फादर जॉन बेल्सर
फादर जॉन बेल्सर हरेगावला १९७० च्या सुमारास संत तेरेजा विद्यालयाच्या बोर्डिंगात असताना फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वास्सरर तेथे धर्मगुरु होते. तेथे असताना मग फादर झेम्प, फादर बेन्झ, फादर जॉन हल्दनर, फादर जॉन बेल्सर अशी नावे असलेली युरोपियन फादर अनेकदा तेथील मतमाऊलीच्या यात्रेला आणि चर्चच्या सणासुदीला यायचे. श्रीरामपूरला धर्मगुरु असलेल्या फादर आयवो मायर यांनी तर माझा बाप्तिस्मा केलेला होता. आणि १७ जूनला मी जन्मलो म्हणून त्या दिवशी सण असलेल्या कामिल या संताचे नाव त्यांनीच दिले होते. (अर्थात हे नंतर माझ्या लग्नाच्या वेळेस बाप्तिस्म्याच्या दाखल्याची गरज पडली तेव्हा कळले !) फादर मायर यांनी पन्नास-साठ वर्षांपूर्वी श्रीरामपूरच्या प्रसिद्ध सेंट लुक हॉस्पिटलची म्हणजे जर्मन हॉस्पिटलची स्थापना केली. पुण्यात सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटचेही ते अनेक वर्षे संचालक होते. पुण्यात त्या जुन्या काळात टेल्को, बजाज, ग्रीव्हज, अशा बड्या औद्योगिक कंपन्यांना कुशल कामगार या संस्थेने पुरवले आणि ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या तरुणांना रोजगार मिळवून देऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे स्वत...