फादर जॉन बेल्सर
हरेगावला १९७० च्या सुमारास संत तेरेजा विद्यालयाच्या बोर्डिंगात असताना फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वास्सरर तेथे धर्मगुरु होते. तेथे असताना मग फादर झेम्प, फादर बेन्झ, फादर जॉन हल्दनर, फादर जॉन बेल्सर अशी नावे असलेली युरोपियन फादर अनेकदा तेथील मतमाऊलीच्या यात्रेला आणि चर्चच्या सणासुदीला यायचे.
श्रीरामपूरला धर्मगुरु असलेल्या फादर आयवो मायर यांनी तर माझा बाप्तिस्मा केलेला होता. आणि १७ जूनला मी जन्मलो म्हणून त्या दिवशी सण असलेल्या कामिल या संताचे नाव त्यांनीच दिले होते. (अर्थात हे नंतर माझ्या लग्नाच्या वेळेस बाप्तिस्म्याच्या दाखल्याची गरज पडली तेव्हा कळले !)
फादर मायर यांनी पन्नास-साठ वर्षांपूर्वी श्रीरामपूरच्या प्रसिद्ध सेंट लुक हॉस्पिटलची म्हणजे जर्मन हॉस्पिटलची स्थापना केली. पुण्यात सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटचेही ते अनेक वर्षे संचालक होते. पुण्यात त्या जुन्या काळात टेल्को, बजाज, ग्रीव्हज, अशा बड्या औद्योगिक कंपन्यांना कुशल कामगार या संस्थेने पुरवले आणि ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या तरुणांना रोजगार मिळवून देऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे स्वतःचे छत उभे करण्यास मदत केलीे.
बैल पोळा सणाच्या वेळी हरेगावच्या त्या टोलेगंज चर्चच्या पायऱ्यांवर उभे राहून परीसरातील शेतकरी आपले बैल घेऊन येत तेव्हा चर्चभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या या बैलांवर पवित्र पाणी शिंपून त्यांना आणि त्या शेतकऱ्यांना आशीर्वादित करणाऱ्या सफेद झग्यातील त्या युरोपियन फादरांची प्रतिमा माझ्या मनात आजही ताजी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील आणि वाड्या-वस्तीतल्या अडाणी लोकांच्या तोंडीसुद्धा ही युरोपियन नावे असायची, इतका या फादरांचा लोकांशी विविध कारणांनी दांडगा संपर्क असायचा. जर्मन, स्वीस, ऑस्ट्रियन वगैरे देशांतील जेसुइट (येशूसंघीय) धर्मगुरुंच्या जर्मन प्रॉव्हिन्सचे सभासद असलेल्या या धर्मगुरुंनी या गावांत शाळा, दवाखाने आणि इतर सुविधा सुरु करुन ख्रिस्ती धर्मप्रसार केला होता.
जर्मनीत स्थायिक असलेलूया डॉ अजित लोखंडे यांनी ९३ वर्षांच्या फादर जॉन बेल्सर यांचे स्वित्झर्लड मध्ये निधन झाल्याची बातमी कळवली आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध पॅरिश म्हणजे धर्मग्रामांत काम केलेल्या या पाश्चिमात्य फादरांची आठवण झाली.
अहमदनगर जिल्ह्यात १८७८ ला जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सच्या धर्मगुरूंनी राहुरीजवळच्या केंदळ या गावात रोमन कॅथोलिक पंथाचे मिशनकार्य सुरु केले, त्या प्रॉव्हिन्सचा एक शेवटचा दुवा फादर बेल्सर यांच्या निधनाने निखळला आहे.
खरे सांगायचे म्हणजे फादर बेल्सर अजून जिवंत होते हे मला आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना माहितही नव्हते. याचे कारण म्हणजे १९४८ साली तरुण वयात भारतात आलेल्या फादर बेल्सर यांनी वयाच्या ५८व्या वर्षी म्हणजे १९८६ साली आफ्रिकेत झिम्बाब्वे येथे जाऊन तिथे स्थानिक भाषा शिकून मिशनकार्य सुरु केले होते. अलिकडेच वृदत्वामुळे ते मायदेशी म्हणजे स्वित्झर्लडला परतले होते.
पण स्वित्झर्लडला परतलेल्या फादर हर्मन बाखर यांच्या रुपाने भारतातील जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचा अगदी शेवटचा दुवा आजही आहे. वयाची ९७ वर्षे पूर्ण झालेले फादर बाखर यांनी १९६०च्या दशकात अहमदनगरच्या संगमनेर आणि इतर परीसरात वॉटरशेड डेव्हलपमेंट म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहिम राबवून महाराष्ट्रात ग्रामीण विकास चळवळीचा पाया घातला. नंतर अहमदनगर येथे अनेक वर्षे सोशल सेंटरचे काम चालविले.
फादर बेल्सर यांच्या निधनवार्तेमुळे अहमदनगर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात युरोपियन कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट मिशनरींची आणि त्यांनी केलेल्या योगदानाची जुन्या पिढीतील लोकांनां नक्कीच आठवण येईल.
Comments
Post a Comment