
पंडित नेहरु आणि गोवा .... ``गोवा के लोक अजीब है'' ( मांडवीतून बोटीने पणजीत आलेल्या पंतप्रधान पंडित नेहरुंचा हा दुर्मिळ फोटो. पंडितजींनी गोव्याला २२ मे १९६३ रोजी पहिल्यांदाच भेट दिली. ) `` पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. ग. उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पत्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात स्पष्ट केली होती. `आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही’ अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते. ``परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शाश्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात...