जातीव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत, केवळ हिंदू धर्माचीच ती मक्तेदारी नाही… हे खरं नाही!

पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे

  • चरणजित सिंग छन्नी, बुटासिंग, बाबा पद्मनजी, रॉबर्ट डी नोबिली, पंडिता रमाबाई, ना. वा. टिळक, अमरिंदर सिंग आणि फादर फ्रान्सिस दीब्रिटो
  • Tue , 12 October 2021
  • पंजाबPunjabचरणजित सिंग छन्नीCharanjit Singh ChanniदलितDalitना. वा. टिळकNarayan Waman Tilakअमरिंदर सिंगAmarinder SinghबुटासिंगButa Singhबाबा पद्मनजीBaba Padamjiरॉबर्ट डी नोबिलीपंडिता रमाबाईPandita Ramabaiफादर फ्रान्सिस दीब्रिटोFather Francis Dibrito

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये सत्ताबदल झाला. दुसऱ्या दिवशी बहुतेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवरचा मथळा पुढील आशयाचा होता – ‘पंजाबमध्ये पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री’. काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची उचलबांगडी होऊन चरणजित सिंग चन्नी यांची त्या जागी निवड करण्यात आली होती. वस्तुतः कॅप्टन अमरिंदर सिंग आणि चन्नी दोघंही धर्मानं शीख. १९५६ साली पंजाबची निर्मिती झाल्यापासून या राज्यात आतापर्यंत एकदाही बिगर-शीख मुख्यमंत्री झालेला नाही. तरीपण आतापर्यंत झालेल्या बहुतेक मुख्यमंत्र्यांच्या जातीविषयी कधीही असा उल्लेख करण्यात आलेला नव्हता.

मात्र नवे मुख्यमंत्री चन्नी यांच्याप्रमाणे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जातीविषयी असा उल्लेख झालेला नाही. जातिव्यवस्था आणि चातुर्वर्ण्यपद्धत केवळ हिंदू धर्मातच आहे, असे मानणाऱ्यांना एक दलित शीख नेता मुख्यमंत्री झाला, या बातमीनं धक्का बसला असेल काय, याविषयी मला शंका वाटते. खूप वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्रीपदी बुटासिंग होते. ते दलित शीख, पण त्यांची मूळ जात चांभार किंवा चर्मकार होती, हे जाणकार वाचकांना आठवत असेलच. कारण तेव्हा त्याचाही असाच उल्लेख केला गेला होता. खरं तर आपल्या देशात अशी कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतात…

जातीव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत, केवळ हिंदू धर्माचीच ती मक्तेदारी नाही, हे मानण्यास अनेक जण तयारच नसतात. त्यांना चरणजित सिंग चन्नी हे एक चपखल उत्तर असू शकतं.

शीख धर्माचा उगम मध्ययुगीन मुघलकाळात काळात झाला, तेव्हापासून अनेक जातींतील लोक या धर्माकडे आकर्षित होत आले आहेत. मात्र या धर्मात आल्यानंतरही त्यांच्या जुन्या जाती आणि त्या जातींनुसार येणारे त्यांचे व्यवसाय कायमच राहिले आहेत. म्हणूनच उत्तर भारतातल्या जाती शीख धर्मातही आल्या. हिंदू धर्मातील सर्व जाती-जमाती आपल्यात सामावून घेणारा शीख हा पहिला धर्म असावा. नंतरच्या काळात धर्मांतर मान्य असलेल्या इतर धर्मांनीही नकळतपणे शीख धर्माचा हा कित्ता गिरवला.

मध्ययुगीन काळातच रॉबर्ट डी नोबिली या इटालियन येशूसंघीय (जेसुईट) धर्मगुरूने दक्षिण भारतातल्या मदुराई परिसरात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. संत थॉमस यांनी दोन हजार वर्षांपूर्वी भारतात केरळमध्ये ख्रिस्ती धर्माचं रोपटं रुजवलं. त्यानंतर दीड हजार वर्षांनी नोबिलीने दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला.

विशेष म्हणजे नोबिलीने हिंदू धर्मांतील सर्वच जातीजमातींतील लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. एवढंच नव्हे तर त्यांना आपापल्या चालीरीती-प्रथा ख्रिस्ती धर्मातही चालू ठेवण्याची मुभा दिली. अशा प्रकारे ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात पहिल्यांदाच जातिसंस्थेचा, पर्यायानं जन्माधिष्ठित भेदभावाचा आणि उच्चनीचतेचा शिरकाव झाला.  

फादर नोबिलीने स्वतः ब्राह्मणांसारखी शेंडी राखली, स्थानिक संन्याशाप्रमाणे भगवा झगा वापरण्यास सुरुवात केली, पायांत खडावा आणि हातात कमंडलू घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे कॅथोलिक चर्चच्या रोममधील धर्माधिकाऱ्यांचा त्यास रोष पत्करावा लागला आणि धर्मतत्त्वांच्या विरोधी कृत्याबद्दल कारवाईलाही सामोरं जावं लागलं. मदुराई परिसरातील सर्व उच्चनीच जातीच्या लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा द्यावी, असा फादर नोबिलीचा उद्दात्त हेतू होता. मात्र त्यामुळे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या जातिसंस्थेची  आणि जन्मजात भेदभावपद्धतीची शीख धर्माप्रमाणेच  ख्रिस्ती धर्मालाही लागण झाली. 

याच दरम्यान पोर्तुगालच्या अंमलाखाली आलेल्या गोव्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मांतरं झाली. गोमंतकातील उच्चवर्णीय सारस्वत जातींतील लोकांप्रमाणेच खालच्या जातींतील लोकांनीही ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. या स्वखुषीच्या किंवा ‘बळजबरी’च्या धर्मांतरानंतर या लोकांनी आपापल्या मूळ चालीरीती आणि आहारपद्धती चालूच ठेवल्या. त्यामुळे तीन शतकांपूर्वी कोल्हापूर आणि बेळगाव परिसरांत स्थायिक झालेल्या मूळच्या गोव्यातल्या बार्देसकर ख्रिस्ती समाजातली काही कुटुंबं चक्क शुद्ध शाकाहारी असायची.

कॅथोलिक चर्चने धर्मतत्त्वांच्या जपवणुकीसाठी आणि शुद्धीकरणासाठी जगभर राबवलेल्या ‘इन्क्विझिशन’ या मोहिमेची झळ गोव्यातही मोठ्या प्रमाणात बसली. धर्मतत्त्वांचं पालन करण्याच्या आणि पाखंडी लोकांना शिक्षा करण्याच्या हेतूनें राबवल्या गेलेल्या या मोहिमेत ख्रिस्ती असलेल्या लोकांचे खूप हाल करण्यात आले, अनेकांना मृत्युदंड देण्यात आला. ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांविरोधी असलेल्या जाती व जातिभेद या नवधर्मांतरित ख्रिस्ती समाजातही आले आहेत. याकडे मात्र कॅथोलिक चर्चचं लक्ष गेलं नाही. 

महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्माचा शिरकाव झाला, तो मुंबई आणि वसई परिसरात पोर्तुगीजांनी आपला अंमल प्रस्थापित केल्यानंतर. पोर्तुगीज दर्यावर्दी जिथं जिथं गेले, तिथं तिथं त्यांनी आपला कॅथोलिक धर्मही बरोबर नेला. या उलट ब्रिटिशांचं होतं. त्यांनी व्यापार आणि धर्म यांची गल्लत करण्याचा मूर्खपणा भारतात कधीही केला नाही. त्यामुळेच विल्यम कॅरीसारख्या ख्रिस्ती मिशनऱ्यांना सुरुवातीच्या काळात ‘ब्रिटिश भारता’त धर्मप्रसारासाठी येण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. परिणामी कोलकात्यापाशी डचांची सत्ता असलेल्या मुलखात त्याला सुरुवातीला वास्तव्य करावं लागलं.

पोर्तुगीजांच्या वसईतील सत्तेमुळे तिथं मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्म रुजला. तिथंही धर्मांतरित समाजानं आपल्या मूळ जाती-प्रथा नेल्या. आजही या जाती वसईतील ख्रिस्ती समाजात कायम आहेत, इतकंच नव्हे त्यापैकी काही जातींचा ‘ओबीसी’त समावेशही करण्यात आला आहे!

भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू झाला, तो ब्रिटिशांनी ख्रिस्ती मिशनरींवरील बंदी उठवल्यानंतर. एकोणिसाव्या शतकात अहमदनगर जिल्ह्यात, मराठवाड्यात आणि इतर काही ठिकाणी अस्पृश्य समाजातील लोकांनी एकगठ्ठा धर्मांतर केलं. मराठवाड्यात मातंग समाजातील लोकांनी, तर अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत महार जातीच्या लोकांनी ख्रिस्ती धर्म आपलासा केला. पण जातीनं आणि पिढीजात पेशांनी त्यांचा पिच्छा ख्रिस्ती धर्मातही सोडला नाही.

यातून ‘मातंग ख्रिस्ती’ आणि ‘महार ख्रिस्ती’ हे नवे समाज उदयास आले. मातंग आणि महार जातींमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे साहजिकच मातंग ख्रिस्ती आणि महार ख्रिस्ती यांच्यातही होत नाहीत. या धर्मांतरीत ख्रिस्ती कुटुंबांना विवाहस्थळांसाठी आपल्या मूळ जातीकडे आणि आपल्या गावांकडेच जावं लागतं.     

पंडिता रमाबाई (डोंगरे), नारायण वामन टिळक, नीळकंठशास्त्री नेहेम्या गोऱ्हे वगैरे चित्पावन ब्राह्मणांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची जात व पोटजात चोरपावलानं ख्रिस्ती धर्मात आली. चालू वर्ष पंडिता रमाबाईंच्या स्मृतिशताब्दीचं वर्ष आहे. गंमत म्हणजे आज १०० वर्षानंतरसुद्धा त्यांना ‘चित्पावन ब्राह्मण’ म्हणूनच ओळखलं जातं. तीच गोष्ट मराठीतील आद्यकादंबरीकार रेव्हरंड बाबा पद्मनजी यांची. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला असला तरी त्यांची माहिती त्यांच्या ‘साळी’ या जातीचा उल्लेख केल्यावाचून पूर्णच होत नाही. ‘जाता जात नाही, ती जात,’ असं उगाच म्हटलं जात नाही!

मध्ययुगीन काळात वसईत विविध जातींच्या लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. मात्र मूळ जाती या समाजात आजही शाबूत आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत. जाणकारांना त्यांच्या जाती लगेच लक्षात येतील, अशा प्रकारच्या त्यांच्या खास चालीरीती आणि वेषभूषाही असतात.

श्रीरामपूरला शाळेत असल्यापासून मी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची हरेगावला सप्टेंबर महिन्यातल्या मतमाऊलीच्या म्हणजे मारीयामातेच्या यात्रेत प्रवचनं ऐकली आहेत. त्यांचं साहित्य वाचत आलो आहे. गेल्या वर्षी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटो यांची निवड झाली. त्यानंतर एका आघाडीच्या दैनिकात ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी त्यांच्या ‘सामवेदी ब्राह्मण’ या मूळ जातीचा आवर्जून उल्लेख केला, तेव्हा मी हादरलोच. फादर दिब्रिटोंचे माझ्या मनात अत्यंत प्रेमाचं आणि आदराचं स्थान असूनसुद्धा का कुणाच ठाऊक त्या अनावश्यक उल्लेखानं आम्हा दोघांत अचानक एक मोठी दरी निर्माण झाली आहे, असं मला त्या क्षणी वाटलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हजारो अनुयायांनी १९५६ साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर राज्यघटनेने त्यांना दिलेल्या आरक्षणादी सवलतींवर गडांतर आलं. कारण तोपर्यंत अनुसूचित जातींमध्ये केवळ हिंदू आणि शीख धर्मांतील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींचाच समावेश व्हायचा, बौद्ध किंवा ख्रिस्ती धर्मांतील जातींचा नाही. अखेरीस १९९० साली जनता दलाच्या राजवटीत पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी राष्ट्रपतींद्वारा अध्यादेश काढून नवबौद्ध समाजावरील हा अन्याय दूर  केला. दलित ख्रिस्ती मात्र यापासून अजूनही वंचित आहेत.

मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९७८ साली पूर्वाश्रमीच्या महार आणि मातंग असलेल्या ख्रिस्ती समाजाचा ओबीसी गटात समाविष्ट करून त्यांना आरक्षणाच्या सवलती मिळवून दिल्या आहेत. धनगर वगैरे अनुसूचित जमातींत मोडणाऱ्या ख्रिस्ती समाजाला मात्र अनुसूचित जमातींना असलेल्या सर्व सवलती आणि आरक्षण १९५०पासून लागू आहे.

धर्मांतरित ख्रिस्ती समाजात जशी आजही जातीव्यवस्था आढळते, तशी धर्मांतरित बौद्ध समाजात काय

परिस्थिती आहे यावर आजपर्यंत मी तरी काही लिखाण वाचलेले नाही.

नारायण वामन टिळक यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, तेव्हा हिंदू संस्कृतीतील स्पृश्यास्पृश्य आणि जातिभेद या धर्मातही असतील याची त्यांनी  कल्पनाही केली नव्हती. तुकोबाच्या सेतूवरून ख्रिस्ताकडे आल्याचा अभिमान बाळगणाऱ्या रेव्हरंड टिळकांनी दक्षिण भारतात ख्रिस्ती समाजात उच्चनीच जातिभेद अनुभवले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता.

अस्पृश्यता वा जन्माधिष्ठित जातीबरोबर येणारा उचनीचपणा हा मानवजातीवरचा कलंक आहे. तो मिरवणे ज्यांच्या नशिबी आले, त्यांचे दुःख इतरांना कधीच समजणार नाही. आडनावानं भारतात कुठल्याही व्यक्तीच्या जातीचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळेच खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या अनेकांनी आपली जातिदर्शक आडनावं टाकून आपल्या गावाचं नाव स्वीकारलं आहे. उदाहरणार्थ, नगरकर, लातूरकर वगैरे. अशा व्यक्तीना आडवळणाने त्यांच्या मूळ आडनावाविषयी चौकशी केली तरी त्या त्याबाबत थांगपत्ता लागू देत नाहीत असाच माझा अनुभव आहे.

घटनेनं दलितांना दिलेले न्याय्य हक्क आणि अधिकार पूर्वाश्रमीचे दलित असूनही ‘दलित ख्रिस्ती’ समाजाला मात्र नाकारले आहेत. त्यातील काही लोक आपली जात आयुष्यभर लपवत असतात. बहुसंख्य लोक आपण त्या गावचेच नाही असाही आव आणतात. क्वचित प्रसंगी त्यांच्या या भूमिकेमागे व्यवहारीपणासुद्धा असतो. तो या अर्थानं की, दलितांना मिळणाऱ्या सवलती आणि आरक्षण मिळत नसेल, तर त्यांनी का म्हणून दलितत्वाची पाटी गळ्यात अभिमानानं मिरवावी?

रोमच्या ग्रेगरियन विद्यापीठातील अध्यापक डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांनी ‘दलित ख्रिस्ती’ हा अभद्र शब्द आहे, असं सांगत त्याला ४० वर्षांपूर्वी ठाम विरोध केला होता. त्याऐवजी त्यांनी ‘उपेक्षित ख्रिस्ती’ असा शब्द सुचवला होता. मूळचे संगमनेरचे असलेल्या डॉ. शेळके यांनी चोखा मेळा या संत कविचे अभंगांचे जर्मन भाषेत भाषांतर केले आहे. काळाच्या ओघात अनेकांनी ‘दलित’ ही उपाधी टाकून ‘आंबेडकरवादी’, ‘बौद्ध’ असे पर्याय स्वीकारले आहेत, हे आपण पाहतो आहोतच.

ज्यू आणि पारशी या धर्मांत मात्र धर्मांतराची प्रक्रियाच नसते. बाप्तिस्मा किंवा त्यासारखा कुठलाही स्नानसंस्कार करून या धर्मात प्रवेश करता येत नाही किंवा लग्नानंतर परधर्मातील जोडीदाराला या धर्मांत घेतलं जात नाही. या अशा जाचक अटी नसत्या तर भारतातल्या अनेकांनी हे धर्म स्विकारले असते आणि त्यातही जन्माधिष्ठित जातिव्यवस्थेचा व भेदभावाचा शिरकाव झाला असता, हे नक्की.

भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या जातींच्या उच्चाटनासाठी मध्ययुगीन संतांपासून अलीकडच्या समाजसुधारकांपर्यंत किती आणि काय काय प्रयत्न झालेले आहेत, याची इतिहासात नोंद आहे आणि या प्रयत्नांचं फलित काय, हेही आज आपल्यासमोर आहे.

हिंदू धर्मांचा त्याग करून समानता शिकवणाऱ्या दुसऱ्या धर्माचा स्वीकार, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह, जात-पोटजातीचा उल्लेख किंवा निर्देश करणाऱ्या आडनावांचा त्याग, इतकंच नव्हे तर धर्माचाच त्याग करून म्हणजे कम्युनिस्ट किंवा समाजवाद्यांप्रमाणे नास्तिक होऊन जातीच्या शेपटावर घाव घालण्याचे कितीतरी प्रयत्न झालेले आहेत. मात्र ते आजही वळवळतच आहे, किंबहुना अधिक मजबूत होत चाललं आहे, हे कटू वास्तव आपण नाकारू शकत नाही.

याचं एक कारण म्हणजे उच्च-नीचतेमुळे अनेकदा अवहेलना आणि अपमान होत असली तरी या जातींचे फायदेसुद्धा अमाप असतात. जातीमुळे एका दारात अपमान झाला तरी दुसऱ्या दारात हारतुऱ्यांनी स्वागत होत असते. त्यामुळे ज्या दलितांना आरक्षण आणि इतर सुविधांचा लाभ मिळतो, ते उजळ माथ्यानं आपलं दलितत्व मिरवतात, नव्हे त्याचा पुरेपूर वापर करतात. भारतातील आणि महाराष्ट्रातील दलित समाजातील अनेक सामाजिक, राजकीय नेत्यांनी आपल्या जातीबाहेरचे - खरं तर उच्चवर्णीय - वैवाहिक जोडीदार निवडले आहेत. त्यांच्या मिश्र विवाहातून झालेल्या नव्या पिढीनं खरं तर हे दलितत्व आणि जातित्वसुद्धा नाकारायला हवं होतं, पण तसं होत नाही. सामाजिक-राजकीय फायद्यांमुळे जातीला अधिकच कवटाळून धरण्याचा हल्लीचा प्रवाह आहे.

थोडक्यात जात-पोटजातीचा वापर आपल्या देशातल्या वेगवेगळ्या निवडणुकांत होतो… मुख्यमंत्रीपदी किंवा राष्ट्रपतीपदासाठी निवड झाल्यावर होतो… आणि ‘व्वा, व्वा, काय हा मास्टरस्ट्रोक!’ अशा शब्दांत त्याचं स्वागतही होतं… होणार… होत राहील…


Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction