पत्रकारितेचा श्रीगणेशा
सर, आर यु एम्प्टी नाऊ ?"
माझ्या या प्रश्नावर गोव्यातील मिरामारच्या धेम्पे कॉलेजमधील त्या स्टाफ रुममध्ये एकदम शांतता पसरली. एकदोन महिला शिक्षकांनी टेबलावरील आपली पुस्तके उचलून ताबडतोब दाराकडे वाटचाल केली. बाकीच्यांनी आपसातील संभाषण थांबवून क्षणभर माझ्याकडे रोखून पाहून लगेचच माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवत समोरचे वृत्तपत्र चाळण्यास सुरुवात केली. ज्यांना मी हा प्रश्न विचारला ते प्राध्यापक अफ़ॉन्सो तसे ज्येष्ठ शिक्षक असल्याने स्टाफ रूममधील कुणीही या प्रश्नावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले होते.
प्राध्यापक अफ़ॉन्सो यांनी मात्र प्रसंगावधान राखत त्यांना मी विचारलेला हा अवघड प्रश्न अगदी कुशलतेने हाताळला होता.
''यस जॉन, आय एम फ्री नाऊ... टेल मी, व्हाट डू यु वॉन्ट ?" त्यांनी लगेचच मला प्रतिसाद दिला होता.
त्यांच्या त्या उत्तराने कॉलेजच्या त्या स्टाफ रुममध्ये माझ्या प्रश्नानंतर एकदम सन्नाटा का पसरला होता हे मला लगेच कळाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या स्टाफ रुममधील उपप्राचार्य आणि रसायनशास्त्राचे विभागप्रमुख साखरदांडे सर, इंग्रजीच्या शिक्षिका इझाबेला वाझ, इतिहासाचे शिक्षक के एम मॅथ्यू आणि झेवियर या आणि अफ़ॉन्सो सरांच्या इतर सहकाऱ्यांच्या हजेरीत त्यांना "आर यु एम्प्टी ?" असे विचारुन मी त्यांची सर्वासमक्ष अक्कलच काढली होती.
त्यांच्या उत्तरामुळे माझ्या प्रश्नाची शब्दरचना चुकली होती हे माझ्या लक्षात आले होते. त्यांना मी " सर, आर यु एम्प्टी नाऊ ?" असे विचारण्याऐवजी '' सर, आर यु फ्री नाऊ? " असे विचारायला पाहिजे होते. मी आणखी एक नवी इंग्रजी वाक्यरचना शिकलो होते हे खरेच पण त्यासाठी मी आमच्या मानसशास्त्र विषयाच्या या प्राध्यापकाचा सर्वासमक्ष हकनाक बळी देऊन त्यांचा अपमान केला होता.
ही घटना आहे १९७७ सालच्या जुलै-ऑगस्ट महिन्यातली. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरात दहावीपर्यंत आणि कराडला अकरावीचे मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आता मी गोव्यात पणजी येथे बारावीचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत होतो. गोव्यात येईपर्यंत इंग्रजीतून एकही वाक्य धड म्हणता येत नव्हते, आता गेल्या काही दिवसांत इंग्रजीत बोललेले संभाषण थोडेफार कळत होते. पण इंग्रजी भाषेतील अर्थशास्त्र , मानसशास्त्र आणि इंग्रजी (निम्न स्तरीय) या पाठयपुस्तकांतील काहीच कळत नव्हते. प्रा. अफ़ॉन्सो यांच्या लक्षात ही गोष्ट आली होती आणि त्यामुळे त्यांचा मानसशास्त्र हा विषय सोप्या भाषेत त्यांच्या फावल्या वेळेत ते मला कोकणी भाषेत स्वतंत्र्यरित्या शिकवत असत. त्यामुळेच आजही मी त्यांना असाच याच कामासाठी भेटण्यास आलो होतो. मात्र सर्वांसमोर मी त्यांना 'आता तुम्हाला वेळ आहे का ' प्रश्न इंग्रजीतून केला होता आणि त्यातच घात झाला होता.
पणजीतल्या लायसेम इन्स्टिट्यूटमध्ये बारावीपर्यंत पोर्तुगीज भाषेत शिक्षण झालेल्या आणि ११ डिसेंबर १९६१च्या गोवामुक्तीनंतर इंग्रजीत पुढचे शिक्षण घेतलेल्या प्रा. अफ़ॉन्सो यांना केवळ पोर्तुगीज, कोकणी आणि इंग्रजी भाषा यायच्या आणि मला तर मराठीशिवाय कुठलीच अगदी हिंदी भाषासुद्धा चांगली समजत नव्हती. तरीसुद्धा माझ्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानाची अडचण समजून घेऊन प्रा. अफ़ॉन्सो यांनी मला आणि दोन विद्यार्थिनींना कोकणी भाषेतून मानसशास्त्राचे धडे शिकवण्याचा अवघड कार्यक्रम हाती घेतला होता. अवघड यासाठी की त्यांच्या कॅथोलिक किंवा पोर्तुगीज धाटणीचे कोकणी मला फारसे समजत नव्हते. तरी अनेकदा हातवाऱ्यांचा आधार घेत प्रा.अफ़ॉन्सो मला मुलांची मोटार मुव्हमेंट म्हणजे हातबोटांची हालचाल वगैरे मानसशास्त्र पाठ्यपुस्तकातील प्राथमिक विषय शिकवत होते.
धेम्पे कॉलेजांत बारावीला आणि नंतर बीएची तीन वर्षे प्रा.अफ़ॉन्सो मला शिकवत होते या काळात ते मला नेहेमी जॉन या माझ्या वडिलांच्या नावानेच हाक मारत असत आणि मीही त्यांना प्रतिसाद देत असे. याचे कारण म्हणजे गोव्यात कॅथोलिक पुरुष आणि महिलांचे स्वतःचे तीन, चार किंवा अगदी पाचसहा म्हणजे `लितानी ऑफ नेम्स' किंवा आगगाडीच्या डब्यांसारखी अनेक नावे असतात. उदाहरणार्थ, फ्रान्सिस झेव्हिअर सावियो जेम्स एडगर फुर्तार्डो. यापैकी शेवटचे फुर्तार्डो हे आडनाव नाव वगळता बाकी सर्व नाव त्या व्यक्तीचीच असतात. बाप्तिस्म्याच्या वेळी बालकाचे जन्मदाते माता, पिता तसेच गॉडमदर आणि गॉडफादर आपापल्या पसंतीची नावे सुचवत असतात आणि धर्मगुरु ती नावे ते चर्चच्या बाप्तिस्म्याच्या नोंदवहीत लिहितात. बाप्तिस्म्याच्या या सोहोळ्याला ख्रिश्चनिंग सेरेमनी असेही म्हणतात आणि त्यावेळी दिल्या जाणाऱ्या या नावांना ख्रिश्चन नेम्स म्हणतात. मग ही सगळीच्या सगळी सर्व नावे शाळांच्या दाखल्यांत आणि नंतर त्या व्यक्तीच्या पासपोर्टपर्यंत जन्मभर पिच्छा करतात ! गोव्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रिय मंत्री एदुआर्दो फालेरो यांचे स्वतःचे पूर्ण नाव वाचून त्यामुळेच अनेकांची भंबेरी उडत असे.
गोव्यातील या पद्धतीमुळेच माझे लिखित कामिल जॉन पारखे हे नाव पाहून जॉन हे माझे स्वतःचेच नाव असेल अशी प्रा. अफ़ॉन्सो यांनी समजूत करून घेतली होती. तर अशा प्रकारे इंग्रजी भाषेचा गंध नसलेल्या आणि गोवा, दमण आणि दीव बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेस सामोरे जाऊ पाहाणाऱ्या आम्हां तीन विद्यार्थांना प्रा. अफांसो आपल्या परीने मदत करु पाहत होते. याशिवाय धेम्पे कॉलेजापाशी मिरामार येथेच असलेल्या येशूसंघीय किंवा जेसुइट धर्मगुरूंच्या प्री-नोव्हिशिएटमध्ये किंवा सेमिनरीत मी धर्मगुरु होण्याच्या हेतुने राहात आहे याचीही त्यांना माहिती होती.
बारावी पास झाल्यानंतर बीएला सुद्धा पहिले दोन वर्षे एक विषय मराठी असल्याने मदत झाली. प्रा. अफ़ॉन्सो आम्हाला आता तत्वज्ञानाचे विषय शिकवित होते, पण मला आता खास वेगळ्या शिकवणीची गरज राहिली नव्हती. तोपर्यंत इंग्रजी समजण्यात आणि बोलण्यात चांगली प्रगती झाली होती. त्याचे कारण म्हणजे आमच्या प्री-नोव्हिशिएटमध्ये आमच्या सुपिरियर धर्मगुरूंनी आम्हां विद्यार्थ्यांना मराठी वा कोकणी भाषेत बोलण्यास मज्जाव केला होता. त्याशिवाय गोवा-पुणे -बेळगाव येशूसंघीय प्रांतातील पंचवीस प्री-नोव्हिस विद्यार्थ्यांमध्ये मराठी समजणारे आम्ही इनमिन तीनच जण होते. आमचे जेवण बनवणारा आणि केवळ कोकणी आणि पोर्तुगीज बोलू शकणारा फ्रान्सिस हा 'मेस्ता' वगळता आसपास सर्वच जण इंग्रजी बोलणारे असल्याने इंग्रजी बोलता आणि लिहिता येऊ लागले. आणि त्यामुळे मुंबई विद्यापीठाची बीएची परीक्षा हायर सेकंड क्लासने पास होणे शक्य झाले.
खरे तर यानंतरच माझी खरी परीक्षा सुरु झाली होती. बीएच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच धर्मगुरू होण्याचा माझा इरादा नाही आणि त्यामुळे मी बेळगावच्या साधनालय या येशूसंघीय नोव्हिशिएटमध्ये किंवा मठात जाणार नाही हे मी माझ्या सुपिरियर धर्मगुरु असलेल्या फादर इनोसंट पिंटो यांना सांगितले होते. त्यामुळे परीक्षा झाल्यावर लगेचच म्हापसा येथे एका शिकवणी क्लासेसमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारुन मी प्री-नोव्हिशिएट सोडले आणि म्हापशालाच पेइंग गेस्ट म्हणून राहु लागलो. मात्र त्याचवेळेस पणजी येथे दुसरी नोकरी पहाण्याचे प्रयत्न चालूच होते.
एकदा पणजी मार्केट पाशी असलेल्या नवप्रभा या मराठी दैनिकाच्या कार्यालयात नोकरी शोधण्यासाठी गेलो. त्या एकमजली कौलारीं इमारतीच्या लाकडी पायऱ्या चढून मी मजबूत लाकडी तुळयांवरच उभ्या असलेल्या पहिला मजल्यावर आलो तेव्हा माझ्यासमोर दोन दालने होती. त्यापैकी एका दालनात समोर कागदांवर काही लिहित असलेल्या एका व्यक्तीच्या दिशेने मी वळलो. मी माझ्या कामाचे स्वरुप सांगितले तसे त्या माणसाने उभ्याउभ्या मला 'इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे का' याची चौकशी केली. मी होकारार्थी उत्तर दिले तसे त्या तिशीतील माणसाने मला समोरच्या दुसऱ्या दालनात नोकरीसाठी प्रयत्न करायचा सल्ला दिला.
''आमच्याच संस्थेचे ते इंग्रजी दैनिक आहे. इंग्रजीच्या मानाने मराठी दैनिकांत पगार खूप कमी असतो. पहा, तिकडे नोकरी मिळाली तर तुझे भलेच होईल," असे त्यांनी सांगितले. प्रकाश कणबर्गी हे 'नवप्रभा'च्या त्या उपसंपादकाचे नाव होते असे नंतर कळले. .
मी समोरच्या दालनात प्रवेश करुन तिथल्या बाजूच्या छोट्याशा केबिनमध्ये जाऊन नोकरीविषयी चौकशी केली. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकांचे वृत्तसंपादक असलेल्या एम. एम. मुदलियार यांनी मला खुर्चीवर बसायला सांगून माझी जुजबी चौकशी केली आणि नोकरी मिळणे शक्य आहे असे सांगितले. आणि त्या दिवसांपासून माझ्या नवहिंद टाइम्समध्ये फेऱ्या होऊ लागल्या. खरे पाहिले तर कुठलीतरी नोकरी मिळविण्यासाठी वृत्तपत्राच्या ऑफिसात मी जाईपर्यंत मला स्वतःलाही बातमीदारी वा पत्रकारिता काय असते हे माहित नव्हते. तोपर्यंत गोव्यात कुठल्याही कॉलेजात वा संस्थेत पत्रकारिता हा विषय शिकविला जात नसे.
गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक असलेल्या नवहिंद टाइम्सचे संपादक म्हणून बिक्रम व्होरा आणि वृत्तसंपादक म्हणून मुदलियार यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतली होती. त्यावेळेपर्यंत नवहिंद टाइम्समध्ये बातमीदारांची संख्या दोनच्या वर कधीही गेली नव्हती. सद्याच्या दोन्ही बातमीदारांनी वयाची चाळीशी पार करुन पंधरावीस वर्षे बातमीदारी केली होती. गोमंतक या सर्वाधिक खपाच्या मराठी दैनिकातही अशीच स्थिती होती. पंचवीस वर्षे जुने असलेल्या नवहिंद टाइम्समध्ये बातमीदारांची संख्या कायम दोनपर्यंत मर्यादित असल्याने गेली कित्येक वर्षे कुणाही नव्या, तरुण बातमीदाराला तेथे नोकरी मिळाली नव्हती. नव्यानेच त्या दैनिकाची सूत्रे घेणाऱ्या या दोघांनाही साहजिकच नवी आणि आपल्या पसंतीची माणसे दैनिकात आणायची होती.
त्यापैकी संपादक व्होरा हे अवघे अठ्ठावीस वर्षांचे असल्याने वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाचे काम कसे चालते याविषयी तसे अननुभवी आणि अनभिज्ञ होते तर पंचेचाळीस वर्षांचे मुदलियार याबाबतीत चांगले मुरलेले होते. त्यामुळे एकदोन महिने त्यांनी मला नवहिंद टाइम्समध्ये संपादकीय पानावर असलेल्या मिडल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सदरात खुसखुशीत शैलीत वा थोडक्यात मार्मिक स्वरुपाचे १०० शब्दांत लिखाण करावयास सांगितले. असे तीनचार लेख माझ्या नावानिशी प्रसिद्ध झाले आणि मला थोडेफार ओळखणाऱ्या लोकांनाही धक्काच बसला. अर्थात या सर्व लेखांवर स्पेलिंग आणि व्याकरणाबाबत मुदलियार साहेबांचे संपादकीय संस्कार असायचेच.
नोकरी मागण्यासाठी मी मुदलियार यांच्याकडे तगादा लावत होतोच. एकदा मी असाच मुदलियार साहेबांच्या केबिनमध्ये बसलो होतो तॆव्हा विद्यार्थी युनियनचा एक नेता एक तक्रार घेऊन तेथे आला होता. रायबंदर येथील शाळेत प्राचार्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारले होते. विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा देऊ नये या नियमाचा हा भंग आहे, असे त्या विद्यार्थी नेत्याचे म्हणणे होते. नवहिंद टाइम्सचे संपादक बिक्रम व्होरा यांनी लगेच मला त्या शाळेत पाठवले आणि प्राचार्यांशी बोलून बातमी लिहिण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशीच्या नवहिंद टाइम्समध्ये ती बातमी प्रसिद्ध झाली.
त्यादिवशी पुन्हा मी मुदलियार साहेबांना भेटून नोकरीचे विचारले. ''तुला कामावर घेण्यास आले आहे. कालपासूनच !'' त्यांनी सांगितले. सन १९८१ च्या ऑगस्ट महिन्याची ही घटना. नवहिंद टाइम्स या वृत्तपत्रातली माझ्या नोकरीची आणि इंग्रजी पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकीदीची आता सुरुवात झाली होती. शाळेची ती बातमी हा या कारकिर्दीचा श्रीगणेशा होता.
त्यानंतर कॅम्पस रिपोर्टींगसाठी एकदा मडगावला मी आलो असता हा प्रसंग घडला.
"अग्गो ऐक, हयो कित्ये सांगता ऐक ! ह्यो सांगताय तो प्रिन्सिपल सरांची इंटरव्हिव्यू घेऊंक हांगा आयला !"
एव्हढे बोलून त्या कॉलेजच्या काऊंटरवर असलेली ती क्लार्क मुलगी जोरजोराने हसू लागली . तिच्या आजुबाजूला असलेले पुरुष आणि महिला कर्मचारी माझ्याकडे अविश्वासाने रोखून पाहत राहिले. त्या क्लार्क मुलीने त्यांना पुन्हा एकदा माझे काम काय आहे हे सांगितल्यावर मग तिथे सामुदायिक हास्यकल्लोळ झाला.
नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना कॅम्पस रिपोर्टर ही बीट मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मी दामोदर कॉमर्सला कॉलेजला भेट देत होतो. तेथे आल्यानंतर काऊंटरला अशा हास्यकल्लोळाच्या सलामीच्या तोफेने माझे स्वागत होत होते.
त्यांच्या त्या झुंडीच्या हंशाने माझ्यावर काही एक परीणाम झाला नव्हता. त्यामुळे कदाचित त्या क्लार्कने आपले हसणे लगेच आवरते घेतले. मात्र कॉलेजच्या काऊंटरवरील त्या प्रतिसादाबद्दल त्या कर्मचाऱ्यांना दोष देण्यास अर्थ नव्हता. नवहिंद टाइम्सचा बातमीदार म्हणून मी रुजू झालो तेव्हा माझा बीएचा निकालही लागला नव्हता. माझ्या त्या पोरसवदा वयामुळे मी कॉलेजचाच एक विद्यार्थी असेल अशी त्यांची समजूत झाली होती.
मी अगदी ठामपणे काउंटरसमोर उभा राहिल्याने माझी अधिक चौकशी करणे तिला भागच होते. "प्लिज टेल दि प्रिंसिपल अ रिपोर्टर वान्ट्स टू मिट हिम." असे म्हणत मी माझे व्हिजिटिंग कार्ड तिला दिले. ते कार्ड घेऊन ती प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये गेली आणि काही सेकंदांत ती बाहेर आली तेव्हा तिने केबिनचे दार माझ्यासाठी हाताने अर्धवट उघडे ठेवले होते. तिच्या हाताच्या इशाऱ्यानुसार मी केबिनमध्ये शिरलो तेव्हा माझ्यामागे केबिनमधले सर्वजण श्वास रोखून माझ्याकडे पाहत होते याची मला जाणीव होती.
प्रिंसिपलशी हस्तांदोलन झाल्यानंतर मी माझ्या येण्याचा उद्देश सांगितला. त्यावर जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज पडली नाही. याचे कारण म्हणजे दर सोमवारी नवहिंद टाइम्समध्ये 'कॅम्पस नोट्स' या नावाने माझ्या बायलाईनसह प्रसिद्ध होणारे सदर ते वाचत होते. ऐंशीच्या दशकात दि नवहिंद टाइम्स हे गोव्यातील एकमेव इंग्रजी आणि त्यामुळे सर्वाधिक खपाचे दैनिक होते. दूरदर्शनच्या मक्तेदारीच्या काळात या एकमेव चॅनेलच्या सर्वच मालिकांतील अभिनेते प्रसिद्ध असत, तसाच प्रकार नवहिंद टाइम्सच्या बातमीदाराच्या बायलाईनचाही होता.
प्रिन्सिपलने टेबलावरची बेल वाजवल्यावर थोड्याच वेळात केबिनमध्ये चहाचे कप आले.
प्रिंसिपलची मुलाखत आटपून मी केबिनबाहेर पडलो तेव्हा ऑफिसातील सगळे जण माझ्याकडे थक्क होऊन पाहत होते. माझ्या चेहेऱ्यावर मात्र विजयाचे भाव अजिबात नव्हते. शिवाय बातमीदार हा काय प्राणी असतो हे बहुधा त्यापैकी अनेक जण पहिल्यांदाच पाहत होते. रिपोर्टर म्हणून असे अनुभव मला नेहेमी येत होते.
एकदा आमच्या धेम्पे कॉलेजात कुठलासा कार्यक्रम होता तेव्हा कडक शिस्तीच्या प्रिंसिपल वि. एन नाडकर्णी यांनी सभागृहात मान्यवरांबरोबर बातमीदार म्हणून मलाही पहिल्या रांगेत बसवले होते. आपल्या स्वागताच्या भाषणात अगदी अभिमानाने आणि कौतुकाने त्यांनी माझा नावानिशी उल्लेख केला होता ! अशा कौतुकाच्या वातावरणातही खुश होण्याऐवजी मला एकदम अवघडल्यासारखे, धडकी भरल्यासारखे झाले होते. याचे कारण म्हणजे त्यावेळी व्यासपीठावर असलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये धेम्पे आर्ट कॉलेज आणि डेम्पो कॉमर्स कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष म्हणजे मालक असलेले प्रसिद्ध खाणउद्योगपती वसंतराव धेम्पे हे आमच्या नवहिंद टाइम्स आणि नवप्रभा दैनिकांचेही मालक होते !
गोमंतकात पाऊल ठेवण्याआधी इंग्रजी भाषेचा गंधही नसताना चार वर्षांतच ही भाषा शिकून मी इंग्रजी दैनिकातील बातमीदार बनलो होतो. आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल नाडकर्णी, महाविद्यालयातील बहुतेक सर्व शिक्षकांनी आणि माझ्याबरोबरच्या विद्यार्थ्यांनी माझा इंग्रजी भाषेचा हा प्रवास जवळून पहिला होता. गोव्यात इंग्रजी शाळांत शिकलेले माझे मित्र आणि इतर सहाध्यायी इंग्रजी बोलण्यात आणि लिहिण्यात माझ्यापॆक्षा कितीतरी उजवे होते. तरीही महाराष्ट्रातील ग्रामीण परिसरातून आणि मराठी माध्यमातील मला इंग्रजी दैनिकातील पुर्णवेळ नोकरी मिळावी आणि मी ही जबाबदारी बऱ्यापैकी सांभाळावी याचे त्या सर्वांना कौतुकास्पद आश्चर्य वाटायचे.
नवहिंद टाइम्समध्ये नऊ वर्षांच्या नोकरीत मी क्राईम-कोर्ट, लष्कर, शिक्षण, जनरल, गोवा मेडीकल कॉलेज अशा अनेक बीट्स सांभाळल्या. त्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तींत आणि सकाळ माध्यमाच्या महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ टाइम्समध्ये सोळा वर्षे अशी इंग्रजी भाषेतील पत्रकारितेची चाळीस वर्षांची कारकीर्द केली. तीन महिन्यांपूर्वी कोरोना -१९ मुळे या कारकिर्दीची म्हणजे मासिक पगारी नोकरीची तशी ध्यानीमनी नसताना अचानक सांगता झाली. यापुढे फक्त मुक्त पत्रकारिता. आता मागे वळून पाहताना थोडेफार चढउतार होऊनही हा प्रवास शक्य झाला याचा मलाही अचंबामिश्रीत आनंद वाटतो.
Comments
Post a Comment