झेल चुकवला गेला अन खूप मोठ्ठी बातमी हातातून सट्कन निसटली तेव्हा...
 
अगदी पालिकेच्या वा महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारुढ पक्षातर्फे एखाद्या वॉर्डात कुणाला बी फॉर्म मिळेल याविषयी अखेरच्या क्षणापर्यंत निर्णय जाहीर केला जात नसतो, विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी आणि बंडखोरी टाळावी यासाठी कमालीचे गुपित पाळले जाते. त्यामुळे तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सत्तारुढ पक्षातर्फे कुणाला उमेदवारी मिळेल याबाबत जाहीर वाच्यता होत नसेल किंवा आतल्या गोटातही निर्णय होत नसेल याबाबत आश्चर्य वाटायला नको.
आता राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विजयाची शक्यता नसली तरी विरोधी पक्षांतर्फे याबाबत काही पावले उचलली जात आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात पहिली दोन दशके राष्ट्रपतींची निवडणूक एकतर्फीच झाली. पहिली अटीतटीची निवडणूक झाली ती १९६९ साली आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाचा - सिंडिकेट गटाच्या कामराज, मोरारजी देसाई वगैरेंचा अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव होऊन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाठिंबा दिलेला उमेदवार डॉ वराहगिरी वेंकट (व्ही व्ही.) गिरी निवडून आले.
राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन झाले आणि मग उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा (बी. डी.) जत्ती हे हंगामी राष्ट्रपती बनले. त्यांच्या काळात आणीबाणी नंतरच्या निवडणूकीत सत्तांतर घडून पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जागी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार आले. सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोरारजी देसाईंनी राष्ट्रपती निवडणुकीतील आधीच्या पराभवाचा वचपा काढला आणि त्यावेळी नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपती बनले. पोएटिक जस्टिस असे या घटनेचे वर्णन केले जाते.
पंतप्रधान पंडित नेहरुंच्या, इंदिरा गांधींच्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मुस्लीम व्यक्तीला हे सर्वोच्च घटनात्मक पद दिले गेले. आतापर्यंत एम हिदायतुल्ला यांच्यासह चार मुस्लिम आणि एक शीख व्यक्तीने राष्ट्रपतीपद भूषवले आहे.
आजच्या घडीला मुस्लीम असल्यामुळेच कदाचित एखाद्या नावावर नकारात्मक फुली मारली जाऊ शकते किंवा सत्तारुढ भाजपनेच धक्कातंत्र वापरुन एखादे मुस्लीम नाव पुढे केल्यास विरोधकांना त्या व्यक्तीला चुपचाप पाठिंबा देणे भाग पडू शकते.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले तरी राष्ट्रपती निवडण्यासाठी `एनडीए' कडे बहुमत नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी सहमतीचा उमेदवार आवश्यक होते. त्यावेळी सत्तारुढ आघाडीतर्फे अचानक डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव आले आणि या नावाला बहुतेकांनी लगेच पाठिंबा दिला.
सत्तारुढ पक्षाकडे आपला उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नसल्याने मग सर्वांना मान्य करावेच लागेल असे नाव अचानक पुढे करुन एकतर्फी निवडणूक करण्याची प्रथाच झाली.
पहिले दलित राष्ट्रपती म्हणून अनुभवी प्रशासक डॉ. के. आर. नारायणन यांचे नाव आणि नंतर पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यावेळच्या राजस्थानच्या राज्यपाल प्रतिभा पाटील यांचे नाव असेच अखेरच्या क्षणी पुढे सरकवण्यात आले आणि या नावांना विरोध करणे अवधड होऊन या उमेदवारांचा विजय अगदी सहज झाला.
एनडीए' आघाडीतील शिवसेना एक पक्ष असतानासुद्धा मराठी उमेदवार प्रतिभा पाटील यांच्याबाबत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भुमिकेमुळे काँग्रेसच्या या उमेदवाराची निवड सहज झाली हे लक्षात घेतले पाहिजे.
उपराष्ट्रपतिपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल असलेल्या डॉ शंकर दयाळ शर्मा यांची म्हणून निवड झाली, नंतर ते राष्ट्रपतीही बनले. मग राज्यपाल पद हे राष्ट्रपतीपदासाठी एक पात्रता बनली. सध्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद हेसुद्धा निवडीआधी राज्यपालच होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि देशातील सर्वाधिक अनुभवी प्रशासक असलेले डॉ. पी. सी. अलेक्झांडर ही ख्रिस्ती व्यक्तीसुद्धा राष्ट्रपती होण्याची शक्यता एकेकाळी निर्माण झाली होती, अखेरीस ते केवळ राज्यसभा सदस्य बनले.
डॉ राजेंद्र प्रसाद या पहिल्या राष्ट्रपतींना दुसरी टर्म देण्यात आली होती. कोविंद यांच्याबाबतही असे घडू शकते.
अनेकदा उपराष्ट्रपतींनाच राष्ट्रपती पद देण्यात आले आहे. त्यामुळे सद्याचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे राष्ट्रपतीपदासाठी सर्वाधिक उत्सुक आणि सर्वाधिक पात्र असू शकतात.
सत्तारुढ पक्षाकडे पूर्ण बहुमत असतानासुद्धा राष्ट्रपतीपदासाठी रणनिती खेळली जात असे. त्याबाबत जुन्या काळात घडलेला हा किस्सा
``म्हणजे तुम्ही याबाबत निर्णय घेतला आहे तर ?''
काँग्रेस पक्षाच्या हाय कमांडचे म्हणजे पक्ष श्रेष्ठीचे दूत दिल्लीहून पणजीला आले होते त्यावेळची ही घटना आहे. गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीजांच्या ताब्यातून १९६१ साली मुक्त केल्यानंतर १९ वर्षांनी पहिल्यांदाच या चिमुकल्या प्रदेशात काँग्रेसच्या रुपाने एका राष्ट्रीय पक्षाची सत्ता आली होती.
याआधी येथे केवळ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या स्थानिक पक्षाची सत्ता होती आणि त्यामुळे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी शशिकलाताई काकोडकर यांचा त्यांच्या सत्तारूढ पक्षात निरंकुश प्रभाव होता.
वरील घटना घडली १९८७ साली. त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी होते. राष्ट्रपतीपदावर ग्यानी झैलसिंग होते. आणि त्यांची या पदावरची मुदत संपायला आली होती.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शरीर रक्षकांनी ३१ ऑकटोबरला सकाळी हत्या केल्यानंतर काही तासांतच राजीव गांधी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी उरकून घेण्यात राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
हा शपथविधी संध्याकाळी पार पडेपर्यंत इंदिरा गांधी यांचे निधन झाले आहे असे सरकारतर्फे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नव्हते.
मात्र काही महिन्यांतच राष्ट्रपती झैल सिंग आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्यातील संबंध ताणले गेले होते. इतकेच काय राष्ट्रपती झैल सिग हे राजीव गांधी यांना पंतप्रधानपदावरुन दूर करतील काय अशीही चर्चा त्याकाळात प्रसारमाध्यमांतून होत होती.
ज्या काळातली घटना मी सांगतो आहे त्याकाळात म्हणजे १९८०च्या दशकात जी. के. मूपनार, रवी वायल्यार आणि आर. एल. भाटीया हे काँग्रेस नेते गोव्याचे कारभारी होते.
राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे असं ताणलेले संबंध असताना काँग्रेस पक्षश्रेठींचे निरीक्षक आर. एल. भाटिया गोव्यात पणजीला पक्षाच्या आमदारांना आणि इतरांना भेटण्यासाठी आले होते .
गोव्यातील काँग्रेस पक्षातील असंतृष्ट गटाच्या नेत्यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी बोलण्यासाठी आम्हां पत्रकारांनी पणजीतल्या सर्किट हाऊसवर ठाण मांडले होते. नेहेमीच्या प्रश्नोत्तरे झाल्यानंतर अचानक पत्रकार परिषदेने एक वेगळेच वळण घेतले होते आणि त्यानंतर सुरुवातीचा वरील प्रश्न विचारला गेलं होता.
``म्हणजे तुम्ही याबाबत निर्णय घेतला आहे तर ?''
त्याचे असे झाले कि अनेक प्रश्नांच्या दरम्यान आगामी राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सत्तारुढ काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रपतीपदासाठी कोणता उमेदवार असणार आहे असे एका पत्रकाराने विचारले होते.
पंतप्रधान राजीव गांधी आणि राष्ट्रपती झैल सिंग यांच्यातील तणावाच्या संबंधांचा यामागे संदर्भ होताच.
तो प्रश्न विचारला जाताच आर एल भाटिया लगेचच उत्तरले होते:
``म्हणजे काय? उपराष्ट्रपती आर. वेंकटरामण आहेत कि त्या पदासाठी उमेदवार!''
झाले! भाटिया यांचे ते उत्तर म्हणजे एक मोठा बॉम्बच होता.
देशात लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमत असलेल्या आणि देशातील अनेक राज्यांत सत्ता असलेल्या काँग्रेस पक्ष ठरवेल तो उमेदवार राष्ट्रपती होऊ शकत होता.
तर या पक्षाने राष्ट्रपती झैल सिंग यांना दुसरी मुदत नाकारत उपराष्ट्रपती आर. वेंकटरामण यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवडले आहे ही राष्ट्रीय पातळीवरची मोठी बातमी होती.
चोवीस तास बातम्या देणाऱ्या न्यूज चॅनेल्स त्यावेळी नव्हते आणि त्यामुळे ब्रेकिंग न्यूज हा शब्दही रुढ झालेला नव्हता.
आम्ही सर्व बातमीदार भाटिया यांनी टाकलेल्या त्या बातमीच्या बॉम्बस्फोटातून स्वतःला सावरत होतो अन त्याचवेळी एका बातमीदाराने विचारलेल्या गेलेल्या त्या प्रश्नाने या सर्व वातावरणावर अक्षरशः पाणी किंवा बोळा फिरवला गेला होता.
``म्हणजे तुम्ही याबाबत निर्णय घेतला आहे तर ?''
तो प्रश्न ऐकताच भाटिया एकदम भानावर आले.
अनावधाने आपण काय बोलून बसलो याचे एका क्षणातच त्यांना भान आले. बंदुकीतून गोळी तर सुटली होती. पण पक्ष निरिक्षक वा कारभारी उगाचच नेमलेले जात नसतात.
पक्ष निरीक्षक ही जमात खूपच बनलेली, निर्ढावलेली असते हे त्यादिवशी मला पुरते समजले.
कमालीचे प्रसंगावधान राखत त्या अनुभवी पक्षनेत्याने लगेच स्वतःला सावरून घेतले.
``छे, छे, याबाबतीत काहीच निर्णय झालेला नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला अजून भरपूर वेळ आहे. पक्षाची कार्यकारिणी याबाबतीत काय तो निर्णय घेईल, त्यासाठी अजून भरपूर वेळ आहे, '' असे भाटिया यांनी म्हटले आणि लगेचच ती पत्रकार परीषद गुंडाळली गेली.
सर्किट हाऊसमधून बाहेर पडताना सर्व पत्रकार भाटियांना वेंकटरामण यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत खातरजमा करणारा तो प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराकडे 'खाऊ कि गिळू' या नजरेने पाहत होते.
एकदोन पत्रकारांनी तर त्या पत्रकाराला घेरुन कोकणीत शेलक्या शिव्याही घातल्या होत्या.
काहींना आपल्या विधानांस सावरुन घेण्याची, त्यातून मार्ग काढण्याची शक्कल जमते. राष्ट्रीय राजकारणात मुरलेल्या आर. एल, भाटिया यांना ते जमले आणि आम्ही पत्रकार मंडळी मात्र हात चोळत बसलो, त्या एक पत्रकाराला दूषणे देत बसलो होतो.
राष्ट्रपातळीवर सर्वच वृत्तपत्रांत पहिल्या पानांवर अग्रक्रमाने छापली जाऊ शकणारी एक मोठी बातमी पत्रकाराच्या त्या चोबऱ्या प्रश्नामुळे आमच्या हातात येऊन पटकन सटकली होती.
मात्र भाटिया यांनी काहीही स्पष्टीकरण दिले असले तरी अंदरकी बात काय आहे हे आम्हा सर्व पत्रकारांना समजले होते.
वेंकटरामण यांची राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी निश्चित होती. पण भाटियांच्या ठाम नकारामुळे आम्हाला ती बातमी म्हणून देता येणे शक्य नव्हते.
भाटियांच्या त्या विस्तृत नकारात्मक खुलाशामुळॆ त्या बातमीतला दमच नाहिसा झाला होता. राष्ट्रपतीच्या उमेदवारीबाबत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत काहीही निर्णय घेतलेला नाही अशी बातमी करण्यात काही अर्थ नव्हता, कुठल्याच राष्ट्रीय पातळीच्या दैनिकांत ती बातमी आतल्या पानावरसुद्धा घेण्याच्या लायकीची नव्हती.
त्यानंतर काही आठवड्यानंतर यथावकाश काँग्रेस पक्षातर्फे उपराष्ट्रपती रामस्वामी वेंकटरामण हे राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असतील असे दिल्ल्लीतून जाहीर करण्यात आले.
काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असल्याने वेंकटरामण यांची सहजरित्या या मानाच्या पदावर निवड झाली. बरोबर ३५ वर्षांपूर्वी म्हणजे २५ जुलै १९८७ रोजी त्यांनी राष्ट्रपती म्हणून सूत्रे हाती घेतली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या काळात गोव्यातील त्या पत्रकार परिषदेतील भाटिया यांचे ते उपराष्ट्रपती वेंकटरामण यांच्याबद्दलचे निसटते विधान सतत आठवत राहिले. 

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

A day at Mother Teresa’s Home for Destitutes