एकदोन जणांचा किंवा अख्ख्या टीमचा बॉस होण्याची आपत्ती माझ्यावर फार कमी काळ -अगदी नोकरीच्या शेवटच्या टप्प्यावर - आली. माझे कनिष्ठ सहकारी किंवा माझ्याबरोबरीचे कालांतराने माझे बॉस झाले तेव्हाही मी वरचा हा मंत्र सतत ध्यानात ठेवला. माझ्या अगदी पडझडीच्या काळात संपूर्ण जग नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकीय विभागाच्या बॉसने शेरना गांधी (आणि मुख्य वार्ताहर अभय वैद्य ) यांनी मला इंडियन एक्स्प्रेसमधून बोलावले. कॉनी मस्कारेन्हास याने म्हटले आहे की शेरना यांना फक्त कामाशी मतलब होता, एखाद्या व्यक्तीच्या खासगी किंवा पूर्वायुष्याशी नाही. पुण्यात टाइम्समध्ये दोन वर्षे शेरना गांधी Sherna Gandhy बॉस होत्या. (Gandhy हे नाव गांधी असे लिहिले जाऊ नये असा एक मुद्दा इथे मागच्या वर्षी एका पुस्तकाविषयी वाद झाला तेव्हा मांडला गेला होता.) वर म्हटल्याप्रमाणे मी कधीही शेरना मॅडमच्या घरी खाण्यापि...