
Sorpotel गोव्यात पणजीला हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेताना आमच्या हॉस्टेलात ही प्रथा होती. दरदिवशी आमच्या हॉस्टेलात किचनमध्ये भरपूर ओला आणि सुका कचरा निर्माण होई तो सिंकच्या खाली असलेल्या एका मोठ्या डब्यात जमा होई. दररोज रात्री नवाच्या आसपास आमची जेवणे उरकल्यावर शेजारच्या एका घरातली लोक हा गच्च भरलेला डबा नेत आणि त्याजागी दुसऱ्या दिवसासाठी मोकळा डबा ठेवत. या डब्यात रोज गोळा होणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळांच्या आणि इतर साली, उरलेला भात, पाव वगैरे अन्नधान्य तो शेजारी आपल्या पिगरीत असलेल्या डुकरांना खाऊ घालत असे. पिगरी म्हणजे डुकरे पोसतात ती जागा. त्याकाळी गोव्यात सगळीकडे डुकरे दिसायची. गोवा आणि डुकरे एक अविभाज्य संबंध होता. मारिओ मिरांडा यांचे गोव्यासंबंधीचे कुठलेही व्यंगचित्र शेपूट वळवळणारे डुक्कर दाखविल्याशिवाय पूर्ण होत नाही, त्याचे हे कारण. घरांघरांतून असे भरपूर उरलेले अन्नधान्य वगैरे खाद्यपदार्थ डुकरांसाठी रोज मिळत असे. यात अर्थात कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण नसायची. अपवाद एकच. वर्षांतून दोनदा म्हणजे डिसेंबरात ख्रिसमसला आणि मार्च-एप्रिलमध्ये ईस्टर फेस्...