
झेल चुकवला गेला अन खूप मोठ्ठी बातमी हातातून सट्कन निसटली तेव्हा... अगदी पालिकेच्या वा महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारुढ पक्षातर्फे एखाद्या वॉर्डात कुणाला बी फॉर्म मिळेल याविषयी अखेरच्या क्षणापर्यंत निर्णय जाहीर केला जात नसतो, विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी आणि बंडखोरी टाळावी यासाठी कमालीचे गुपित पाळले जाते. त्यामुळे तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सत्तारुढ पक्षातर्फे कुणाला उमेदवारी मिळेल याबाबत जाहीर वाच्यता होत नसेल किंवा आतल्या गोटातही निर्णय होत नसेल याबाबत आश्चर्य वाटायला नको. आता राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विजयाची शक्यता नसली तरी विरोधी पक्षांतर्फे याबाबत काही पावले उचलली जात आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिली दोन दशके राष्ट्रपतींची निवडणूक एकतर्फीच झाली. पहिली अटीतटीची निवडणूक झाली ती १९६९ साली आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाचा - सिंडिकेट गटाच्या कामराज, मोरारजी देसाई वगैरेंचा अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव होऊन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाठिंबा दिलेला उमेदवार डॉ वराहगिरी वेंकट (व्ही व्ही.) गिरी निवडून आले. राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच...