
. मराठी पुस्तकां चा खप - आचार्य अत्रे यांना १९६६ साली `नोबेल' पारितोषिक मिळाले. मराठी साहित्यिकाला नोबेल पारितोषक मिळेल, तेव्हा मिळेल, पण आता त्याबाबत जनमताची चुणूक जाणून घ्यावी म्हणून `ललित' मासिकाने वाचकांचा प्रतिसाद मागवला तेव्हा प्रल्हाद केशव अत्रे यांना प्रथम क्रमांकाची मते मिळाली. पु. ल. देशपांडे आणि वि. स. खांडेकर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. `ललित' मासिकाच्या वतीने जयवंत दळवी आणि इतरांनी हा बिनपैशाचा नोबेल पुरस्कार अत्रे यांना दिला तेव्हा अत्रे त्यांच्या स्वभावानुसार याबाबत जाम खुशीत होते. दळवी लिहितात कि ``उत्साहाच्या भरात अत्रे यांनी आम्हाला दहाबारा दिवस पुरतील, एव्हढे खाद्यपदार्थ मागवले होते'' ( विषय अत्रे यांच्या संदर्भात असल्याने ही बहुधा जयवंत दळवी यांची अतिशयोक्ती असावी असं मला वाटतं ) यावेळी अत्रे यांची दीर्घ मुलाखत घ्यावी असं जयवंत दळवी यांना वाटलं पण तसा योग दोनतीन वर्षे आला नाही. अन एक दिवस म्हणजे १२ जून १९६९ला प्रकाशक ग. पां. परचुरे यांचा दळवी यांना फोन आला : ``आता साहेबांची आशा नाही'' असं म्हणून फोनवरची व्यक्ती हमसाहमशी रडू...