
कॉम्रेड एस. वाय. कोल्हटकर. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची नागपूर तुरुंगात रवानगी करण्यात आली तेव्हाची ही गोष्ट. विनोबा आणि स्वातंत्र्यसंग्रामातील इतर काँग्रेसची मंडळी त्यावेळी तुरुंगात दररोज सामूहिक प्रार्थना आणि प्रवचने आयोजित करीत. तुरुंगातील सर्वच कैदी या प्रार्थना प्रवचनांस उपस्थित असत. अपवाद केवळ एका तरुण राजकीय कैद्याचा. कम्युनिस्ट चळवळीतील हा तरुण या प्रार्थना-प्रवचनांकडे कधी चुकूनही फिरकत नसे. ही बाब तुरुंगातील सर्व कैद्यांच्या, इतकेच नव्हे तर खुद्द विनोबांच्याही लक्षात आली होती. आणि एके दिवशी खुद्द विनोबाच या कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या कोठडीत आले. त्यांच्या त्या तुरुंगवासाच्या सजेचा तो शेवटचा दिवस होता. विनोबांनी त्या कोठडीत एक नजर फिरविली. त्या तरुणाच्या टेबलावर मार्क्सवादी विचारसरणीची अनेक पुस्तके ओळीने रचून ठेवलेली होती. त्यापैकी एक पुस्तक विनोबांनी कुतुहलाने उचलले व त्यातील पाने ते चाळू लागले; पण त्या पुस्तकातील अक्षरे छोटया टाईपातील असल्याने ती वाचणे विनोबांना जमेना. " मार...