अनुशासन पर्वाच्या आठवणी Discipline during the Emergency period



अनुशासन पर्वाच्या आठवणी
बुधवार, १३ जून, २०१८कामिल पारखे
आणीबाणीचा कालखंड देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट काळ समजला जातो. अर्थात शिस्तीचा कालखंड होता. मटके, खासगी सावकारी यांना चाप बसवणारा होता हेही लक्षात घेतले पाहिजे.
तो दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट समजला जातो. मात्र त्या दिवशी म्हणजे २६ जून १९७५ संपूर्ण दिवसभर देशभर काय घडामोडी होत होत्या याची सामान्य लोकांना काहीच कल्पना नव्हती. त्याकाळात दिवसभर जे काय घडायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रातून कळायचे. रेडिओ दिवसातून फारच कमी तास चालायचा आणि त्यातील बातम्या तर फारच कमी असायच्या. त्यावेळी मी नुकताच दहावी इयत्तेत प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जून १९७५ रोजी श्रीरामपुरात सकाळी मी माझ्या  वडिलांसह आमच्या दुकानावर पोहोचलो आणि तेथे मी वर्तमानपत्र वाचण्यास सुरू केले आणि मला धक्काच बसला. पेपरच्या बातम्यांत म्हटले होते की देशात आणीबाणी लागू करण्यात आली असून सर्व प्रमुख विरोधी राजकीय नेत्यांना म्हणजे जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी वगैरेंना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीच्या  आदेशावर २५ जूनला रात्री सही केल्यानंतर पोलिसांनी ऐन मध्यरात्री काही प्रमुख नेत्यांना अटक केली होती आणि अटकेचे हे सत्र दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ जूनला चालूच राहिले होते असे बातम्यांत म्हटले होते. विरोधी राजकीय नेत्यांना कुठे आणि कशा प्रकारे अटक करण्यात आली होती, कुठल्या तुरुंगात नेण्यात आले याचेही या बातमीत वर्णन होते. आणीबाणीचा पहिलाच दिवस असल्याने त्या बातम्यांत सेन्सारशिप नव्हती. 
त्यानंतरच्या काही दिवसांच्या वर्तमानपत्रांतील बातम्या मात्र वेगळ्याच स्वरूपाच्या होत्या. बातम्यांतील अनेक वाक्यांमधील काही शब्दांची जागा कोरी होती. अनेकदा काही वाक्येच्या वाक्ये गाळली होती. पॉकेट कार्टूनची जागाही कोरीच होती. आतल्या पानांतील अग्रलेखांच्या स्तंभाची जागाही कोरी होती. त्याकाळात मुद्रणासाठी खिळ्यांची अक्षरे वापरत असत. त्यामुळे बातम्या कंपोझ करण्यास खूप वेळ लागे. वृत्तपत्रात हजर असलेल्या सेन्सॉर अधिकाऱ्याने एखाद्या वाक्यास आक्षेप घेतल्यास ते वाक्य वगळावे लागे आणि छपाईची डेडलाईन पाळण्यासाठी तेथे पर्यायी शब्दरचना वा वाक्यरचना करण्याऐवजी कोरी जागा वा रकाने ठेवणे भाग असे. मात्र काही गाळलेले शब्द, वाक्ये आणि कोरी ठेवण्याचे कारण काय असावे यासंबंधी तर्क करणे रोज वर्तमानपत्रे वाचणाऱ्या वाचकांस अवघड नव्हते. काही वृत्तपत्रे आणीबाणीस प्रतिकात्मक पद्धतीने विरोध करण्यासाटी मुद्दाम या जागा कोऱ्या ठेवता असत. ही बाब सेन्सार अधिकाऱ्यांच्याही लक्षात आली आणि मग वृत्तपत्रातील कोणताही रकाना, स्तंभ रिकामा ठेवण्यास वा वाक्यांतील शब्द गाळण्यात मनाई करण्यात आली. वृत्तपत्रे पुन्हा पहिल्यासारखी प्रसिद्ध होऊ लागली होती. मात्र ती गेल्या काही महिन्यांसारखी वाचनीय नव्हती हे मात्र खरे होते.
आणीबाणीनंतर पहिले काही दिवस वा आठवडे अस्वस्थ वातावरण जाणवत होते. आमच्या शाळेतील मराठी छान प्रकारे शिकवणाऱ्या एका विद्यार्थीप्रिय शिक्षकास अटक झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते असे नंतर कळले. सुरुवातीच्या काही क्षीण स्वरूपाच्या विरोधानंतर सर्वकाही शांत होत गेले.  हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. लोक आपापल्या कामधंद्याकडे म्हणजे  पोटापाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ लागले. वृत्तपत्रांतून राजकीय स्वरूपाच्या बातम्या पूर्णतः नाहीशा झाल्या होत्या. 
पण आणीबाणीमुळे दुसरेही काही लक्षणीय बदल घडले  होते  आणि हे बदल निश्चितच सामान्यजनांच्या जीवनाशी निगडित होते. सन १९७५ पर्यंत देशात किंवा निदान महाराष्ट्रात तरी मटका बाजार या नावाने समांतर अर्थव्यवस्था चालू होती. मटका किंग या नावाने ओळखले जाणारे  रतन खत्री मुंबईतून मटका बाजार चालवत असे आणि त्यातून रोज कैक कोटी रुपयांची उलाढाल होत असे. शहराशहरांत आणि गावोगावी छोट्याशा टपऱ्यात दिवसभर बुकीज लोंकाकडून मटक्यांचे आकडे म्हणजे बेटिंग्ज घेत असत आणि दिवसातून दोनदा मटक्यांचे एक आकडी आणि दोन आकडी संख्या खुली होत असे. अनेक प्रतिष्ठित गणली जाणारी मराठी वृत्तपत्रे मटका बाजाराचे निकाल 'मुंबई कल्याण' किंवा 'सोने चांदी' अशा सांकेतिक शब्दांनी पहिल्या पानावर प्रसिद्ध करत. कष्टकरी गरीब लोक या मटका बाजाराचे शिकार होत असत. रोजंदारीवर काम करून मिळालेला पैसा अनेक जण रातोरात गब्बर होण्याच्या आशेवर मटक्यावर खर्च करत असत. एक्का, दुर्री, तिर्री, डबल पंजा  वगैरे शब्द त्याकाळात सर्रासपणे कानावर पडत असत. बहुतेक गरीब, कष्टकरी  लोक तीन, पाच किंवा दहा पैसे दररोज मटक्यावर लावत असत.  
मटका बाजाराचे एका वैशिष्ट्य म्हणजे फसवणूक हा प्रकार नावालाही  नसायचा. एखाद्याने अमुक पैसे लावल्यानंतर त्याच्याकडे छोट्याशा कागदावर त्या आकड्याची पावती असे. दुसऱ्या दिवशी  तो कागद दाखवून त्याला त्या आकड्यावर लागलेली रक्कम ताबडतोब मिळत असे. आमच्या दुकानास लागून बुकिंग्जकडून मिळालेले आकडे आणि रक्कम घेणारी एका पेढी होती. रात्री नऊच्या दरम्यान आकडे घेणे बंद होऊन मग हे पेढीवाले जिल्हा पातळीवरील वा त्यावरच्या पेढीवाल्यांशी फोनवर  संपर्क साधण्यात बिझी होत असत. त्यामुळे या काळात टेलिफोनच्या लॅण्डलाइनची  सर्व कनेक्शन्स केवळ मटका बाजारास उपलब्ध असत. सामान्य लोकांना त्या काळात फोनच्या लाइन्स बिझी टोनच्या लागत असत.  या समांतर अर्थव्यवस्थेचा सर्व नफा एकटया रतन खत्रीच्या खिशात जात असे.  आणीबाणीत रतन खत्रीला अटक झाली आणि मटका बाजार रातोरात बंद झाला. मटका बाजारावरच्या  बंदीचा सामान्य जनतेच्या जीवनावर थेट परिणाम झाला होता. मटक्यामुळे लाखो गरीब कुटुंबे  उद्धस्त होत होती, त्यांना हा फार मोठा दिलासा होता. 
श्रीरामपूरात आमचे टेलरिंगचे दुकान मुख्य रस्त्यावर सोनार लेनमध्ये होते. त्याकाळी तेथील बहुतेक सर्व सोनार लोक सावकारीचाही धंदा करत असत. आणीबाणी लागू झाल्यानंतर काही दिवसातच या गल्लीतील वर्दळ वाढली. येथील सोनारांच्या  दुकानात येऊन अनेक लोक, कुटुंबातील पुरुष, बायका आणि मुले त्यांनी तेथे गहाण ठेवलेली सोन्या-चांदीची दागिने, पाणी तापवण्याचा बंब, पाण्याचे घंगाळ, हंडी वगैरे पितळाची आणि तांब्याची भांडीकुंडी आपापल्या घरी घेऊन जाऊ लागले. आणीबाणीत  पंतप्रधान इंदिराबाईंनी खासगी सावकारीवर बंदी घातली होती आणि त्यामुळे कुणीही या सावकाराकडे येऊन गहाणखतात ठरलेली रक्कमेतील एक पैसुद्धा न देता आपली गहाण ठेवलेली दागदागिने आणि भांडीकुंडी परत नेऊ शकत होते. ही  माहिती देशातील खेड्यापाड्यातील गरीब लोकांपर्यंत  कर्णोपकर्णी पोहोचली तशी या सावकारांकडे गहाण ठेवलेली आपले  दागदागिने, भांडीकुंडी वगैरे सोडवून घेण्यासाठी हे लोक झुंडीने येत होते. ठरलेले व्याज वसूल न करता गहाण ठेवलेल्या वस्तू  सावकार मुकाटपणे या लोकांना परत करत होते. तसा नकार देण्याची कुणाही सावकाराची हिंमतच नव्हती. आणीबाणी काळाचा हाच तर महिमा होता. एखादा सावकार गहाण वस्तू परत करत नाही अशी कुणी पोलिसांकडे तक्रार केली असती तर त्या सावकाराची ताबडतोब तुरुंग कोठडीत रवानगी झाली असती. समाजाच्या अगदी खालच्या तळागाळातील लोकांना आणीबाणी लागू झाल्यानंतर असा थेट फायदा झाला होता.
आणीबाणी लागू केल्यानंतर सामान्य माणसाला दिलासा देणारी आणखी एक बाब होती. सरकारी ऑफिसात सर्वसामान्य लोकांची कामे कसल्याही प्रकारची लाच न  देता तत्परतेने होऊ लागली. लाच मागण्याची कुणा अधिकाऱ्याची वा कर्मचाऱ्याची हिम्मत होत नसे. मात्र जनतेची कामेही तत्परतेने होत असत. दिल्लीत नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमध्ये मुख्य सचिवापासून सर्व सरकारी कर्मचारी सकाळी वेळेवर कार्यालयात  येऊ लागले आणि शिस्तबद्ध पद्धतीने कामे करू लागले. संपूर्ण देशभर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत असेच चित्र दिसू लागले. 
आणीबाणीच्या काळात नवी दिल्लीत उद्योग खात्यात पोस्टिंगवर असलेले आणि नंतर मोठया पदावरून निवृत्त झालेले एका अधिकारी काही दिवसांपूर्वी आपले अनुभव मला सांगत होते. आणीबाणी लागू झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी दिल्लीतील नॉर्थ  आणि साऊथ ब्लॉकमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वक्तशीरपणे म्हणजे सकाळी नऊ वाजता कार्यालयात हजर व्हावे असा एक आदेश काढण्यात आला होता. या आदेशाकडे बहुतेक सर्वच  अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच  केले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी याबाबत चौकशी केली असता त्यांना ही माहिती कळली. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊनंतर नॉर्थ  आणि साऊथ ब्लॉकची प्रमुख दरवाजे बंद करण्यात यावे, असा एक आदेश त्वरित काढण्यात आला. (त्याकाळात पंतप्रधान कार्यालय किंवा प्राईम मिनिस्टर्स ऑफिस किंवा पीएमओ अस्तित्वात नव्हते).  या आदेशाची ताबडतोब कार्यवाही करण्यात एक अडचण होती. नॉर्थ  आणि साऊथ ब्लॉकचे प्रमुख दरवाजे गेली कित्येक वर्षे कधीही पूर्णतः बंद केले जात नसल्याने ते गंजले होते आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ते बंद करणे अशक्य होते. त्यावर आदेश आला की कुठल्याही परिस्थितीत ही  प्रमुख दरवाजे सकाळी नऊनंतर बंद झालीच पाहिजे. यानंतर रात्रभर काम करून अखेरीस हे दरवाजे बंद आणि खुले होतील यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली. 
दुसऱ्या दिवशी नॉर्थ  आणि साऊथ ब्लॉकचे सर्व प्रमुख दरवाजे सकाळी नऊनंतर बंद झाले आणि त्यानंतर येणाऱ्या  विविध खात्यांच्या मुख्य सचिवांच्या, सचिवांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या गाडया गेटबाहेरच रोखण्यात आल्या. देशाच्या इतिहासात प्रथमच त्या दिवशी अनेक मुख्य सचिव आणि सचिवांच्या नावावर 'उशिरा आल्याचा' शेरा नोंदविला गेला. त्यानंतर मात्र सर्व अधिकारी आणि इतर कर्मचारीवर्ग  वेळेवर कार्यालयात येऊ लागला.    
आणीबाणीत मुंबईत पुन्हा एकदा सर्व लोकल्स आणि इतर रेल्वेगाड्या वेळेवर धावू लागल्या. हे सर्व शिस्तीने आणि नियमानुसार होत असे, याचे कारण म्हणजे सर्वांनी नियमांनुसार वागावे यासाठी सर्वच अधिकारी पाठपुरावा करत असत. त्यांनी तसे न केल्यास त्यांच्याविरुद्ध ताबडतोब कारवाई केली जात असे. कायद्याची अमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांची  समाजकंटक, गुंड लोकांत जरब बसली होती. सामान्य जनतेच्या दृष्टीने हे नक्कीच आश्वासक असे चित्र होते. आणीबाणीच्या काळास  आचार्य विनोबा भावे यांनी 'अनुशासन पर्व' असे संबोधले होते. त्यामागे वरील सकारात्मक परिस्थितीची पार्श्वभूमी होती. मात्र त्यावेळेस 'सरकारी संत' म्हणून त्यांची संभावना करण्यात आली होती.       
काही महिन्यानंतर म्हणजे १९७७ सालच्या जानेवारीत पंतप्रधान इंदिरा गांधींनीं आणीबाणी शिथिल केली. बहुतांश विरोधी पक्षनेत्यांची तुरुंगातून सुटका केली आणि सार्वत्रिक निवडणुकाही जाहीर केल्या. आणीबाणी काळात विचारस्वातंत्र्य आणि लोकशाहीतील अनेक मूलभूत हक्कांचा संकोच झाला होता. सन १९७७ सालच्या निवडणुका 'भाकर की स्वातंत्र्य' या मुद्दयावर लढवल्या केल्या. निवडणूक प्रचाराचा तो दोन महिन्यांचा तो काळ अगदी भारवल्यासारखाच होता. भारताच्या उत्तर आणि मध्य भागांत काँग्रेसविरुद्ध वातावरण तापले होते. त्यावेळी कराडला मी अकरावीत शिकत असताना केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या चौकाचौकात होणाऱ्या निवडणूक सभांना उपस्थित होतो. त्यावेळी सातारा येथे झालेल्या लोकसभा  निवडणूक मतमोजणीस सज्ञान आणि मतदार नसूनही जनता पक्षाच्या (शेतकरी कामगार पक्षाच्या) उमेदवाराचा पोलिंग एजंट म्हणून मी काम केले. कराडमधून प्रेमलाकाकी चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री) तर साताऱ्यातून यशवंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार होते. रात्री दोन वाजता पंतप्रधान इंदिरा गांधींचा रायबरेली मतदारसंघात पराभव झाल्याची बातमी समजली तेव्हा मतमोजणीच्या त्या मंडपात झालेला जल्लोष अजूनही माझ्या कानावर आहे. या निवडणुकीत जनता पार्टीचा निवडणुकीत विजय झाला. सत्तेतून पायउतार होण्याआधी पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्वतःच आणीबाणी पूर्णतः उठवली आणि याबाबतचे श्रेय नव्या सरकारला मिळू दिले नाही.
खरे पाहिले तर आणीबाणी शिथिल झाली तेव्हापासूनच पुन्हा सर्व काही पूर्वपदावर येण्यास हळूहळू सुरुवात झाली होती. सरकारी कार्यालयात नोकरशाहीने पुन्हा एकदा आपले सार्वभौमत्व प्रस्थपित केले होते. सरकारी कार्यालयीन वक्तशीरता, शिस्त, नियम पाळणे, लोकांची आणि इतर कामे तत्परतेने करणे वगैरे बाबी पुन्हा एकदा अपवादानेच दिसू लागल्या. दिल्लीपासून गल्लीपर्यंत नोकरशाही कुणासही जुमानेनाशी झाली. भ्रष्ट्राचार पुन्हा उघडपणे सुरू झाला. मर्यादित स्वरूपात का होईना पण मटका आणि बेटिंगही नव्या स्वरूपात सुरू झाले. कायदयाची अमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि इतर यंत्रणांची जरब समाजकंटकांमध्ये राहिली नाही. रेल्वे, विमाने, आणि इतर सरकारी प्रवासी वाहतुकीची कार्यक्षमता,  वक्तशीरता आणि नियमितता याकडे कुणी लक्ष देईनासे झाले. पण याबाबत कोण आणि कुणाकडे तक्रार करणार?  देशाने एका नव्या पर्वात प्रवेश केला होता. हुकूमशाही संपली होती आणि आणीबाणीच्या काळात गमावलेले स्वातंत्र्य देशाने पुन्हा एकदा मिळवले होते. प्रत्येक देशाला तेथील जनतेच्या लायकीचे आणि पात्रतेचे सरकार मिळते असे म्हटले जाते  ते खरेच आहे. त्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत या परिस्थितीत बदल झालेला दिसत नाही.

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

A day at Mother Teresa’s Home for Destitutes