. मराठी पुस्तकांचा खप - आचार्य अत्रे यांना १९६६ साली `नोबेल' पारितोषिक मिळाले. मराठी साहित्यिकाला नोबेल पारितोषक मिळेल, तेव्हा मिळेल, पण आता त्याबाबत जनमताची चुणूक जाणून घ्यावी म्हणून `ललित' मासिकाने वाचकांचा प्रतिसाद मागवला तेव्हा प्रल्हाद केशव अत्रे यांना प्रथम क्रमांकाची मते मिळाली. पु. ल. देशपांडे आणि वि. स. खांडेकर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते.

`ललित' मासिकाच्या वतीने जयवंत दळवी आणि इतरांनी हा बिनपैशाचा नोबेल पुरस्कार अत्रे यांना दिला तेव्हा अत्रे त्यांच्या स्वभावानुसार याबाबत जाम खुशीत होते. दळवी लिहितात कि ``उत्साहाच्या भरात अत्रे यांनी आम्हाला दहाबारा दिवस पुरतील, एव्हढे खाद्यपदार्थ मागवले होते'' ( विषय अत्रे यांच्या संदर्भात असल्याने ही बहुधा जयवंत दळवी यांची अतिशयोक्ती असावी असं मला वाटतं )
यावेळी अत्रे यांची दीर्घ मुलाखत घ्यावी असं जयवंत दळवी यांना वाटलं पण तसा योग दोनतीन वर्षे आला नाही. अन एक दिवस म्हणजे १२ जून १९६९ला प्रकाशक ग. पां. परचुरे यांचा दळवी यांना फोन आला : ``आता साहेबांची आशा नाही'' असं म्हणून फोनवरची व्यक्ती हमसाहमशी रडू लागली. ''त्याच क्षणी 'मुलाखत गेली' एव्हढाच ध्वनी माझ्या मनात उमटला '' असं दळवी यांनी लिहिलं आहे.
त्या चुटपुटीनंतर मात्र वयाच्या साठी आणि सत्तरीच्या आसपास असलेल्या नामवंत मराठी साहित्यिकांच्या मुलाखती घेण्याचा धडाका दळवी यांनी सुरु केला आणि या मुलाखती १९७०-७१ मध्ये ललित मासिकात प्रसिद्ध झाल्या. ''साहित्यिक गप्पा दहा साहित्यिकांशी'' या नावाने १९८६ साली पुस्तकरुपात या मुलाखती प्रसिद्ध झाल्या.
या ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये तेव्हा ( किंवा एकेकाळी) आघाडीवर असलेल्या वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. त्र्यं. माडखोलकर, र. वा. दिघे, बा. भ. बोरकर, दुर्गा भागवत, अनंत काणेकर, कवी यशवंत, कवी मनमोहन आणि दिवाकर कृष्ण यांचा समावेश होता.
श्रीरामपूरला शालेय विद्यार्थी असताना नगरपालिकेच्या वाचनालयात पहिल्यांदा `ललित' मासिकात 'ठणठणपाळ' च्या रुपात जयवंत दळवी यांचे लिखाण मी आवडीनं वाचलं. खूप दिवस 'ठणठणपाळ' म्हणजेच जयवंत दळवी असं लोकांना माहितीच नव्हतं. जयवंत दळवी यांची विविध विषयांवर असलेली पुस्तके, कादंबऱ्या वगैरे मी वाचली नाही तरी त्यांच्याविषयी (उदाहरणार्थ, त्यांची मासे खाण्याची आवड ) खूप वाचलं आहे. माझी अशीच गोष्ट ना. सी. फडके, जी. ए. कुलकर्णी, वगैरे कितीतरी साहित्यिकांबाबत आहे.
तर मागच्या महिन्यात जयवंत दळवी यांचे मॅजेस्टिकने छापलेलं हे पुस्तक दिसलं अन लगेच विकत घेऊन वाचायला घेतलं. मी स्वतः पत्रकार असल्यानं दळवी यांच्या मुलाखती घेण्याच्या आणि लिहिण्याच्या तंत्रानं खूष झालो.
मुलाखतकारांची सर्व पुस्तके न वाचता दळवी यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. तसे केले तर या मुलाखती अधिक महत्त्वपूर्ण ठरल्या असत्या हे स्वतः दळवी यांनी आपल्या प्रस्तावनेत कबूल केलं आहे. मात्र `एका व्यक्तीच्या शक्तीबाहेरची ती गोष्ट आहे' असं ते म्हणतात ते खरंच आहे. मुलाखतकारांच्या वैयक्तिक आणि साहित्यिक विश्वांविषयी दळवी समोरच्या व्यक्तीला बोलतं करतात.
मुलाखतकार आपल्या साहित्यिक परिचयातील (म्हणजे त्यांच्या पुस्तकांतून) असतील तर या मुलाखती वाचायला मजा येते. यापैकी खांडेकर यांची `ययाती' आणि इतर पुस्तके मी शाळेतच असताना वाचलेली, दुर्गा भागवत या माझ्या एक आवडीच्या लेखिका, इतरांची पाठ्यपुस्तकांतून ओळख झालेली.
दळवी यांच्या या पुस्तकात खूपखूप नवी माहिती मिळाली. ना. सी. फडके हे एकेकाळचे खांडेकर, अनंत काणेकर, आचार्य अत्रे यांच्या तोडीचे सर्वाधिक लोकप्रिय साहित्यिक. मात्र फडके यांना साहित्य अकादमीचा किंवा इतर कुठलाही पुरस्कार कधी मिळालाच नाही.

गोव्यात कुठल्याशा मराठी किंवा कोकणी साहित्य संमेलनासाठी पणजीहून जात असताना आम्हा पत्रकारांसाठी असलेल्या मोटारीत माझ्यामागे `बाकीबाब' बा. भ. बोरकर बसलेले होते ही आठवण आजही ताजी आहे. या पुस्तकातील दहा साहित्यिकांपैकी दिवाकर कृष्ण हे `चिंगी महिन्याची झाली नाही तोच'' अशा नाट्यछटा लिहिणारे नाट्यछटाकार दिवाकर असावेत असं वाटून ते प्रकरण मी वाचायला घेतलं आणि नंतर सत्य कळल्यावर अधिक वाचणं बंद केलं.
अशीच गोष्ट या पुस्तकातल्या काही इतर प्रकरणांबाबत. आज प्रकाशझोतात असलेल्या किती साहित्यिकांची पुस्तके एकदोन दशकानंतर नव्या पिढींत वाचली जातील असा प्रश्न मग माझ्या मनात आला.
मराठीतील या नामवंत साहित्यिकांच्या मुलाखती वाचताना यापैकी किती जण नव्या पिढीतील मराठी वाचकांना आकर्षित करतील असा विचार मनाला चाटून गेला. दळवी यांच्या ''साहित्यिक गप्पा दहा साहित्यिकांशी'' या पुस्तकाची २०१३ सालची ही दुसरी आवृत्ती, याचा अर्थ मराठी वाचकांना हे पुस्तक आवडले आहे. त्यांच्या `निवडक ठणठणपाळ' या सदराच्या पुस्तकांच्याही नव्या आवृत्त्या बाजारात आलेल्या आहेत.
तर , कुठलेही का होईना पण `नोबेल' पारितोषक मिळवणारे आचार्य अत्रे हे मराठीतले पहिले आणि एकमेव साहित्यिक.
पुन्हा एकदा तसं लोकमत घेतलं तर आता असा सन्मान कुणाला मिळू शकेल बरं?
मी स्वतः शाळेत असतानाच अत्रे यांच्या 'कऱ्हेचे पाणी' या आत्मचरित्राचे खंड वाचले आहेत. एकेकाळी अनेक ग्रंथालयांत हे खंड हमखास असायचेच. नव्या पिढीतील वाचक हे खंड वाचू शकतील का?
अव्वल इंग्रजी काळातील मराठी साहित्यिकांची पुस्तके अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आता वाचली जातात का? उदाहरणार्थ, हरिभाऊ आपटे यांची ``पण लक्षात कोण घेतो ?' यांची कादंबरी.
माझं मराठीत किंवा इंग्रजीतसुद्धा फारसं वाचन नसतं, मात्र पत्रकारितेच्या व्यवसायाच्या निमित्ताने, काही खास आवडींनुसार थोडंफार वाचलं जातं. चरित्रे आणि आत्मचरित्रे या वाड्मयप्रकारची पुस्तकं मात्र मी आवडीनं वाचतो.
ऐतिहासिक मूल्य असलेल्या अशा मराठी चरित्रात्मक पुस्तकांना सुद्धा मागणी असते का? उदाहरणार्थ, न. चिं केळकर यांनी लिहिलेलं लोकमान्य टिळकांचं जाडजूड चरित्र.
शाळाकॉलेजांत क्रमिक पुस्तकांत समावेश नसतानासुद्धा जुन्या मराठी साहित्यिकांच्या `फिक्शन' सदरातल्या नव्या पुस्तकांच्या आवृत्त्या बाजारात येतात का, असाही एक प्रश्न आहे. उदाहरणार्थ, खांडेकरांची ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त `ययाती' कादंबरी आणि वि. वा. शिरवाडकर `कुसुमाग्रजां' चे विविध काव्यसंग्रह आणि नाटके .
अलीकडेच अनिल अवचट यांचे `हमीद' हे मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांचे छोटेखानी, नव्वद पानांचं चरित्र मी विकत घेतले. दलवाईंचे निधन झाल्यावर लगेचच हे पुस्तक अवचट यांनी लिहिलं होतं. साल होतं १९७७ आणि त्या आवृत्तीतलं निळकंठ प्रकाशनाचं हे पुस्तक आजही विक्रीला उपलब्ध आहे. विजय तेंडुलकरांची सहापानी प्रस्तावना असलेल्या या पुस्तकाची किमतीचं नवं स्टिकर लावूनसुद्धा किंमत आहे फक्त पन्नास रुपये.
याचा अर्थ पाच दशकांपूर्वी गाजलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे हे पुस्तक आजही ( कुठल्याही कारणानं का होईना) खपले नव्हते. लोकप्रिय मराठी साहित्यिकांची गाजलेली पुस्तकं किती वाचली जातात हे यावरून लक्षात येईल. मॅजेस्टिकने आता `हमीद'ची नवी आवृत्ती काढली आहे.
अलीकडेच आंतरराष्ट्रीय पारितोषक मिळाल्यानंतर एका हिंदी पुस्तकाच्या ३५,००० प्रति एका आठवड्यात खपल्या, यावरून हिंदी पुस्तकाच्या एका आवृत्तीत किती प्रति छापल्या जातात याची कल्पना करता येईल. असं भाग्य मराठी पुस्तकाला, लेखकाला साहित्य अकादमी, ज्ञानपीठ किंवा राज्य पुरस्कार मिळाल्यावर मिळतो का ? हो, पुरस्कार परत घेतल्यावर हे भाग्य मराठी पुस्तकालासुद्धा लाभते हे आपण नुकतेच अनुभवलं आहे.
एखादी व्यक्ती मराठी साहित्य संमेलनाच्या किंवा इतर कुठल्याही छोट्यामोठ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्यावर त्या साहित्यिकाच्या पुस्तकाला मागणी होते का, किंवा त्यांची पुस्तके पुस्तकाच्या दुकानात, प्रदर्शनात लगेचच दर्शनी भागांत येतात का?
आता सद्या मी नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेलं 'सावलीचा शोध' हे मौज प्रकाशनाचं पुस्तक वाचत आहे. मात्र माजी न्यायमूर्ती चपळगावकर यांची आताच्या वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष होण्याचा त्याच्याशी काहीही संबध नाही. माझ्या एका आवडीच्या किंवा स्पेशलायझेशन असलेल्या एका विषयाबाबत हे खूप माहितीपूर्ण पुस्तक असल्यानं मी ते वाचत आहे. नव्वदच्या दशकात औरंगाबाद येथे मी पत्रकारिता करताना तेथे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात ज्येष्ठ वकिल असलेल्या चपळगावकर यांच्याशी माझा जवळून संबंध आला होता. चपळगावकर यांची इतरही एकदोन पुस्तकंही माझ्या संग्रही आहेतच, तो भाग अलाहिदा.
मी स्वतः विविध विषयांवर आणि विविध वाड्मयप्रकारांवर पंचविसाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. मराठी पुस्तकांच्या खपाबाबत माझा स्वतःचा अनुभव फारसा खूष होण्यासारखा नाहीये . माझी इंग्रजी पुस्तके त्यामानानं अधिक दूरवर पोहोचलेली आहेत.
वर्धा इथल्या साहित्य नगरीत अनेक साहित्यिक आणि वाचक मंडळी जमणार आहेत. मराठी पुस्तकांच्या विक्रीची सर्वाधिक अधिक उलाढाल अशावेळी होते.
त्याबाबत रसभरीत वर्णनं वृत्तपत्रांत नंतर येतीलच. पाहू या, घोडा मैदान जवळच आहे.

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction