
महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात. त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते. समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी म...