Changing trends in newspaper industry



गुरुवार, २६ जुलै, २०१८
पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रवास
मंगळवार, २४ जुलै, २०१८कामिल पारखे
कोणताही व्यवसाय अनेकविध बदलांतून प्रवास करतो. वृत्तपत्र व्यवसायाने खूप मोठे तांत्रिक बदल थोड्या काळात बघितले. या बदलांचा पट, ते अनुभवलेल्या एका बातमीदाराच्या नजरेतून.
आधुनिक छपाई तंत्रज्ञानाचा शोध लागला पंधराव्या शतकात. तेव्हापासून कागदावर शब्दे उमटू लागली.  मात्र जोहानस गटेनबर्गने  हा शोध लावल्यानंतर त्यानंतर विसाव्या शतकापर्यंत या तंत्रज्ञानात फारशी प्रगती झाली नव्हती. पुस्तके  आणि वृत्तपत्रे जुन्याच पद्धतीने म्हणजे खिळ्यांची अक्षरे जुळवून छापली जात. ही पुरातन पद्धत भारतात अगदी १९८०च्या दशकापर्यंत चालू होती. मी पत्रकारितेची सुरुवात केली ती १९८१ साली.  तेव्हा मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेतील  वृत्तपत्रांच्या छापखान्यांत  खिळ्यांची अक्षरे जुळवून छपाई होत असे. अशा छपाईच्या आणि बातमी संकलनाच्या अगदी जुन्या  पद्धतीपासून  तो थेट आताच्या अत्याधुनिक पद्धतीच्या पत्रकारितेमध्ये झालेल्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. लँडलाईन, टेलिव्हिजन आणि मोबाईल फोन नसलेल्या काळात,  रेडीओची मर्यादित स्वरूपाची वार्तासुविधा असताना पत्रकारीतेची सुरुवात  करुन आजच्या अत्याधुनिक प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अगदी मोजक्या पत्रकारांमध्ये  मीही  आहे. यादरम्यानच्या काळात वृत्तपत्रांच्या तंत्रज्ञान वापरात आणि  बातमी संकलनांत, कामकाज पद्धतीत आणि एकंदर पत्रकारीतेत किती स्थित्यंतरे घडून आली आहेत याची नव्या पिढीला कल्पनाही करता येणार नाही. 
पणजीतून प्रकाशित होणाऱ्या द नवहिंद  टाइम्स या इंग्रजी दैनिकात मी नोकरीस लागलो होतो.  डेम्पो उद्योगसमूहाच्या द नवहिंद  टाइम्सचे आणि नवप्रभा या मराठी दैनिकाचे काम एकाच इमारतीत चालत असे. नवप्रभा या मराठी वृत्तपत्राची छपाई या खिळ्यांची अक्षरे जुळवून व्हायची. जुळारी हा आपल्या समोर रचलेल्या विविध छोटयाछोट्या खोक्यांमधून अगदी वेगाने आपल्याला हवे ते शब्द, जोडशब्द, कानामात्र, वेलांटी, उकार  आणि ओलांट्यासह निवडत असे आणि काही शब्दांची एका ओळ रचून नंतर दुसरी ओळ सुरू करत असे.  बोल्ड, इटॅलिक्स आणि छोट्यामोठया, विविध आकाराच्या टाइपांच्या  अक्षरांसाठी वेगळी खोकी असत. 
त्यामानाने द नवहिंद  टाइम्स या इंग्रजी दैनिकाच्या छपाईतंत्रात मात्र फारच मोठी मजल मारण्यात आली होती.  इंग्रजी लिखाण कंपोझिगसाठी तेथे भल्या मोठया आकाराचे आणि अवजड सात-आठ लायनोटाईप सेटिंग मशीन होते.  त्या मशीनमध्ये झिंक  वितळून त्यापासून अक्षरे असणारी एका छोटीशी चकती तयार केली जात असे.  लायनोटाईप ऑपरेटरसमोर किबोर्ड असायचा त्यावर ठराविक संख्येंचे शब्द टाईप करुन कळ दाबली की  त्या भल्यामोठया मशीनचे विविध भाग हलत आणि काही सेकंदात उकळत्या बॉयलरमधून झिंकचा ठराविक निवडलेल्या शब्दांची एक ओळ संच तयार व्हायची. झिंकचा ती ओळ थंड झाल्यावर त्या अनॆक ओळी एकत्र रचून त्याची प्रुफे  प्रूफरिडिंगला पाठवली जात. देवनागरी लिखाणात एखादया शब्दाची स्पेलिंगची चुक झाल्यास फक्त तेवढा शब्द दुरुस्त केला जाई, मात्र लायनोटाईप  मशीनवर इंग्रजी शब्दाच्या स्पेलिंगमध्ये चुक झाल्यास त्या झिंक धातूची पूर्ण ओळ बदलावी लागे. लायनोटाईप  मशिन्स अवजड असल्याने ती तळमजल्यावर असत तर  मराठी अक्षरजुळणीचे काम लाकडी तुळयांचे फ्लोअरिंग असलेल्या पहिल्या मजल्यावर चालायचे. 
कृष्णधवल फोटो छापण्यासाठी त्याकाळात फोटोवरून ब्लॉक केले जात असत आणि जुळवलेल्या बातम्यांबरोबर चौकटीत तो ब्लॉक ठेवला जाई.  हा ब्लॉकमेकर लाल दिवा असलेल्या अंधाऱ्या खोलीत काम करता असे.  नेहेमी वापरल्या जाणाऱ्या फोटोसाठी हे ब्लॉक्स लाकडावर माऊंट केले जात आणि पुनर्वापरासाठी जपवून ठेवले जात. पीआयबीने दिल्लीहून पाठवलेले पंतप्रधानांचे, इतरांचे  फोटो घटनेनंतर चार-पाच दिवसांनंतर छापले जात. 
१९८०च्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया (यूएनआय ) ही दोन वृत्तसंस्था वृत्तपत्रांचे एका मोठे आधारस्तंभ असत. मी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा सरचिटणीस असताना माझे वृत्तसंपादक मला म्हणत असत की आम्ही सर्व बातमीदार संपावर गेलो तरी  पीटीआय आणि युएनआयच्या  मदतीने ते बारा पानांचा पेपर सहज प्रसिद्ध करू शकतील ते यामुळेच. पीटीआयचे टेलिप्रिंटरचे मशीन लाकडी  बॉक्सचे तर युएनआयचे टेलिप्रिंटर स्टीलच्या बॉक्समध्ये असायचे. एखादी खूप मोठी महत्त्वाची  बातमी असेल ( त्यावेळी  ' ब्रेकिंग न्युज' हा शब्द फारसा रूढ झाला नव्हता) तर टेलिप्रिंटरवर लागोपाठ बेल वाजू लागेल. कामावर असलेला एखादा उपसंपादक मग काय बातमी आहे  हे पाहण्यासाठी टेलिप्रिंटरकडे येई आणि त्या बातमीची दाखल घेऊन सिनियरांना तशी कल्पना दिली जाई.   
एके दिवशी सकाळी  मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात असताना सकाळी दहाच्या दरम्यान टेलिप्रिंटरची घंटा सारखी वाजू लागली तेव्हा मी तिकडे सहज गेलो आणि मला धक्काच बसला.  केवळ एकच वाक्य पुन्हापुन्हा टाईप करत टेलिप्रिंटरवर घंटा वाजत होती. तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४ आणि ते धक्कादायक वाक्य होते : प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी शॉट अॅट'. त्यानंतर ऑफिसातील सर्व माणसे त्या टेलिप्रिंटरपाशी ताबडतोब जमा झाली हे सांगायलाच नको. साडेबाराच्या  दरम्यान ते वाक्य बदलले आणि  'प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी शॉट अॅट, फीयर्ड डेड' या वाक्यानंतर टेलिप्रिंटरवर सतत घंटा वाजत राहिली. सकाळी झालेल्या गोळीबारात इंदिरा गांधींचें निधन झाले ही बातमी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या संध्याकाळी उशिरा जाहीर केली होती.   
म्हाफुसिल किंवा प्रादेशिक बातमीदारांसाठी त्याकाळात टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन होते. गोव्यात मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना कोल्हापुरच्या  'पुढारी' या वृत्तपत्राचा पणजी येथील स्ट्रींगर बातमीदारसुद्धा  होतो. बातम्या पाठविण्यासाठी 'पुढारी'ने  मला टेलिग्राम कार्ड दिले होते. यासाठी मात्र मराठी बातम्या रोमन लिपीमध्ये लिहाव्या लागत. पोस्टात टेलिग्राम ऑपरेटर मग त्या संबंधित वृत्तपत्राला पाठवत असे.
महाराष्ट्र सरकारच्या एसटी गाड्या या म्हाफुसिल बातमीदारांचे महत्त्वाचे आश्रयस्थान असायचे. आपल्या बातम्या, वार्तापत्रे, जाहिरातीचा मजकूर आणि कृष्णधवल फोटो  एका पाकिटात घालून हे बातमीदार त्यांच्या संबंधित वृत्तपत्रांच्या शहरी जाणाऱ्या एसटी बसच्या ड्रायव्हरकडे सोपवत असत, तो ड्रायव्हर मग वृत्तपत्रांच्या गेटपाशी लांबूनच फेकता असे आणि वॉचमन ती पाकिटे उचलून संपादकीय टेबलांकडे पाठवत असे. औरंगाबादला जालना रोडच्या महामार्गावर असलेल्या लोकमतच्या कार्यालयासमोर हा प्रकार सारखा चालूच असे. वृत्तपत्र कार्यालय प्रवासाच्या वाटेवर नसल्यास त्या वृत्तपत्राच्या पोस्टबॉक्समध्ये ती पाकिटे टाकली जात. वृत्तपत्र कार्यालयातील शिपाई  दिवसातून दोनदा- तिनदा हे पोस्टबॉक्स उघडून त्यातील पाकिटे  नेत असे. 
याच काळात कंपोझिंगच्या कामासाठी वृत्तपत्रांत संगणक दाखल  झाले आणि अक्षरजुळारीचे पद आणि  लायनोटाईप मशिनची गरज गायब झाली. मात्र मराठी बातमीदार त्यानंतरही अनेक वर्षे आपल्या बातम्या हाताने लिहित असत तर  इंग्रजी वृत्तपत्रांमधील आम्ही बातमीदार टाइपरायटरवर टाईप करत असू. इंग्रजी वृत्तपत्रांतील संपादकिय विभागातील सर्वच जण म्हणजे अगदी बातमीदार- उपसंपादकापासून तो थेट मुख्य संपादकांपर्यंत सर्व जण आपापले लिखाण स्वतः टाईप करत असत. मराठी पत्रकारितेत मात्र बातमीदारांनी आणि मुख्य संपादकांनी  स्वतः संगणकावर लिखाण करण्यास खूप उशिरा सुरुवात केली.  त्याकाळात मराठी दैनिकांचे मुख्य संपादकही  स्वतः हाताने लिहायचे वा स्टेनोला डिक्टेट करायचे. 
बल्गेरियात १९८६ मध्ये  पत्रकारितेचा अभ्यासक्रम केल्यानंतर परत येताना मी दोन अत्यंत मूल्यवान वस्तू घेऊन आलो होतो. या वस्तू म्हणजे अडीच किलो वजनाचा एक पोर्टेबल टाईपरायटर आणि एक कॅमेरा. रॅमिंग्टन कंपनीचा तो टाईपरायटर मी  बल्गेरियन चलनी नोटा १०० लेव्ह देऊन म्हणजे एक हजार रुपयांना मी विकत घेतला होता आणि तो कॅमेरा दहा लेव्हला म्हणजेच  शंभर रुपयांस विकत घेतला होता. त्याकाळात पत्रकारितेत उपयुक्त ठरणाऱ्या या दोन वस्तू असणारा गोव्यातील मी एकमेव बातमीदार होतो! याच काळात कृष्णधवल फोटोग्राफी मागे पडून रंगीत फोटोग्राफी सुरु झाली.   
गोवा सोडल्यानंतर श्रीरामपूरला काही महिने सार्वमत या मराठी दैनिकात उपसंपादक होतो. तेथे मुंबई  किंवा नागपूरला चाललेल्या विधिमंडळाच्या सत्रांच्या काळात बॅटरी असलेल्या रेडिओवरील विधिमंडळाचे समालोचन आम्ही उशिरा संध्याकाळी  ऐकायचो. त्यानुसार  दुसऱ्या दिवसाच्या प्रमुख बातम्या आम्ही तयार करायचो. 
१९८०च्या दशकात  वृत्तपत्र कार्यालयांत केवळ सीनियर लोकांसाठी स्वतःचे टेबल आणि टाईपरायटर असायचे. माझ्यासारखे ज्युनियर रिपोर्टर आणि इतरांसाठी एकच जुना झालेला टाईपरायटर आणि एक लांबरुंद टेबल असायचा. औरंगाबादला मी लोकमत टाइम्सला जॉईन झालो तेव्हा मला पहिल्यांदा स्वतःचा टेबल आणि टाईपरायटर मिळाला. एक वर्षानंतर म्हणजे १९८९ ला पुण्यात इंडियन एक्सप्रेसला जॉईन झालो तेव्हा पुन्हा एकदा एका लांब मोठया  टेबलावर बसून सामायिक टाईपरायटर वापरायची पाळी आली. नंतर तेथे संगणकावर काम सुरू झाले तरी सुरुवातीला हे संगणकसुद्धा एक कॉमन प्रॉपर्टी असायची. सन  १९९९ ला पुण्यातच फर्गसन कॉलेज रोडवरच्या 'टाइम्स ऑफ इंडिया'त कामाला लागलो, तेव्हा पुण्यातले ते पहिलेच वातानुकूलित वृत्तपत्र कार्यालय होते. तेथे मला पहिल्यांदाच स्वतंत्र क्युबिकल, पीसी आणि गोलगोल फिरणारी खुर्ची मिळाली!  
१९९०च्या सुमारास भारतात इंटरनेटचा वापर सुरू झाला. याकाळात 'आयुका'चे  संचालक डॉ. जयंत नारळीकर यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्याकडून 'इलेक्ट्रॉनिक मेल'मुळे  जगातील शास्त्रज्ञांशी संवाद साधणे सोपे झाले आहे असे ते म्हणाले. त्यावेळी  'इलेक्ट्रॉनिक मेल' ही संकल्पनाच मला कळाली नव्हती. ई-मेल नंतर व्यवहाराचा एका अविभाज्य भाग होईल अशी त्यावेळी कुणी कल्पनाही केली नव्हती. त्याकाळात इंटरनेट कसे फायदेशीर आहे आणि त्याचा वापर कसा करावा यासंदर्भात पुणे श्रमिक पत्रकार संघाने आपल्या सदस्यांसाठी कार्यशाळाही  आयोजित केली होती. 
आज आम्ही सर्व पत्रकारमंडळी  इंग्रजी किंवा मराठी भाषेत बातमी किंवा लेख लिहिल्यानंतर आणि स्वतःच काढलेले फोटो त्याबरोबर जोडून संपादकांना इमेल करतो, त्याची अनेकदा एका मिनिटांत पोचही येते. या बातम्या ऑनलाईन आवृत्तीवर ताबडतोब प्रसिद्धही होतात.  लँडलाईन फोनचीही सुविधा नसलेल्या काळात पत्रकारिता सुरू केलेल्या माझ्यासारख्या पत्रकारास हे आजही स्वप्नवत वाटते आणि यापुढे आणखी काय असेल याबद्दल औत्सुक्यही  आहे.  

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction