ग. दि. माडगूळकर
 
गेली अनेक वर्षे पुणे मुंबई महामार्ग माझ्या रोजच्या वहिवाटीचा रस्ता राहिलेला आहे. वाकडेवाडी येथे सिटी बस स्टॉपवर उतरले की मग रस्ता ओलांडून आधी फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या `टाइम्स ऑफ इंडिया' आणि त्यानंतर `साखर संकुल'पाशी असलेल्या `सकाळ टाइम्स' या माझ्या कार्यालयाची वाट धरायची हा माझा नेहमीचा शिरस्ता. रस्ता ओलांडला की माझी नजर आपसूक तिथल्या बैठ्या प्रशस्त कौलारु घराकडे जायची, आजही जाते. मी कितीही घाईत असलो, अगदी घड्याळाच्या काट्याशी शर्यत चालू असली तरी एक नजर त्या वास्तूकडे जातेच.
सावकाश चालत असलो तर मग त्या बंगलीच्या आजूबाजूच्या जागांकडे नीट पहिले जाते, बंद दारे आणि खिडक्या, कौलांवर साचलेली झाडांची सुकलेली पाने, पार्किंगमधली वाहने याकडे नीट लक्ष जाते. यापैकी कधीही न चुकता पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे वास्तूचा `पंचवटी' हा नामफलक आणि तिथे अगदी प्रथमदर्शनी असणारा तो छोटासा नीलफलक आणि त्यावरची ती अक्षरे.
 
'' पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती - `गीतरामायण'कार ग. दि. माडगूळकर (१९१९-१९७७) येथे राहत होते (१९५३-१९७७). ''
 
खूप वर्षांपूर्वी एकदा येथून जाताना पहिल्यांदाच या वास्तूच्या `पंचवटी' या नामफलकाकडे आणि बाजूलाच असलेल्या एका निलफलकाकडे माझे लक्ष गेले होते तेव्हा मी जागच्याजागी खिळून गेलो होतो, ती वास्तू माझ्या नजरेत भरुन घेत होतो. `गीतरामायण' काव्य लिहिणाऱ्या आणि `इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची’ अशी अनेक अजरामर गीते रचणाऱ्या गदिमांचे त्या निलफलकावर लिहिलेले जन्मवर्ष आणि निधनवर्ष यांचं गणित मांडून त्यांना किती आयुष्य लाभले आणि या वास्तूत ते किती वर्षे राहिले हे मनातल्या मनात मी मोजले होते हे मला आजही स्पष्ट आठवते. 
 
तेव्हापासून गेली अनेक वर्षे आजतागायत गदिमांची वास्तू आणि तो निलफलक याबद्दलचे माझे अप्रूप तसूभरही कमी झालेले नाही. त्या बंगलीशेजारच्या वाकडेवाडी भुयारीमार्गाला `ग. दि, माडगुळकर भुयारीमार्ग' असे नाव देण्यात आले आहे. 
 
त्यानंतर गदिमा यांनी तेव्हा पुणे शहरापासून तेव्हा खूप लांबवर असलेल्या या जागेवर आपले घर कसे बांधले याविषयीचे लेख वाचण्यात आले, `गदिमां’चे धाकटे बंधू व्यंकटेश माडगुळकर यांनीसुद्धा तेव्हा पुण्यापासून खूप लांब असलेल्या जंगलात म्हणजे एरंडवणे येथे स्वतःचे घर बांधले, त्या ठिकाणीसुद्धा असा काही निलफलक आहे कि नाही याची मला कल्पना नाही. `लेखकाचे घर' या आपल्या लेखात व्यंकटेश माडगूळकरांनी `गदिमां’च्या या घराविषयीसुद्धा लिहिले आहे. 
 
मागच्या आठवड्यात पुण्यात ओंकारेश्वर रस्त्यावरुन शनिवारवाड्याकडे `सकाळ'कडे येताना एका इमारतीजवळ असाच एक निलफलक दिसला. `महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (१८९०-१९७९) येथे राहत होते १९१४-१९४३.'' तो फलक वाचला अन गाढे संशोधक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे माजी मानद कुलगुरु असलेल्या ऋषीतुल्य पोतदारांविषयी वाचलेल्या अनेक स्मृती जागृत झाल्या आणि तिथल्या भर गर्दीत आदराने नकळत मी नतमस्तक झालो. 
 
नाशिकला मी आलो म्हणजे या शहरात वास्तव्य केलेल्या अनेक थोर लोकांची आठवण होते. `स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, नाशिक कलेक्टर जॅक्सनचा खून करणारा अनंत कान्हेरे, भारतीय चित्रपटसृष्टीचा पाय रचणारे धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके, आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर अशा कितीतरी लोकांच्या स्मृती हे शहर जागृत करते. 
 
काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्र चरित्रकोश' (इ.स. १८०० ते इ.स. २०००) या कोशाचे मी संकलन केले तेव्हा गेल्या दोनशे वर्षांच्या काळातल्या अनेक महनीय व्यक्तींची चरित्रे मी अभ्यासली, त्या निमित्ताने या उत्तुंग व्यक्तींच्या जीवनाशी संबंधित असलेल्या शहरांची , गावांची ओळख झाली, जसे साने गुरुजींचे नाव काढले कि जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर आठवते, कोल्हापूर म्हटले कि शाहू महाराज, राणी ताराबाई, भालजी पेंढारकर, बाबुराव पेंटर अशा व्यक्ती आठवतात. अमरावती म्हटले कि पंजाबराव देशमुख आठवतात तर कर्नाटकातले धारवाड शहर जी. ए. कुलकर्णी यांची आठवण करून देते. 
 
अनेक शहरे आणि देश काही विशिष्ट बाबींसाठी प्रसिद्ध असतात, जसे काही पॅरीस तिथल्या एफेल टॉवरसाठी, आग्रा शहर ताजमहालसाठी तर ब्राझिल देश तिथल्या महाकाय आकाराच्या ख्राईस्ट दि रिडिमर (तारक ख्रिस्त ) पुतळ्यासाठी. 
 
मला मात्र शहरे आणि देश अशा निर्जिव वस्तूंप्रमाणेच सजीव म्हणजे तिथल्या लोकांसाठीही ओळखला जावा असे वाटते. आळंदी म्हटले कि ज्ञानदेव आणि देहू म्हटले कि तुकोबा आठवतात तसे. आग्रा म्हटले कि ताजमहालचा निर्माता शाहजहान आठवावा, ग्रीस म्हटले कि सॉक्रेटीस, प्लॅटो, अरिस्टॉटल किंवा अलेक्झांडर आठवायला हवेत. स्ट्रॅटफोर्ड म्हटले कि विल्यम शेक्सपियर आठवतो तसेच. 
 
काही वर्षांपूर्वी कुटुंबियांसह युरोपच्या सहलीवर असताना रोम येथे गेलो तेव्हा या प्राचीन शहरातला सांस्कृतिक वारसा पाहताना मला मायकल अँजेलो आणि लियोनार्दो द व्हिन्सी आठवले आणि व्हेनिसला गेलो तेव्हा शाळेत शिकलेल्या `द मर्चंट ऑफ व्हेनिस' या शेक्सपियरच्या साहित्यकृतीची हमखास आठवण आली. 
 
ऐंशीच्या दशकात बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम संपवून त्याकाळच्या सोव्हिएट रशियातल्या मॉस्कोहून भारतात परतत होतो आणि आमचे विमान ताश्कन्दला काही तास थांबले. विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी नव्हती तरी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आठवण करुन देणाऱ्या या शहराला मी माझ्या नजरेत साठवून घेतले. म्यानमारमधील मंडाले शहर अशीच लोकमान्य टिळकांची आठवण करुन देते 
 
खूप वर्षांपूर्वी पहिल्यांदाच दिल्लीला रेल्वेने जात होतो, वाटेत झाँसी शहर लागले तेव्हा झाँसीची राणी लक्ष्मीबाई आठवणार हे साहजिकच होते. तीच गोष्ट बडोद्याची, बडोदा म्हटले कि कुठल्याही मराठी माणसाला सयाजीराव गायकवाड महाराज आठवायलाच हवे. 
 
ऐतिहासिक कामगिरी असणाऱ्या या सर्वच लोकांच्या गावी त्यांचे स्मारक किंवा निलफलक असतील असे वाटत नाही. मात्र या लोकांचे चरित्र आणि काम माहित असणाऱ्या लोकांच्या मनांत या व्यक्ती आणि त्यांची कर्मभूमी किंवा घर यांचे समीकरण जुळलेले असतेच. त्यासाठी या शहरांना किंवा गावांना भेट दिलीच पाहिजे असे नसते.
पुण्यात प्रभात रस्ता परिसरात एकेकाळी कलावंतांची मांदियाळी रहात होती. हिराबाई बडोदेकर, व्ही. शांताराम, पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, शिलेदार कुटुंब ही काही नावे. गदिमा आधी भांडारकर रस्त्यावर रहात होते.
 
पुण्यातील कलावंतांच्या घरांची नावेही त्यांच्या कलेला अनुसरून होती. हिराबाई बडोदेकर यांचे स्वर विलास, पंडित भीमसेन जोशी यांचे कलाश्री, छोटा गंधर्व यांचे स्वरराज, सी रामचंद्र---सरगम, पंडित जितेंद्र अभिषेकी--मांगिरिष, व्यंकटेश माडगूळकर---अक्षर अशी . 
 
पुण्यात डेक्कन जिमखान्यावर एका गल्लीत संगीतकार रामचंद्र चितळकर (सी. रमचन्द्र) यांचा मोठा बंगला आहे. या रस्त्याला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूच्या गल्लीत ज्योत्स्ना भोळे यांचे घर. 
 
सत्तरच्या दशकात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा शहरात गेलो होतो तेव्हा तिथल्या बस स्टॅण्डसमोरच शिवाजी सावंत येथे राहत होते असे मला सांगण्यात आले होते. आजरा येथे बसस्टॉप वर पोहोचलो की आजही मी `मृत्युंजय’ `छावा' , `युगंधर' कादंबऱ्या लिहिणाऱ्या या लेखकाचे घर शोधत असतो..
 
मुंबई-पुण्यासारख्या काही ऐतिहासिक शहरांत ठिकठिकाणी महनीय व्यक्तींच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत. पुण्यातला सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे वास्तव्य असलेला `फुले वाडा', `चले जाव' आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांना तुरुंगात ठेवले गेले तो अहमदनगरचा भुईकोट किल्ला अशी अनेकांच्या पाऊलखुणा जपणारी कितीतरी शहरे आणि स्थळे आहेत. 
 
अहमदनगर येथे अभिनेते शाहु मोडक, मामासाहेब तोरडमल, सदाशिव अमरापूरकर, अच्युतराव पटवर्धन यांचे निवासस्थान होते. रेव्ह. नारायण वामन टिळक यांची येथे समाधी आहे. 
 
पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर `वैशाली हॉटेल'च्या आणि `टाइम्स ऑफ इंडिया' कार्यालयाच्या मधल्या बोळात रँग्लर परांजपे यांचा म्हणजेच र. धो. कर्वे यांच्या कुटुंब नियोजनाच्या आणि लैगिक शिक्षण चळवळीत योगदान करणाऱ्या शकुंतला परांजपे, सई परांजपे यांचा एकमजली बंगला आहे. नव्वदच्या दशकात शकुंतलाबाईंशी माझे चांगले संबंध होते. या ठिकाणी आलो कि मी मुद्दाम थोडी वाकडी वाट करुन या 'पुरुषोत्तम' बंगल्याकडे वळतोच.
गोवा तर असे अनेक निलफलक उभारता येतील असा विविध क्षेत्रांतील असंख्य लोकांची खाण आहे. बाकीबाब बा. भ. बोरकर, जितेंद्र अभिषेकी, अँबे डी फरीया, मिनिझेस ब्रागांझा, टी बी कुन्हा, मारिओ मिरांडा, सुरश्री केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर अशा नावांची एक भलीमोठी यादीच आहे.
 
एकदा गोव्याहून कारने रत्नागिरीमार्गे पुण्याला परतत होतो, वाटेत शिरोडा गाव लागले आणि वि. स. खांडेकर येथे काही काळ शिक्षक होते याची आठवण झाली. महाड लागले तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आणि तिथल्या चवदार तळे आंदोलनाची आठवण तर होणारच होती. 
 
आमच्या जवळच्या एका कुटुंबाच्या लग्नासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगावला गेलो होतो. वाटेत माहुली हे गाव लागले. तीर्थक्षेत्र माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा संगम होते. बसमधून संगमाचे ते दृश्य पाहताना मला आठवण झाली माहुलीच्या प्रसिद्ध सुपुत्राची. लहानग्या नारायण पेशवा यांच्या हत्येला जबाबदार ठरवून खुद्द राघोबा दादांना मृत्यदंडाची शिक्षा फर्मावणाऱ्या न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे हे जन्मस्थान. 
 
ब्रिटीश सरकारला `चले जाव' असा आदेश दिल्यावर लगेचच मुंबईत महात्मा गांधींना अटक झाली आणि येरवडा जेलमध्ये नेण्यासाठी रेल्वेने त्यांना पुण्यात आणण्यात आले. मात्र पुणे रेल्वे स्टेशनवर त्यांच्या स्वागतासाठी लोक जमा होतील या भीतीने त्यांना चिंचवड स्टेशनवर उतरुन नंतर मोटारीने पुण्याला नेण्यात आले. चिंचवडला श्री श्री घारे (पिंपरी चिंचवड महापालिकेचे पहिले (नेमलेले) महापौर) आणि इतरांना याची कुणकुण लागताच `जय हिंद' च्या नाऱ्यांत त्यांनी बापूंचे स्वागत केले. या घटनेचे स्मरण देणारा एक फलक गेली अनेक वर्षे चिंचवड स्टेशनवर होता.
राजापूर म्हटलं की काहींना तिथली अवचित अवतरणारी गंगा आठवते तर अनेकांना बॅरिस्टर नाथ पै आणि मधू दंडवते आठवतील. 
 
अमेरिकेतील काळ्या लोकांच्या नागरी हक्कांसाठी अहिंसात्मक लढा देणारे आणि त्यामुळे `अमेरिकेचे महात्मा गांधी' अशी सार्थ उपाधी मिळालेले मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर ) यांना तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुंनी १९५९ साली भारतभेटीवर बोलावले. त्या दौऱ्यात गांधीजींच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या साबरमती, सेवाग्राम अशा विविध स्थळांवर बापूजींच्या पाऊलखुणांचा शोध घेत किंग (ज्युनियर) हिंडले होते. 
 
प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्याशी निगडित असलेल्या स्थळांपाशी निलफलक लावण्याची प्रथा तशी मूळची पाश्चिमात्य, मात्र आपल्याकडेही अनेक शहरांत ती रूढ होते आहे हे स्वागतार्ह आहे. 
 
विविध क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान करणारे अनेक लोक असतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून असे निलफलक किंवा स्मारक उभारले गेले पाहिजेत. निलफलक असले म्हणजे नव्या पिढीला अशा महनीय लोंकांचे स्मरण होईल. त्याशिवाय या लोकांविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा वाढेल. 
 
हल्ली शहराशहरांत आणि गल्लीबोळांत नगरपालिका आणि इतर संस्थांमार्फत माननीय लोकप्रतिनिधींचे निवासस्थान आणि कार्यालय दर्शवणारे फलक उभारले जातात. सत्तांत्तर होत राहते तसे अशा फलकांची जागा सातत्याने बदलत असते. 
 
काही थोर व्यक्तींच्या कार्यांमुळे लोकांच्या मनांत त्यांच्याविषयीचे निलफलक कायम असतात, अशा `निलफलकांना' मात्र काळाचे आणि भौगोलिक सिमांचे बंधन नसतात. 
 
आर्चबिशप हेन्री डोरींग हे पुण्याचे बिशप, पहिल्या महायुद्धाच्या काळात ते जपानमधल्या हिरोशिमा येथे अपॉस्टेलिक व्हिकर होते. पुण्यातल्या सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलमध्ये अगदी वेदीपाशी त्यांची कंबर आहे, त्यावरच्या शिलालेखात त्यांचा जीवनपट कोरलेला आहे. मूळ जर्मनीचे असलेल्या या जेसुईट धर्मगुरुने अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीपाशी वळण या खेड्यात 'निरोप्या' हे मराठी मासिक १९०३ साली सुरु केले. मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेल्या या मासिकाने आता १२० वर्षाच्या पदार्पण केले आहे आणि या मासिकाच्या दुसऱ्या पानावर ठळकपणे लिहिलेले असते. `निरोप्या' संस्थापक बिशप हेन्री डोरींग. पहा, एखाद्या व्यक्तीच्या कार्याच्या सन्मानार्थक निलफलक अशाही स्वरूपात असू शकतो. 
 
अनेकदा आपण राहत असलेल्या शहरांत आणि परिसरांत अशा काही थोर व्यक्ती होऊन गेल्या याची आपल्याला जाणिवही नसते, अशा निलफलकांमुळे किंवा स्मारकांमुळे हे कळते. काही ठिकाणी तर जिवंत असतानाच `दंतकथा' बनलेल्या व्यक्तींचे पुतळे किंवा स्मारक उभारले जातात ! 
 
आपल्या आजूबाजूला निलफलक असलेल्या आणि नसलेल्यासुद्धा स्थळी एकदा तरी जाऊन विविध क्षेत्रांतील त्या महनीय व्यक्तींच्या पाऊलखुणा न्याहाळण्याची एक सुप्त इच्छा आहे. मी कधीही कुठेही जात असलो कि अशा थोर आणि नामवंत लोकांच्या पाऊलखुणांचा शोध सतत घेत राहतो. त्या पाऊलखुणा आपापल्या क्षेत्रांत सतत कार्यरत राहण्यासाठी मनाला कायम उभारी देत असतात.
 
 

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction