महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणी
 देशात आणि राज्यात आज काहीही परिस्थिती असली तरी महाराष्ट्रात आजही महात्मा फुले, शा\'हू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रागतिक वारसा चालू आहे याचा प्रत्यय काल आला. महाराष्ट्रात वर्षांतून अनेक शहरांत काही ठराविक दिवशी प्रागतिक विचारसरणीच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते, त्यापैकी एक दिवस म्हणजे सहा डिसेंबर काल होता. कोरोना काळात मोठा खंड पडल्यानंतर काल पहिल्यांदाच पुन्हा एकदा या पुस्तक महोत्सवात गेलो आणि खूप बरं वाटलं.
महाराष्ट्र देशी वेळोवेळी होणाऱ्या विविध राज्यस्तरीय, प्रादेशिक आणि इतर साहित्य संमेलनात भरपूर पुस्तक विक्री होते. पण केवळ महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणीला वाहिलेल्या ग्रंथाची आणि पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते ती ठिकाणे आणि दिवस विशिष्ट आहेत.
हे दिवस म्हणजे एप्रिल बाबासाहेबांची १४ एप्रिलची जयंती, दसरा किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे आपल्या अनुयायांबरोबर नागपूरला दीक्षाभूमीवर झालेले धर्मांतर, आणि सहा डिसेंबरचे बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण.
राज्यात ठिकठिकाणी विविध राष्ट्रनायकांचे आणि महापुरुषांचे उत्सव साजरे होतात, पण इथं सांगितलेल्या या दिवशी पुस्तकविक्रीची जी उलाढाल होते तशी इतर कुठल्याही दिवशी होत नाही हे विशेष.
बाबासाहेबांनी आपल्या लोकांच्या हातांत पुस्तकं दिली, त्यांना वाचायला आणि विचार करायला शिकवलं, त्याचा हा परीणाम.
अहमदनगर जिल्ह्यात हरेगावला सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी, रविवारी मतमाऊलीची - मारियामातेची - यात्रा भरते, आसपासच्या परिसरातले आणि पूर्ण राज्यातून चारपाच लाखांच्या आसपास लोक येतात. मात्र तिथं `निरोप्या' मासिकाचा (वर्गणी भरण्यासाठी असलेला !) एक स्टॉल सोडला तर साहित्य आणि एकूण विचारांची देवाणघेवाण या संबंधीचे एकही व्यासपीठ नसते.
मला वाटतं अशीच स्थिती इतर अनेक उत्सव आणि यात्रांबाबत असू शकते.
`सुगावा' प्रकाशानानं माझ्या प्रकाशन केलेल्या पुस्तकांपैकी तीन पुस्तकं काही स्टॉलवर दिसली, बरं वाटलं.
`दलित ख्रिश्चनांचा आरक्षणाच्या हक्कासाठी लढा', गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज' आणि `डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद' ही तीन पुस्तकं.
इंडियन एक्सप्रेसला असताना म्हणजे १९९५च्या आसपास माझ्या `महाराष्ट्र चरित्रकोश- इ स. १८०० ते इ. स. २०००' या पुस्तकासाठी संदर्भ गोळा करताना मी नारायण पेठेतल्या जेसुईट फादरांच्या 'स्नेहसदन'च्या वाचनालयात बसत असे. त्यावेळचे या वाचनालयाचे ग्रंथपाल असलेल्या जयंत गायकवाड यानं मला तिथून जवळच असलेल्या चित्रशाळा इमारतीतल्या वाघ सरांच्या सुगावा प्रकाशाची आणि दलित चळवळीची वाट दाखवली होती.
उषाताई आणि विलास वाघ सरांनीं त्यानंतर मी त्यांना दिलेली माझी एकूणएक पुस्तके प्रसिद्ध केली !
जयंतमुळं दरवर्षी १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरला या पुस्तक मेळ्यांत फेरफटका मारण्याची मला सवय लागली. कोरोनाच्या साथीत जयंत गेला, आणि वर्षभरात विलास वाघ सर यांचं पण निधन झालं.
उषाताई आणि वाघ सरांच्या तीन दशकं चाललेल्या सुगावा प्रकाशनाचं अगदी शेवटचं पुस्तक म्हणजे माझं स्वतःचं `डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर)' . त्यानंतर सुगावा प्रकाशनाची मालकी बदलली.
हा, तर महाराष्ट्रातील प्रागतिक विचारसरणीच्या परंपरेविषयी मी बोलत होतो, ते कालच्या विविध बुक स्टॉलमध्ये असलेल्या पुस्तकांच्या आणि ग्रंथांमुळे. या स्टॉलमध्ये अर्थातच बाबासाहेब आंबेडकरांवर आणि त्यांची अनेक पुस्तके, ग्रंथ होती. त्याशिवाय वर्षातल्या या तीन दिवशी भरणाऱ्या मेळ्यांत नेहेमीच दिसणारी इतर वैचारिक विषयांची पुस्तके होती. प्रागतिक विचारसरणींची आणि उजव्या विचारांची चिरफाड करणारी पुस्तकं होती.
नेहेमीच्या साहित्य संमेलनांत आणि मेळ्यांत आढळणारी आणि लोकप्रिय सदरात मोडणारी पुस्तकं मात्र इथं कधीही दिसत नाही हे आणखी एक विशेष.
फुटपाथवर असलेल्या अशा पुस्तकांच्या दुकानात अनेकदा काही दुर्मिळ आणि महत्त्वाची पुस्तकं मिळतात.
दुसरं एक विशेष म्हणजे कुठल्याही प्रतिष्ठित पुस्तक प्रकाशनाचा या पुस्तक प्रदर्शनांत एकही स्टॉल नसतो, रस्त्यावर, फुटपाथवर बसून किंवा बाकं लावून पुस्तकं विकणारी ही मंडळी साधी, गरीब पुस्तक विक्रेते असतात, काही जण सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक असतात. त्यांच्याशी कुणी पुस्तकांच्या किंमतींविषयी घासाघिस करताना दिसलं कि वाईट वाटतं.
मला एक छोटंसं, जीर्ण अवस्थेतलं पुस्तक दिसलं. `दलित चळवळीची वाटचाल' केशव गोरे स्मारक ट्रस्टनं रावसाहेब कसबे यांचं १९८३ साली प्रसिद्ध केलेलं पुस्तक. किंमत विचारली तर सांगितलं गेलं `तीन रुपये'.
पन्नास रुपयाची नोट दिली आणि त्या विक्रेतीला म्हटलं, ''त्यातून दहा रुपये घ्या' !'
या पुस्तक मेळ्यांत भारतीय संविधानाची प्रत, जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरची विविध पुस्तकं, अण्णा भाऊ साठे, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, रावसाहेब कसबे, शंकरराव खरात, सुखदेव थोरात, य. दि. फडके, दया पवार, हमीद दलवाई, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, कांशीराम, प्रकाश आंबेडकर, वगैरेंची पुस्तकं होती.
रावसाहेब कसबे यांचं अगदी सुरुवातीचं एक पुस्तक असलेले `झोत' ची हजेरी या पुस्तक मेळ्यांत हमखास असतेच. त्याशिवाय गोविंद पानसरे यांचं 'शिवाजी कोण होता?' हे असंच एक दुसरं पुस्तक.
एक जाणवलं, अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेली, नव्या लोकांनी लिहिलेली पुस्तकं या स्टॉलमध्ये दिसत नाही, तेचतेच चेहरेमोहरे आणि तीचतीच पुस्तकं. पन्नाशी पार केलेल्या दलित पँथरवर आताच प्रसिद्ध झालेली पुस्तकं पण दिसली नाहीत. नव्या पिढीतल्या दमदार लोकांची इथं हजेरी दिसली नाही.
या पुस्तक मेळ्यांना नेहेमी चांगला प्रतिसाद मिळत जावो हिच सदिच्छा !

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

A day at Mother Teresa’s Home for Destitutes