ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन

 ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमझान महिना ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो.

नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात, माझ्याही डोक्यात ते अजून बसले नाही. तर या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा सद्या चालू आहे.

पाम संडेपासून सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा. खरे पाहता हा होली विक अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे न फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात.
आज मौंडी थसडे किंवा पवित्र गुरुवार. याच दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्या बारा प्रेषितांबरोबर शेवटचे भोजन केले, शतकोनुशतके वेगवेगळ्या चित्रकारांनी या `लास्ट सपर' ला आपल्या खास शैलीत रेखाटले आहे.
या जेवणाआधी येशू आपल्या बारा शिष्यांचे चक्क पाय धुतो ! कुणीही लहानथोर नाही, असा संदेश या कृतीतून देतो.
लिओनार्दो दा व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे. गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीत काढलेले `द लास्ट सपर' हे चित्र इथे मी दिले आहे.
या `लास्ट सपर' चित्रात येशूला तीस मोहरांसाठी ज्याने विकले तो ज्युडास त्या पैशाची थैली घेऊन बसलेला दाखवला आहे. पावित्र्याचे प्रतीक असलेली आणि इतर सर्वांच्या चेहेऱ्याभोवती असलेली प्रभावळ मात्र ज्युडासच्या चेहेऱ्याभोवती नाही !
या लास्ट सपरच्या वेळी ख्रिस्ताने धर्मगुरु संस्थेची स्थापना केली असे म्हणतात. ``हे माझ्या आठवणीसाठी करत जा'' असे येशू म्हणाला आणि अशाप्रकारे चर्चमध्ये दरदिवशी आणि रविवारी मिस्साविधी होतो आणि `लास्ट सपर'ची उजळणी होते.
हे शेवटचे भोजन झाल्यावर या भोजनात सहभागी झालेला यहूदा किंवा ज्युडास मग आपल्या प्रभूचे चुंबन घेऊन त्याला त्याच्या मारेकऱ्यांच्या हवाली करतो.
रात्रभर येशूचा छळ होऊन दुसऱ्या दिवशी रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी पिलात येशूला रोमन रिवाजानुसार क्रुसावर खिळण्याची सजा फर्मावतो. क्रुसावर शेवटचा श्वास घेण्याआधी येशू म्हणतो : हे बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही.'' हा दिवस म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार. So
No wishing anyone Happy Good Friday !!!
लेन्ट सिझनमधला शेवटचा उपवास गुड फ्रायडे. मागच्या वर्षी लेन्ट सिझनबाबत एक मोठा लेख मी इथे टाकला होता. पुनरुक्ती टाळतो आहे.
उपवासाचे नियम चर्चने हल्ली खूपच शिथिल केले,आहेत, संपूर्ण चाळीस दिवसांत फक्त अँश वेन्सडे म्हणजे भस्म (राखेचा) बुधवार आणि गुड फ्रायडे ऑब्लिगेटरी आहेत, बाकी सर्व दिवस पूर्णतः ऐच्छिक !
आणि ही आहे लेन्ट सिझनबाबतच्या जुन्या पोस्टची लिंक
Camil Parkhe April 6, 2023

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction