पंडिता रमाबाई : एका हाताच्या बोटांवर मोजता येईल, अशा महाराष्ट्रातील विदुषींपैकी एक उपेक्षित पण कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • पंडिता रमाबाई आणि त्यांच्यावरील ग्रंथसंपदा व टपाल तिकीट
  • Tue , 24 August 2021
  • पडघमसांस्कृतिकपंडिता रमाबाईPandita Ramabaiसमाजस्वास्थ्यSamajswasthyaरघुनाथ धोंडो कर्वेRaghunath Dhondo Karveधोंडो केशव कर्वेDhondo Keshav Karveइरावती कर्वेIravati Karveदुर्गाबाई देशमुखDurgabai Deshmukhदुर्गा भागवतDurga Bhawat

प्रकांड पंडित, समाजसुधारक, साहित्यिक असे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असलेल्या रमाबाईंचे हे वर्ष (एप्रिल २०२१ - एप्रिल २०२२) स्मृतिशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त या विदुषीचे खरेखुरे मूल्यमापन व्हावे, त्यांच्या चरित्राची आणि कार्याची आजच्या पिढीला ओळख व्हावी, या हेतूने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील काही व्यक्तींनी ‘पंडिता रमाबाई स्मृतिशताब्दी समिती’ स्थापन केली आहे. या शताब्दी वर्षात रमाबाईंच्या जीवन, लेखन व कार्याचे तटस्थ दृष्टिकोनातून मूल्यमापन, तसेच स्थलकालसापेक्षता लक्षात घेऊन चिकित्सा करणेदेखील आवश्यक आहे. याच हेतूने एप्रिल २०२२पर्यंत ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले जाणार आहे.

...................................................................................................................

अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावरच्या ‘ध्यासपर्व’ या चरित्रपटातला अगदी सुरुवातीचा प्रसंग. पांढरीशुभ्र साडी घातलेली आणि केशसंभार पूर्ण धवल असलेली उतारवयाची एक स्त्री केक कापत आहे, असे एक दृश्य आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बालविधवा असलेल्या गोदूबाईंशी विवाह केला आहे आणि त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा रघुनाथ खिन्न मनाने हे सगळे पाहतो आहे. यातली केक कापणारी महिला आहे पंडिता रमाबाई, कारण बालविधवा गोदूबाई ही त्यांच्याच अनाथाश्रमातली मुलगी आणि बालविधवेचा हा पहिला पुनर्विवाह ही भारतातली एक ‘सामाजिक क्रांती’च होती. या चरित्रपटात पंडिता रमाबाईंची भूमिका साकारली आहे विजयाबाई मेहता यांनी.

मात्र गोदूबाईचे किरकोळ प्रकृतीच्या कर्वे यांच्याशी लग्न ठरवताना रमाबाईंनी अट घातली होती, आपल्या या ‘जावईबापूं’नी आधी स्वतःचा विमा उतरवून घ्यावा, उगाच गोदू पुन्हा बालविधवा झाल्यास तिचे हाल व्हायला नको! गंमतीचा भाग म्हणजे महर्षी कर्वे यांनी पुढे आयुष्याची शंभरी पार केली! देवदत्त टिळक यांनी महाराष्ट्राची तेजस्विनी ‘पंडिता रमाबाई’ या चरित्रात हा प्रसंग रेखाटला आहे.

मूळच्या कर्नाटकातल्या असलेल्या रमाबाई डोंगरे यांची महाराष्ट्र हीच कर्मभूमी. एका हाताच्या बोटांवर मोजता येतील, अशा महाराष्ट्रातील विदुषींमध्ये मी त्यांचा समावेश करेन. महाराष्ट्र ही तशी संशोधक आणि विद्वानांची खाण. ‘महाराष्ट्र चरित्रकोश : १८०० ते २०००’ या माझ्या चरित्रकोशात मी अनेक विद्वानांची अल्पचरित्रे दिली आहे. त्यात ‘विदुषी’ म्हणता येईल अशी फारच कमी व्यक्तिमत्त्वे मला आढळली. इरावती कर्वे, दुर्गाबाई देशमुख (सी. डी. देशमुख यांच्या पत्नी), दुर्गा भागवत अशा नाव घेण्यासारख्या महाराष्ट्रातील इतर काही विदुषी. यामध्ये पंडिता रमाबाईंचे फार वरचे स्थान आहे.

