महात्मा गांधींचा मानसपुत्र – मार्टिन ल्युथर किंग







महात्मा गांधींचा मानसपुत्र – मार्टिन ल्युथर किंग


ग्रंथनामा - आगामी                    
कामिल पारखे                                                            goo.gl/KSfTht  
  • ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 14 December 2018
  • ग्रंथनामाGranthnamaआगामीबाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंगBabasaheb Ambedkar ani Dr. Martin Luther Kingकामिल पारखेKaamil Parkhe
ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांचं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ हे पुस्तक लवकरच सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
“माझं एक सुंदर स्वप्न आहे की, आता छोटी असलेली माझी चार मुलं एक दिवस अशा राष्ट्रात राहतील, जिथं त्यांच्या गुणांची पारख केवळ त्यांच्या कातडीच्या रंगावरून केली जाणार नाही. त्यांच्या गुणांची पारख त्यांच्या वर्तनावरून आणि स्वभाव वैशिष्ट्यांवरूनच केली जाईल.” वॉशिंग्टनच्या मेळाव्यात आपल्या भाषणात मार्टिन ल्युथर किंग यांनी म्हटलेलं हे वाक्य त्यांच्या जीवनाचं सार होतं. अहिंसात्मक मार्गानं अमेरिकेतील वर्णभेदाविरुद्ध लढणाऱ्या किंग यांचं भारताशी एक वेगळ्याच कारणानं भावनिक नातेसंबंध जुळले होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचं आमंत्रण स्वीकारून किंग आपल्या पत्नीसह १९५९ साली भारतभेटीवर आले होते. या दौऱ्यामुळे त्यांचा अहिंसेच्या तत्त्वावरचा विश्वास अधिकच बळकट झाला.
आपल्या आंदोलनाला हिंसेचं गालबोट कधीही लागू नये याबाबत महात्मा गांधी सदैव दक्ष असत. हिंसाचार रोखण्यासाठी ते शिगेला पोहोचलेलं आंदोलनही मागे घेण्यास तयार असत. रेव्हरंड किंग यांचं याबाबतीत महात्मा गांधींशी खूपच साम्य होतं. अमेरिकेत वंचित असलेल्या कृष्णवर्णीय समाजाचे लढे चालवत असताना पोलिसांच्या दडपशाहीमुळे वा प्रशासनाच्या नकारात्मक धोरणामुळे चळवळीतील काही कार्यकर्ते हिंसाचार करण्यास प्रवृत्त होत. अशा वेळी अहिंसात्मक चळवळीबाबत रेव्ह. किंग अगदी ठाम असत. कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्कांच्या दीर्घकालीन लढ्यात अनेक व्यक्तींना गोळीबारात प्राण गमवावे लागले, जाळपोळीत किंवा बॉम्बहल्ल्यात आपल्या नातलगांना किंवा मालमत्तेला मुकावं लागलं. अशा वेळी हिंसाचार टाळण्यापासून आपल्याच अनुयायांना किंवा जमावाला रोखणं अतिशय कठीण असतं, याचा किंग यांनी अनेकदा अनुभव घेतला. मात्र येशू ख्रिस्ताचे अनुयायी असलेल्या किंग यांनी हिंसाचारी चळवळीचं नेतृत्व आपण कधीही करणार नाही, अशी प्रतिज्ञाच केली होती.
‘बुकर टी वॉशिंग्टन नंतर निग्रो समाजाचा सर्वांत मोठा नेता मार्टिन ल्युथर किंग आहेत’ असं नरहर  कुरुंदकर यांनी म्हटलं आहे. मार्टिन ल्युथर किंग हा अन्यायाविरुद्ध लढणारा नेता आहे. जनता जागृत करणं, ती संघटित करणं आणि ही जागृत व संघटित जनता अन्यायाविरुद्धच्या लढ्यात शस्त्राप्रमाणे वापरणं ही किंगची वैशिष्ट्यं आहेत. किंग हा अन्यायाला शरण जाणारा नाही. तो अन्यायाविरुद्ध लढण्यास उभा राहिलेला संघर्षशील नेता आहे. पण किंग हा अतिशय धार्मिक, आध्यात्मिक श्रद्धा असणारा आणि अहिंसावादी असाही नेता आहे. किंग हा अमेरिकेत महात्मा गांधीचा मानसपुत्र आहे, असं कुरुंदकर यांनी म्हटलं आहे.
“महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा आणि मार्गांचा डॉ. किंगनी परिणामकारक उपयोग केला. आपल्याला अहिंसा आणि असहकाराच्या मार्गांशिवाय गत्यंतर नाही, असे डॉ. किंगना वाटत आले होते. अहिंसेवर त्यांची फार मोठी श्रद्धा होती. अमेरिकेचे गांधी होण्याचा मान त्यांना मिळाला. पुढे त्यांनी बर्मिंगहॅम या शहरी अहिंसेचा यशस्वी प्रयोग केला. अमेरिकेतील श्वेत आणि निग्रो लोकांची भाग्यरेषा एकच आहे आणि म्हणून त्यांनी बंधुभावाने एकत्रित नांदले पाहिजे, असे डॉ. किंग यांना वाटत होते,” असं जनार्दन वाघमारे यांनी म्हटलं आहे.
रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग यांची भारतवारी कशी साध्य झाली याची पार्श्वभूमी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ कोकणी साहित्यिक रवीन्द्र केळेकर यांनी एका लेखात दिली आहे. केळेकर लिहितात, “त्या दृष्टीनं मी भाग्यवंत गोवेकर. खूप मोठमोठी माणसं जवळून पाहण्याचं भाग्य लाभलं मला. काहीजणांच्या अगदी जवळही पोहोचलो. त्यातलाच एक मार्टिन ल्युथर किंग. १९५८-५९ सालातील गोष्ट. (गांधीवादी विचारवंत आचार्य) काकासाहेब कालेलकर अमेरिकेचा दौरा करून आले होते. आल्यानंतर अमेरिकेत आपण काय पाहिलं, ते भेटायला आलेल्या आपल्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं होतं. नायगाराचा धबधबा पाहिला आणि तिशीतला एक निग्रो वीर पाहिला. दक्षिण आफ्रिकेत कार्य करणाऱ्या बापूंचाच अलीकडचा अवतार वाटला. त्याच्याकडे जाऊन राहिलो. बापूंच्याच प्रेरणेनं तो तिथे निग्रोंमध्ये कार्य करत आहे.‘"
काकासाहेब कालेलकरांनी किंग यांच्या कार्याविषयी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी चर्चा केली आणि गांधी निधीच्या वतीनं त्या तरुणाला म्हणजे किंग यांना, त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या एका सोबत्याला भारतभेटीसाठी येण्या-जाण्याची तिकिटं पाठवून दिली. केळेकर लिहितात- “त्याप्रमाणे मार्टिन पत्नीला आणि सोबत्याला घेऊन हिंदुस्थानात आला. खूप ठिकाणी फिरला. खूपजणांना भेटला. मुंबईत त्याचं वास्तव्य मणिभवनच्या गेस्ट हाऊसमध्ये होतं. माझं ‘गोमंत भारती’चं कार्यालय तेथेच गेस्ट हाऊसच्या शेजारी. मी आणि माझा एक बंगाली मित्र एस. के. डे त्याला घेऊन मुंबई फिरलो होतो.”
मार्टिन ल्युथर किंग यांच्या घरात महात्मा गांधींचं चित्र होतं. गांधीजींच्या भारताचा दौरा ही आपल्या जीवनातील एक महत्त्वाची घटना आहे, असं ते म्हणत असत. आपल्या भारतदौऱ्यात किंग यांनी गांधीजींच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या अनेक स्थळांना भेट दिली. दिल्लीत ते गांधी टोपी घालून हिंडले. गांधीजीच्या सत्याग्रह या अभिनव आंदोलन पद्धतीचा त्यांनी आपल्या लढ्यात वापर केला. आपल्या या भारत भेटीबाबत किंग यांनी लिहिलं आहे- “गांधीजींच्या वास्तव्यानं पावन झालेल्या भारताचा दौरा ही माझ्या दृष्टीनं एक पवित्र तीर्थयात्राच होती. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या कार्यकर्त्यांशी विचार करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. विनोबाजी, पंडित जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, श्रीमती अमृत कौर या गांधीजींच्या निकटवर्तीयांशी जो विचारविनिमय मी करू शकलो, ही माझ्या जीवनातला महत्त्वाची घटना होती.
“एका अर्थानं गांधीजींची जी जीवनप्रेरणा तीच माझी आहे असं म्हटलं तरी चालेल. गांधीजींचे विचार वाचले, तेव्हा मला वाटलं की, माझं मन ज्या शब्दांसाठी तळमळत होतं, ते गांधीजींच्या लेखनात पूर्वीच अंकित झालं आहे. येशूनं सांगितलेलं जीवन तत्त्वज्ञान आपलंसं करून गांधीजींनी दाखवलेल्या मार्गानं सामाजिक व राजकीय विवादांचा निरास करता येईल, असं माझी मनोदेवता मला सांगू लागली. निग्रोंच्या स्वातंत्र्यासाठी तत्त्वत: व व्यवहारातही फलदायी ठरेल, असा विश्वास मला वाटू लागला. माझी खात्री आहे की, आजच्या विज्ञानयुगात अन्याय दूर करण्याचं सत्याग्रह हे यशस्वी साधन ठरल्याशिवाय राहणार नाही.’'
नोबेल पारिषोतिक विजेते रेव्ह. किंग यांच्यामुळे महात्मा गांधींचं अहिंसेचं तत्त्वज्ञान पहिल्यांदाच जागतिक पातळीवर पोहोचलं, असं तारा गांधी भट्टाचार्य या गांधीजींच्या नातीनं म्हटलं आहे.
निग्रोंच्या हाल-अपेष्टांबद्दलही रवीन्द्र केळेकर यांनी लिहिलं आहे, ‘अमेरिकेतील निग्रोंनी गोऱ्यांचा खूप त्रास सहन केला आहे. आपल्या दलित बांधवांनी सोसला त्याच्यापेक्षा थोडाही कमी नाही. जास्तच म्हटलं तरी चालेल. मार्टिन ल्युथरच्या नेतृत्वाखाली या लोकांनी गांधीजींच्या मार्गानं आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार केला. मार्टिनच्या आत्मकथेत त्यांच्या या छळाची वर्णनं आली आहेत आणि त्याच्या प्रतिकारासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा वृत्तांतही आलेला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. इतकं असूनही अन्याय करणाऱ्यांविषयी मार्टिनच्या लेखनात एकही वाईट शब्द आलेला नाही. गांधीजींच्या वाटेनं तो आपल्या सोबत्यांना घेऊन एक-एक विजय मिळवत पुढे गेला आणि गांधीजींसारखीच शरीरावर गोळी झेलून एक दिवशी त्यानं मरणाला मिठी मारली.’'
रेव्ह डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येमुळे संपूर्ण जगाला हादराच बसला. किंग यांची झालेली हत्या भारतात १९४८ साली झालेल्या महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरची सर्वांत मोठी एक दुर्घटना आहे, असं म्हटलं जातं. मार्टिन यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्यांच्या संघर्षामुळे जगातील अनेक लोकांना वंशवादाविरोधी लढ्यात सामील होण्याची प्रेरणा मिळाली. दक्षिण आफ्रिकेत वांशिकभेदावर आधारित असलेली राज्यव्यवस्था जाऊन या देशाचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉ. नेल्सन मंडेला यांनी शपथ घेतली, तेव्हा आपल्या भाषणात त्यांनी रेव्ह. किंग यांच्या खास आवडीच्या पंक्तीचा म्हणजे ‘फ्री अ‍ॅट लास्ट’ या वाक्याचा उल्लेख केला होता. या कार्यक्रमात खास निमंत्रित केलेल्या सन्माननीय पाहुण्यांमध्ये रेव्ह किंग यांच्या पत्नी कॉरेटा याही उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction