पणजी-म्हापशाचं ‘लॉकडाऊन’ झालं, गोव्यातला मांडवी पूल कोसळला तेव्हा Collapse of Mandovi bridge
मांडवी पुलाची संग्रहित छायाचित्रं पणजी-म्हापशाचं ‘लॉकडाऊन’ झालं, गोव्यातला मांडवी पूल कोसळला तेव्हा… पडघम - माध्यमनामा कामिल पारखे त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी ताळेगावहून पणजीला जाणाऱ्या बसमध्ये बसलो होतो. त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात सांत इनेज- ताळेगाव- करंझले- मिरामार -पणजी अशा मार्गे बस जात असे. ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून मी साधारणतः सकाळी साडेनऊला पणजीतल्या सचिवालयातल्या प्रेस रूममध्ये जात असे. त्या दिवशी आम्ही काही प्रवासी त्या खासगी बसमध्ये चढलो आणि कंडक्टरने ती धक्कादायक घोषणा केली - “सोगळे ध्यान द्या हांव कित्ये सांगता त्ये. पोणजिचो मांडवीचो पूल मोडलोय. म्हापश्याचे अन नॉर्थ गोयांक आता सोगळी बस बंद असात.” बहुतेक प्रत्येक बस स्टॉपवर तो ती घोषणा करता असावा. कंडक्टर काय सांगत होता त्याचा मला अर्थ स्पष्ट होण्यास काही क्षण जावे लागले. इतकी ती धक्कादायक आणि भयानक घटना होती. पणजी शहर हे मुंबईसारखेच एक बेट आहे, अनेक बाजूंनी पाण्याने घेरलेले. म्हणजे एका बाजूने मांडवी नदीने, दुसऱ्या बाजूने झुआरी नदीने आणि बाकी अरबी समुद्राच्या पाण्याने घेरले...