पंडिता रमाबाई म्हटले की, ब्राह्मण समाजातून ख्रिस्ती होऊन या धर्माचा प्रचार करणारी महिला असेच चित्र समोर येते. पण त्यांनी याहून खूप काही केले आहे. त्यांच्या आयुष्यातील कितीतरी घटना त्यांच्या विद्रोही, बंडखोर स्वभावाचे दर्शन घडवतात. कर्नाटकात डोंगरे कुटुंबात जन्मलेल्या या महिलेच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कलकत्ता (आता कोलकाता) येथील विद्वतजन अचंबित झाले आणि त्यांनी त्यांना ‘पंडिता’ ही पदवी प्रदान केली. स्वतः उच्चवर्णीय ब्राह्मण असलेल्या रमाबाईंनी त्या काळात आंतरजातीय, आंतरप्रांतीय विवाह केला. विशेष म्हणजे हा ‘प्रतिलोम विवाह’ होता, कारण त्या स्वतः उच्चवर्णीय, तर त्यांचे पती बिपिन बिहारीदास मेधावी हे शूद्र होते.

काँग्रेसच्या १८८९च्या अधिवेशनात हजेरी लावणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये त्या होत्या. हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी भारतीय महिलांच्या शिक्षणाच्या गरजेची जोरदार बाजू मांडली. बालविधवा, परित्यक्त्या आणि अनाथ मुलींसाठी त्यांनी किती कार्य केले, हेसुद्धा समजून घेतले पाहिजे.

महाराष्ट्रातून अमेरिकेत जाणारी पहिला महिला आनंदीबाई गोपाळराव जोशी आणि इंग्लंडला जाणारी पहिली महिला पंडिता रमाबाई, या दोन्ही कर्तृत्ववान महिला एकमेकींना पहिल्यांदा भेटल्या, त्या फिलाडेल्फिया येथील आनंदीबाईंच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने. इंग्लंडहून त्यासाठी अमेरिकेला बोटीने निघालेल्या रमाबाईंची वाट पाहत आनंदीबाई दोन दिवस बंदरावर बसून होत्या.

काम करणाऱ्या, घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी नऊवारी साडीऐवजी सहावारी गोल साडी चांगली, असा प्रचार करणाऱ्या पंडिता रमाबाई. त्यांची मुलगी मनोरमा मेधावी यांनी केडगावात अंधांसाठी भारतातली पहिली शाळा सुरू केली आणि तिथे ब्रेल लिपी शिकवली. केडगावातून पुण्यात डेक्कन कॉलेजात चारचाकी वाहन चालवत येणारी मनोरमा मेधावी महाराष्ट्रातील किंवा पुण्यातील बहुधा पहिली भारतीय महिला. नंतरच्या काळात इरावती कर्वे यांनी पुण्यातील पेठांत स्कूटरवरून प्रवास करत असाच विक्रम केला होता.

रमाबाईंना संस्कृत, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती, हिंदी आणि तुळु या भाषा अवगत होत्या. इंग्रजीत त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. मूळ ग्रीक व हिब्रू भाषेतून त्यांनी ‘बायबल’चे मराठीत भाषांतर केले. या धर्मग्रंथाचे मूळ भाषेतून भाषांतर करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. आजही ‘बायबल’चे मराठीत भाषांतर करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. याशिवाय त्यांनी मराठी-इंग्रजीत विविध पुस्तकेही लिहिली आहेत.

रमाबाईंविषयी त्यांचे ‘जावई’ महर्षी कर्वे यांनी आपल्या ‘आत्मवृत्त’ या आत्मचरित्रात लिहिले आहे – “महाराष्ट्रात विधवाशिक्षणाच्या इमारतीचा पाया रचण्याचे अत्यंत श्रेष्ठ कार्य पंडिता रमाबाई यांनी केले आहे… अशा या पराक्रमी स्त्रिया हिंदुस्थानात काय पण या भूतलावरही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यासुद्धा मिळायच्या नाहीत.’’ हिंदू संतमालिकेत समावेश करता येईल अशी पहिली व्यक्ती पंडिता रमाबाई आहेत, असे सरोजिनी नायडू यांनी म्हटले आहे. ख्रिश्चियाना येथे बोलताना प्राच्यविद्या तज्ज्ञ मॅक्सम्युलर यांनी पंडिता रमाबाई या राजा राममोहन रॉय यांच्या तोडीच्या नारी आहेत, असे म्हटले होते. ‘कैसर-ई-हिंद’ हा मानाचा पुरस्कार देऊन ब्रिटिश सरकारने रमाबाईंचा गौरव केला. त्यांच्या गौरवार्थ भारत सरकारने १९८९ साली पोस्टाचे तिकीट काढले होते.

रमाबाईंचे शंभर वर्षांपूर्वी निधन झाले, त्यांच्या हयातीतच आणि नंतर त्यांची कितीतरी चरित्रे मराठी आणि आणि इंग्रजीत लिहिली गेली आहेत. या विद्रोही समाजसुधारक महिलेचे चरित्र प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनीही लिहिले आहे. रमाबाईंवर आजवर मराठी, इंग्रजी आणि इतर भाषांत जितकी चरित्रे आणि पुस्तके लिहिली गेली आणि आजही लिहिली जाताहेत, तितकी पुस्तके महाराष्ट्रातील कुणाही महिलेवर आतापर्यंत लिहिली गेलेली नाहीत.

देवदत्त टिळक (रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि ‘स्मृतीचित्रे’कार लक्ष्मीबाई यांचे चिरंजीव ) यांनी ‘महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई’ हे या विदुषीचे चरित्र लिहिले आहे. भरपूर संदर्भांसह, तळटिपांसह आणि अनेक परिशिष्टे देऊन लिहिलेले मराठीतील हे पाचशे पानांचे एक आधारभूत चरित्र म्हणावे लागेल.  ते १९६० साली प्रसिद्ध झाले. व्हाईट लाईट पब्लिकेशन्स आणि देवदत्त टिळकांची नात मुक्ता अशोक टिळक यांनी २०१२ साली या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे.

या चरित्राच्या प्रस्तावनेत देवदत्त टिळक लिहितात – “प्रमाणबद्ध पण सर्वांना पटेल असे पंडिताबाईंचे चरित्र लिहिणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. एक तर त्यांच्याचरित्रात विरोधाभासात्मक व विसंवादी दिसणाऱ्या अशा पुष्कळ घटना असून त्यांच्याबद्दलचे झालेले गैरसमज फार खोलवर व दूरवर रुजलेले आहेत. रमाबाईंच्या साऱ्या आयुष्यात त्यांच्या बाजू त्यांच्याच दृष्टिकोनाने पाहण्याचे अवघड काम श्री प्रबोधनकार ठाकरे यांच्याखेरीज दुसऱ्या कोणाला फारसे साधल्यासारखे दिसत नाही.”

ज्योत्स्ना देवधर (पॉप्युलर प्रकाशन, १९९०) यांची ‘रमाबाई’ ही कादंबरी, सिसिलिया कार्व्हालो यांचे ‘महाराष्ट्राचे शिल्पकार : पंडिता रमाबाई’ (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, २००७) आणि अनुपमा निरंजन उजगरे यांचे ‘पंडिता रमाबाई’ (साहित्य अकादमी, २०११) ही अगदी अलीकडची पुस्तके.   

रमाबाईंनी आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात अनेक वादळांना तोंड दिले. त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व कुणालाही अचंबित करेल असेच आहे. ‘ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ (२००३) या माझ्या पुस्तकाची सुरुवातच या विदुषी आणि समाजसुधारक व्यक्तिमत्त्वाच्या प्रकरणाने होते.

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मोजक्या समाजसुधारकांमध्ये रमाबाईंचा समावेश होतो. आर्य महिला समाज, शारदा सदन, मुक्ति सदन अशा संस्थांची उभारणी करून स्त्रियांसाठी स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराची वाट मोकळी केली. आंतरजातीय विवाह करणारी पहिली उच्चवर्णीय स्त्री, अंधशाळा, किंडरगार्टन, खादीचा प्रयोग, परदेशागमन करणे, प्रवासवर्णनलेखन अशा अनेक धाडसी कृतींचे ‘पहिलेपण’ रमाबाईंकडे जाते. संस्कृत भाषेसह अनेक भाषा आत्मसात करून संस्कृत, मराठी व इंग्रजीत पुस्तके लिहिणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेले योगदान एकमेवाद्वितीय आहे.

रमाबाई ख्रिस्ती मिशनरी म्हणून पुण्यातील आघाडीच्या दैनिकांत त्यांची हेटाळणी केली गेली. याआधी अशाच प्रकारचा छळ आणि हेटाळणी पुण्यातील सनातनी, कर्मठ लोकांनी महात्मा जोतीबा फुले आणि सावित्राबाईंचा केला होता. मिशनरींच्या जवळ गेल्याने महात्मा फुले यांना हेटाळणीने ‘रेव्हरंड फुले’ असे संबोधले गेले होते. त्या काळात रमाबाईंना ज्या प्रकारच्या टीकेला आणि अवहेलनेला तोंड द्यावे, त्यामुळे त्या खूप दुखावल्या आणि पुणे सोडून केडगाव येथे त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.

ज्योत्स्ना देवधर ‘रमाबाई’ या कादंबरी लेखनाच्या प्रयोजनाविषयी म्हणतात - “पुण्यानं तुम्हाला अव्हेरलं, तेव्हा मोठ्या धैर्यानं मानीपणानं तुम्ही पुण्याकडं पाठ फिरवली ती कायमचीच. उपेक्षा, निंदा, नालस्ती, अडचणी सगळं अंगावरचा धुरोळा झटकून टाकावा, तसा झटकून केडगावला गेलात, पण रमाबाई, अंतर्यामी तुम्ही खूप दुखावला होता, हो ना? तसं नसतं तर आयुष्याच्या शेवटी शेवटी तुम्ही स्वतःवर सूड उगवल्यासारखा नसता वागलात. त्यानंतर तुम्हाला पुणं विसरलंच. आजवर महाराष्ट्रानं तुमची योग्य ती दखल घेतली नाही. त्या काळातल्या रानडे, फुले, आगरकर कर्वे गोखले यांच्या बरोबरीनं, त्याच श्वासात तुमचं नाव घेतलं जावं, महाराष्ट्रातल्या समाजजीवनातल्या या मानकऱ्यांबरोबर तुम्हालाही स्थान मिळावं असं मला उत्कटतेनं वाटलं.”

रमाबाईंच्या योगदानाची समाजाने योग्य दखल घ्यावी, या हेतूने ज्योत्स्ना देवधर यांनी ही कादंबरी १९८९ साली लिहिली. मात्र आज चाळीस वर्षांनंतरसुद्धा देवधर यांच्या या प्रयत्नाला यश आलेले दिसत नाही.

महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर वगैरे समाजसुधारकांना त्या काळात ज्या मानहानीला, अवहेलनाला तोंड द्यावे लागले, त्याबद्दल महाराष्ट्रातील समाजमनाने पारिमार्जन घेतले आहे. आज या समाजसुधारकांना समाजात मानाचे स्थान आहे. रमाबाई याबाबतीत तितक्या सुदैवी नाहीत.

समाजसुधारक म्हणून रमाबाईंचा अगदी नामोल्लेखही टाळण्याचे कारण सर्वपरिचित आहे, ते म्हणजे त्यांनी केलेले ख्रिस्ती धर्मांतर आणि या धर्माचा प्रसार. संस्कृतमध्ये ‘परधर्मो भयावह’ असा एक श्लोक आहे. रमाबाईंनी नुसते धर्मांतर केले नव्हते, तर आपल्या या नव्या ख्रिस्ती धर्माचा त्या प्रसारसुद्धा करत होत्या. त्यामुळे पुण्यातील आणि महाराष्ट्रातली सनातनी मंडळी आणि अवघे समाजमन खवळणार हे साहजिकच होते. रमाबाईंबद्दलचा तो राग आणि आकस आजही मावळलेला नाही.  

शालेय प्राथमिक वर्गापासून माझे शिक्षण मराठीत झाले. मुंबई विद्यापिठाच्या बीएच्या दुसऱ्या वर्षापर्यंत मराठी हा माझा खास विषय होता. रमाबाईंच्या चरित्रावर वा कार्यावर आधारित एकही धडा किंवा पुस्तक माझ्या शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नव्हते. महाराष्ट्र राजदरबारी त्यांच्या नावाने कुठलाही पुरस्कार वा सन्मान दिला जात नाही, त्यांच्या नावाने कुठलेही विद्यापीठ, मंडळ किंवा संस्था स्थापन झालेल्या नाहीत. देशभरातील आणि महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या यादीत आणि छायाचित्रांत रमाबाईंचा समावेश नसतो.

त्यांच्याबद्दल लिहिताना तुम्ही एक तर त्यांचे समर्थक किंवा भक्त असतात किंवा कट्टर विरोधक असता. यामुळेही कदाचित रमाबाईंना दुर्लक्षित ठेवले जात असावे. त्यांची सर्वच मते किंवा कृत्ये त्या काळी किंवा आज समर्थनीय आहेत, असे म्हणता येणार नाही. ‘बायबल’च्या मराठी भाषांतराविषयी रमाबाईंचे आणि रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे तीव्र मतभेद होतेच. त्यांच्या मराठी ‘बायबल’मधली भाषा आज अनेकांना क्लिष्ट, बोजड वाटते, यात तथ्य आहेच. त्यामुळे तो अनुवाद फारसा वापरात नाही.

प्रकांड पंडित, समाजसुधारक, साहित्यिक असे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असलेल्या रमाबाईंचे हे वर्ष (एप्रिल २०२१ - एप्रिल २०२२) स्मृतिशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त या विदुषीचे खरेखुरे मूल्यमापन व्हावे, त्यांच्या चरित्राची आणि कार्याची आजच्या पिढीला ओळख व्हावी, या हेतूने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील काही व्यक्तींनी ‘पंडिता रमाबाई स्मृतिशताब्दी समिती’ स्थापन केली आहे.

या शताब्दी वर्षात रमाबाईंच्या जीवन, लेखन व कार्याचे तटस्थ दृष्टिकोनातून मूल्यमापन, तसेच स्थलकालसापेक्षता लक्षात घेऊन चिकित्सा करणेदेखील आवश्यक आहे. याच हेतूने एप्रिल २०२२पर्यंत ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले जाणार आहे.

“आज आपण एका अरिष्टग्रस्त काळातून जात आहोत. धर्मांधता, परधर्मद्वेष, हिंसा, संवेदनाहीनता. परसमूहातील स्त्रीचा द्वेष यासोबतच दारिद्र्य, बेरोजगारी, विषमता अशा प्रश्नांनी आपले सामाजिक जीवन गांजले आहे. अशा संकटसमयी ज्यांच्या विचाराकडे आपण चिकित्सकपणे पुन्हा जायला हवे, त्यापैकी एक पंडिता रमाबाई आहेत,” असे स्मृतिशताब्दी समितीने म्हटले आहे.

या व्याख्यानमालेत रमाबाई यांचे जीवन, लेखन आणि कार्य तसेच त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा चिकित्सक परिचय करून देण्याचा प्रयत्न असेल. या व्याख्यानमालेत पदवी-पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, स्त्री अभ्यास केंद्रांचे विद्यार्थी, वेगवेगळ्या चळवळींतील कार्यकर्ते, महिला, तौलनिक धर्मशास्त्राचे अभ्यासक आणि विवेकी नागरिक अशा सर्वांनी लाभ घ्यावा.

या स्मृतिशताब्दी समितीच्या सभासदांमध्ये नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक दिलीप चव्हाण, मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख आणि ‘आमची श्रीवाणी’ (त्रैमासिक)च्या संपादक वंदना महाजन, कवयित्री आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या माजी जनसंपर्क अधिकारी नीलिमा बंडेलू, नागपूर येथील शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्या आणि ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाच्या संपादक मंडळ सदस्य प्रज्वला तट्टे, कुरुंदवाड येथील निवेदक, लेखक आणि अभ्यासक साहिल कबीर आणि पुण्यातील पत्रकार कामिल पारखे यांचा समावेश आहे.

‘पंडिता रमाबाई स्मृतिशताब्दी समिती’च्या कार्यक्रमांच्या माहितीसाठी दोन व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. इच्छुकांनी यापैकी एका ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करावे.

https://chat.whatsapp.com/GfehDUjUavc5Lo1FNfyq5D

https://chat.whatsapp.com/J9yot3zKRVlBf3ShBngvYC

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com


Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction