पराग रबडे

Bishop Valerian De Souza at our wedding, Parag Rabade is behind 
सॊमवारी संध्याकाळी व्हाट्सअप ग्रुपवर ती श्रद्धांजली पाहिली अन तेव्हापासून पुण्यातील अनेक पत्रकारांचे मला फोन येत राहिले कामिल, पराग रबडेचे कळले ना तुला..''
परागचे हार्ट अटॅकने निधन झाले, अवघे त्रेपन्न वय असलेल्या आणि फिटनेसबाबत जागरुक असलेल्या परागची ती बातमी ऐकून धक्का बसणे साहजिकच होते. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस परागबरोबर मी पुणे श्रमिक पत्रकार संघात खूप सक्रीय होतो. त्याकाळात सकाळ, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, केसरी, प्रभात, महाराष्ट्र हेराल्ड आणि टाइम्स ऑफ इंडियात काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये आमची जोडगोळी खूपच फेमस झाली होती. त्यामुळे ही धक्कादायक बातमी ऐकताच या पत्रकारांचे मला फोन येणे साहजिकच होते.
सन १९८९च्या सुमारास पराग रबडे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियात बातमीदार म्हणून रुजू झाला त्याच सुमारास मी पणजी - गोवा सोडून लोकमत टाइम्स औरंगाबाद मार्गे पुण्यात इंडियन एक्सप्रेसला जॉईन झालो होतो. पुणे श्रमिक पत्रकार संघात आम्ही दोघांनीही निवडणुका लढविल्या आणि त्यानिमित्ताने पत्रकार संघात अगदी पहिल्यांदाच मतपेटीतून निवडणुका झाल्या. साखर कारखान्यांप्रमाणे पत्रकार संघात निवडणुका लादल्याबद्दल त्याकाळी आम्ही टीकेचे धनी बनलो होतो. त्यानंतर अगदी खंड न पडता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका मतपेटीतून होत असतात हे परागचे एक योगदानच.
सन १९९२ला परागने पुणे श्रमिक पत्रकार संघात ओरिएण्टल इंडिया इन्शुरन्सच्या माध्यमातून पत्रकारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयासांठी ग्रुप मेडिकल इन्शुरन्स योजना सुरू केली. या योजनेचे खास वैशिष्ठय म्हणजे योजनेत सहभागी पत्रकारांना बाळंतपणाचा दवाखान्यातील संपूर्ण खर्च मिळत असे. त्याकाळी आम्ही बहुतेक पत्रकार तरुण असल्याने त्यांची लग्ने झाल्यावर अनेकांना या योजनेचा फायदा मिळाला आणि इन्शुरन्स कंपनीचा तोटा झाला. त्यामुळे चार वर्षांतच बाळंतपणाचा खर्च या योजनेतून वगळण्यास आला !.
तीस वर्षांपूर्वी मेडिक्लेम योजनेसाठी पत्रकारांना प्रवूत्त करणे आणि त्यासाठी त्यांच्याकडून दरवर्षी अडिचशे रुपये प्रिमियम गोळा करणे अवघड होते,. सुदैवाने या योजनेचे महत्त्व लवकरच पत्रकारांना कळले आणि आजपर्यंत ही योजना पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे राबवली जात आहे. अलीकडेच पुणे पत्रकार संघाने एक स्मरणिका काढली त्यात परागच्या या योगदानाचा आवर्जून उल्लेख करण्यात आला होता.

अर्थात खुपदा वादग्रस्त मुद्दे मांडून आम्ही त्याकाळात पुणे पत्रकार संघात आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघात मोठे वादळ उठविले होते हे पण सांगायलाच हवे.
परागचे वडिल भास्करराव रबडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि सहकार भारती या संघटनेचे कार्यकर्ते. अप्पा बळवंत चौकाच्या एका तोंडास असलेल्या भाऊ महाराज बोळीतल्या परागच्या रबडे वाड्यात माझे नेहेमी येणेजाणे असायचे आणि त्यामुळे त्याच्या वडलांची आणि माझी चांगली गट्टी जमली होती हरी ॐ असे म्हणून ते नमस्कार करत, लॅण्डलाइनवर बोलतानाही त्यांची हिच ग्रीटिंग असायची. पराग आणि त्याचा थोरला भाऊ प्रसन्ना यांच्याबरोबरच मीही त्यांना बाबा म्हणून हाक मारायचो. येशूसंघीय धर्मगुरू म्हणजे फादर होण्यासाठी गेलेला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेल्या रबडे कुटुंबात कसे वावरतो याचे अनेकांना आश्चर्य वाटायचे.
डेक्कन जिमखान्यातल्या माझ्या मंथली बेसिस लॉजमधून सायकलने मी पहाटे पेठेतल्या परागच्या घरी जायचो, तेथून त्याच्या मोटारसायकलने पर्वती पायथ्यापाशी जाऊन मग आम्ही पर्वती टेकडी चढायचो. पीटीआयमधले काम संपल्यानंतर रात्री मॉडर्न कॉलेजच्या जिमखान्यात बॅडमिंटन कोर्टवर घाम घाळायचा त्यानंतर आमच्या गप्पा रंगायच्या. साहसी खेळ, ट्रेकिंग आणि लॉंग ड्राईव्ह हे परागचें शौक आणि नेमक्या याच गोष्टींचा मला तिटकारा. सडाफटिंग, ट्रेंड युनियनिस्ट म्हणून व्यस्त असलेल्या फकिरी वृत्तीच्या मला आयुष्यात पहिल्यांदाच लग्नाबाबत प्रपोझल आले तेव्हा पराग माझ्या पाठीशी उभा राहिला. पुणे स्टेशनजवळच्या ताडीवाला रोडवरील चर्चमध्ये माझे लग्न लागले तेव्हा थ्री-पीस सूट घालून नवरदेवाचा बेस्ट मॅन वा करवला म्हणूनही तो माझ्यामागे उभा राहिला ! चर्चमध्ये पाऊल ठेवण्याची त्याची ती पहिलीच वेळ.
माझ्या ' महाराष्ट्र चरित्रकोश इ स. १८०० ते इ.स. २००० ' या खंडाचे परागने स्वतःच सुनीती पब्लिकेशन्स या नावाने २००० साली प्रकाशन केले. या चरित्रकोशासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आर्थिक पाठबळ मिळवून दिले आणि महाराष्ट्र टाइम्सचे संपादक कुमार केतकर यांच्याशी बोलून त्यांच्या हस्ते या पुस्तकाचा मोठा प्रकाशन समारंभही घडवून आणला. अखेरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कट्टर समर्थक असलेल्या परागने माझ्या ख्रिस्ती मिशनरींचे योगदान हे पुस्तकही आपल्या सुनीती पब्लिकेशन्सतर्फे २००३ ला प्रकाशित केले.
आमच्या या कट्टर मैत्रीच्या या काळात वैचारीक तीव्र झगडे होण्यासाठी निम्मितेही खूप मिळाली. भाजप आणि कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर सरकार बनवलेल्या पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी राबवलेला मंडळ आयोग, भाजप नेते लाल कृष्ण अडवाणी यांची ती स्फोटक रथयात्रा आणि त्यादरम्यान आम्ही दोघांनीही कव्हर केलेली त्यांची पुण्यातली शनिवारवाड्यासमोरची सभा, देशभर पेटलेले आरक्षणविरोधी आंदोलन आणि नंतरचे बाबरी मशिद पडल्यानंतरचा तणाव असे अनेक विषय असायचे. याकाळात आम्ही भेटायचो तेव्हा वातावरण साहजिकच अगदी तापलेले असायचे. आमच्या वैचारिक भूमिका पराकोटीच्या विरूध्द असल्याने वाद आणि झगडे झाले तरी एकमेकांविरुद्ध कटुता कधी तयार झाली नाही हे विशेष. आजच्या काळात असे चित्र दिसत नसल्याने ही बाब मला आज प्रकर्षाने जाणवली.
परागची मुंबईत पीटीआयच्या ऑफिसात बदली झाली आणि त्यानंतर आमच्या दोघांचा संपर्क विरळ होत गेला. आणि सोमवारी रात्री ती बातमी समजली.

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction